स्वरांचे आकाश

लता मंगेशकर (ज्येष्ठ गायिका)

प्रा. अनिल कवठेकर

लतादीदी म्हणजे स्वरांचं आकाश, शब्दांच्या मुठीत न मावणारं. ते शब्दांत पकडण्यापेक्षा त्यांच्या स्वरांचा अनुभव घेत घेत ध्यान समाधीत पोहोचणे आणि सर्व दु:ख विसरून जाणे. हे फार सोपे आहे. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबर हा जन्मदिन. यानिमित्ताने विशेष लेख.

निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे लताजींचा स्वर. तणाव कमी करणारे संगीताचे घर म्हणजे त्यांचा स्वर. न मागता निसर्गाने दिलेला आनंद वर म्हणजे त्यांचा स्वर. त्या निर्मात्याने विचार केला, पक्ष्यांमध्ये मी नाचणारा मोर दिला, गाणारा कोकीळ दिला. तसा या मानवाला एक सुंदर स्वर द्यायला हवा, जो प्रत्येक क्षणी त्यास स्वर्गीय आवाजाचा अनुभव देत राहील.. आणि त्याने आपल्यासाठी लताजींना स्वर दिला. लताजींचा स्वर म्हणजे पौर्णिमेच्या रात्री ताजमहल पाहण्यात जे अद्वितीय सौंदर्य आहे. त्यापेक्षा काकणभर अधिक सौंदर्य लताजींच्या स्वरात आहे. पौर्णिमेच्या रात्री ताजमहाल पाहण्यासाठी आपल्याला एक महिना वाट पाहावी लागते. पण लताजींनी गायला प्रारंभ केला की, भर दुपारच्या मध्यान्हीही पौर्णिमेच्या रात्रीची शीतलता जाणवू लागते. लताजींच्या स्वरांना उपमा देणे हे अत्यंत कठीण कार्य आहे. लताजांनी ‘ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी’ असे म्हणताच साऱ्या देशवासीयांच्या डोळ्यात पाणी येते आणि त्या डबडबलेल्या नेत्रांमध्ये आपल्या सैनिकांच्या शौर्याचा, बलिदानाचा पट दिसतो. इतकी शुद्ध आर्तता त्या स्वरात आहे.

‘पतीता’ चित्रपटांमध्ये हेमंत कुमारजी जेव्हा गातात ‘याद किया दिल ने कहा हो तुम’ आणि लताजी गातात ‘प्यार से पुकार लो जहाँ हो तुम’ आणि दुसऱ्या कडव्यामधील ओळी आहेत ‘अब तो मेरी दास्तां हो तुम.’ तिसऱ्या कडव्यातील ओळ आहे-

‘मेरे लिए आसमा हो तुम’
‘अब तो मेरी दासता हो तुम’ यातील ‘दासता’ हा शब्द त्या ज्या पद्धतीने, ज्या भावनेने गातात त्या एका शब्दात त्या नायिकेचे तिच्या प्रियकराशी जोडलेलं नातं इतकं परिपूर्ण आहे की, त्याशिवाय तिच्या जीवनाला अर्थ नाही. असा अत्यंत परिणामकारक अर्थ त्यांच्या स्वरातून प्रगट होतो. आणि ‘आसमा’ शब्द. ‘मेरे लिये आसमा हो तुम’ या शब्दाच्या उच्चारातून प्रियकराच्या प्रेमाच्या आकाशावर असणारा तिचा विश्वास चटकन जाणवतो. तिच्या मनात असणारी प्रियकराची भव्यता जाणवते. हे शब्दांचं महत्त्व तर आहेच, पण त्याही पेक्षा ते शब्द ज्या स्वरांनी आपल्यापर्यंत पोहोचवले ते स्वर लताजींचे आहेत म्हणून ते शब्द अद्वितीय असा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवतात. या पृथ्वीवर काही व्यक्तिमत्त्वं इतकी विशाल आहेत की, त्यांना शब्दात पकडणे शक्य नाही. त्यापैकी लतादीदी एक. लतादीदी म्हणजे स्वरांचं आकाश, शब्दांच्या मुठीत न मावणारं. ते शब्दात पकडण्यापेक्षा त्यांच्या स्वरांचा अनुभव घेत घेत ध्यान समाधीत पोहोचणे आणि सर्व दुःखं विसरून जाणं हे फार सोपं आहे. शेवटी असे म्हणेन-

जोपर्यंत चंद्र आणि भास्कर राहील
तोपर्यंत लताजींचा स्वर राहील