
>> गणेश उदावंत
सोज्वळ भूमिका करणाऱया सुस्वभावी, वात्सल्यमूर्ती सुलोचनादीदी यांनी जगाचा निरोप घेतला असतानाच ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल (78) यांच्या निधनाचे वृत्त धडकल्याने चित्रपटसृष्टी दुःखाच्या गडद छायेखाली आली. मूळचे पंजाबी अन् तरणतारण (पंजाब) येथे जन्मलेल्या गुफी पेंटल (मूळ नाव सरबजितसिंग पेंटल) यांना शिक्षणात जास्त रस नसला तरी त्यांनी अभियांत्रिकी पदवीपर्यंत शिक्षण संपादन केले. नोकरीनिमित्ताने त्यांनी हिंदुस्थानी लष्करात भरती होऊन चीनच्या सीमेवर संरक्षणाची बाजू सांभाळली. अभिनय, नकला करण्याच्या अंगभूत कलेमुळे अभिनयाची त्यांना गोडी लागली. यातूनच त्यांनी लष्करातील सेवेदरम्यान सैनिकांच्या मनोरंजनासाठी विविध उपक्रमांत सहभाग नोंदवला. याच वेळी ‘रामलीला’ व इतर नाटकांतून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. थोरला भाऊ मुंबईच्या चित्रनगरीत स्थिरावला असल्याने गुफी पेंटल यांचेही पाय मुंबईकडे वळले. इथेच त्यांनी मॉडेलिंग, चित्रपट, दूरदर्शन मालिकांसाठी सहाय्यक म्हणून अभिनयाचे धडे गिरवले. गुफी पेंटल यांची 1969पासून मुंबईत अभिनय क्षेत्रात विविधांगी कारकीर्द घडत असतानाच त्यापुढील 7 वर्षांच्या कार्यकाळात म्हणजे 1975मध्ये त्यांचा ‘रफू चक्कर’ हा चित्रपट आला. यात त्यांनी ‘सलीम’ नावाचे पात्र रंगवले. त्यांच्या अभिनयाचे काwतुक होऊनच पुढे त्यांच्याकडे चित्रपटासाठी काम मिळू लागले. दिल्लगी, देस परदेस (1978), सुहाग (नवीन, 1994), मैदान-ए-जंग (1995), बदला (2000), धूम (2006) आदी चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. अभिनय साकारण्यासाठी विशिष्ट देहबोली गुफी पेंटल यांच्याकडे असल्यामुळे दूरदर्शनवर गाजलेल्या बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या सुपरहिट मालिकेत ‘शकुनीमामा’ची भूमिका त्यांना मिळाली अन् खऱया अर्थाने गुफी पेंटल यांना ‘ब्रेक’ मिळाला. दिव्यांग असणाऱया शकुनीची हातात सोंगटय़ा घेऊन विशिष्ट झटका देऊन सोंगटी फेकण्याची कला… त्याची काwरव-पांडवांशी बोलताना – वागतानाची विशिष्ट देहबोली अन् ‘भाँजे…!’ म्हणतानाचा स्पष्ट होणारा कपटी स्वर आजही रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला आहे. सर्वच पातळय़ांवर या मालिकेने सर्वोत्कृष्टतेचा किताब मिळवला आहे. विशेष म्हणजे या मालिकेत ‘शकुनी’सोबतच गुफी पेंटल यांनी ‘कास्टिंग डायरेक्टर’ म्हणून यशस्वी दिग्दर्शन केले आहे. आज 30 वर्षे उलटूनही या मालिकेने रसिकांच्या मनात घर केलेले आहे. 1988 मध्ये प्रक्षेपित ‘महाभारत’ मालिकेआधी गुफी पेंटल यांनी ‘बहादूरशहा जफर’ (1986) या मालिकेत अभिनय केला. ‘महाभारत’ मालिकेतील गाजलेली ‘शकुनीमामा’ची भूमिका त्यांनी ‘ओम नमः शिवाय’ (1997), ‘द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण’ (2011) या मालिकेतून नव्याने साकारली. ‘अकबर-बिरबल’, ‘शू।़।़ कोई हैं!’, ‘भारत का वीरपुत्र ः महाराणा प्रताप’, ‘राधाकृष्ण’ आदी धार्मिक मालिकांमध्ये त्यांनी काम केले. 2021मधील ‘जय कन्हैयालाल’ ही त्यांनी भूमिका केलेली शेवटची मालिका होय. ‘रामायण’, ‘महाभारत’ मालिकांमुळे धार्मिक मालिकांचे दूरदर्शनवरून मोठय़ा प्रमाणावर प्रक्षेपण झाले. याच वेळी त्यांनी ‘श्री चैतन्य महाप्रभू’ या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. शकुनीमामाचा अभिनय करीत असताना त्यांना असंख्य धमक्यांची पत्रं आली. त्या भूमिकेबद्दल लोकांच्या मनात संतापाची भावना उमटणे स्वाभाविक होते. हा किस्सा गुफी पेंटल यांनीच स्वतः एका कार्यक्रमातून सांगितला होता! आपल्या हयातीत अभिनयाच्या व दिग्दर्शनाच्या कार्यक्षेत्रात गुफी पेंटल यांनी मुक्तपणे भरारी घेतली. त्यांच्या अभिनयकलेचे गुण वाखाणण्यासारखे आहेत… काwरव-पांडवांच्या भरदरबारात ‘जैसी आप की आग्या… यह भी ठीक कहा…’ असे म्हणत सभास्थळी विशिष्ट लकबीने सोंगटय़ा फेकत… ‘तुम्हारा कहना कोई टाल ही नहीं सकता, भाँजे!’ असे म्हणणाऱया शकुनीमामा अर्थात गुफी पेंटल यांनी सोंगटी ठेवूनच आता जगाचा निरोप घेतलाय, तो कायमचाच!



























































