ठसा : विद्या सिन्हा

2193

>> प्रशांत गौतम

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री विद्या सिन्हा यांनी ‘छोटीसी बात’, रजनीगंधा’, ‘पती पत्नी और ओ’ अशा दर्जेदार चित्रपटांतून सहज सुंदर अभिनयाची छाप सोडली होती. त्यांच्या निधनाने एक कलासक्त, सोज्वळ चेहऱयाची अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली आहे. 15 नोव्हेंबर 1947 साली मुंबईत जन्मलेल्या विद्या सिन्हा हृदय व फुप्फुसाच्या विकाराशी झुंज देत होत्या. अखेर 72 व्या वर्षी ही झुंज संपली. प्रख्यात सिने दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे दिग्दर्शन, अमोल पालेकर या कसदार अभिनेत्याचा पडद्यावरील मध्यमवर्गीय चेहरा आणि अशा चित्रपटात विद्या सिन्हा यांना मिळालेली सोज्वळ, सालस अभिनयाची भूमिका या सुंदर मिलाफामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला कलात्मक दर्जेदार, अभिजात साहित्यावर आधारित एकापेक्षा एक श्रेष्ठ चित्रपट मिळाले. मुळात ज्या लेखकाच्या कथेवर हा चित्रपट आधारलेला असायचा तोही अस्सल साहित्याचा असायचा. बासू यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या सिन्हामधील सहज अभिनय खुलायचा. मग तो चित्रपट अधिकच रसिकप्रिय होत असे. ‘छोटीसी बात’मधील प्रभा, ‘रजनीगंधा’मधील दीपा असो किंवा ‘पती पत्नी और वो’मधील शारदा असो. या चित्रपटातील त्यांच्या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहिल्या. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे 1977 या साली तर त्यांची भूमिका असलेले सहा चित्रपट लागोपाठ प्रदर्शित झाले. या जोरदार सिक्सरचे रसिक प्रेक्षकांनी तेवढय़ाच उत्साहाने स्वागत केले. त्यानंतर ‘तुम्हारे लिए’, ‘सफेद झूट’, ‘मुक्ती’, ‘सबूत, इन्कार’, ‘कर्म’, ‘किताब’, ‘कैदी’, ‘जीवन मुक्त’, ‘बॉडीगार्ड’, ‘स्वयंवर’, ‘हवस’ या चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. हिंदी चित्रपटाचा मोठा पडदा जसा त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने गाजवला तसा छोटा पडदाही व्यापला. दूरचित्रवाणीवर ‘कबूल’, ‘काव्यांजली’, ‘कुल्फी कुमार बाजेवाला’, ‘चंद्र नंदिनी’, ‘बहुरानी’, ‘भाभी’ यांसारख्या हिंदी मालिकातही त्यांनी मिळालेली भूमिका कसदार वठवली व लोकप्रिय केली. वडील राणाप्रतापसिंह हे दिग्दर्शक असल्याने विद्या यांच्या वाटचालीच्या प्रवासात प्रेरणा मिळाली. कसदार अभिनय करण्याचा, भूमिकांचा अभ्यास करण्याचा गृहपाठ हा घरातच मिळाला. त्यामुळे विद्या यांनीही चित्रपटातील भूमिका निवडीत चोखंदळपणा सातत्याने जपला. ‘न जाने क्यो, होता हे ये जिंदगी के साथ’ या सारखी कितीतरी गाणी विद्या सिन्हांवर चित्रीत झाली. चित्रपटातील ही लोकप्रिय अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यातही कायम चर्चेत राहिली. पहिला विवाह हा वेंकटेश्वर यांच्याशी 1968 मध्ये झाला. 1996 च्या सुमारास त्यांच्या पहिल्या पतीचे निधन झाले. दुसरा विवाह नेताजी भीमराव साळुंखे यांच्याशी झाला, मात्र दुसऱया विवाहात त्यांनी पतीविरोधात मानसिक, शारीरिक छळाची तक्रार दाखल केली होती. त्याच्या काही महिन्यांतच त्यांनी घटस्फोट घेतला. पुढे विद्या यांनी एक मुलगी दत्तक घेतली होती. त्या दोघी एकमेकींच्या अधिक जवळ होत्या. आपल्या माघारी या दत्तक मुलीचे कसे होणार, अशी चिंता त्यांना आयुष्यभर त्रस्त करीत होती. हिंदी चित्रपटांचा प्रवास शानदार करणाऱया या अभिनेत्रीच्या वाटय़ाला संघर्ष आणि संघर्षच आला. ती शोकांतिका आता संपली आहे. मीना कुमारी, नर्गीस, वैजयंतीमाला, माला सिन्हा, जया भादुरी अशा बिनीच्या अभिनेत्री त्या काळात असण्याच्या काळात विद्या यांनी आपल्या अभिनयाची स्वतंत्र मुद्रा रसिक प्रेक्षकांवर उमटवली. वयाच्या तिशीत असतानाच विद्या यांना भूमिका मिळू लागल्या. हिंदी चित्रपटांच्या नायिकांनी तंग कपडे घालावेत. नायकासह झाडामागे लपत छपत गाणी म्हणावीत, एखाद्या प्रसंगात बालिशपणे वागा व अशा अपेक्षा असण्याच्या सत्तरच्या काळात विद्या यांनी सोज्वळ अभिनयाची छाप पाडली. ‘रजनीगंधा’, ‘छोटीसी बात’ यासारखे म्हणजे अजरामरच म्हटले पाहिजेत. ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्यांचे जाणे हे प्रत्येकासच हळहळ वाटावे असेच म्हणावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या