आजी निवृत्त होताना…

 सामना प्रतिनिधी । मुंबई  

आजी रिटायर होतेयनेहमी निवृत्तीनंतर पुढे काय, हा प्रश्न आजोबांच्या बाबतीत पडतो.
पण घरीदारी खस्ता खाणारी आजी जेव्हा निवृत्त होत असते तेव्हातिलाही रिकामेपण येत असेलच कीकसं रमवतात आजच्या चिरतरुण आज्या आपलं मननिवृत्तीनंतर…  

स्वतःसाठी जगायचं

निवृत्तीनंतर आयुष्यात पोकळी जाणवली नाही, कारण निवृत्तीची मानसिक तयारी आधीच झालेली होती. ठरावीक दिवशी आपण रिटायर्ड होणार आहोत, हे माहीतच असतं. त्यामुळे घरासाठी वेळ द्यायचा हे मी ठरवलंच होतं. मुलं जरी मोठी झाली असल्याने आपण स्वतःसाठी काही करू शकले. वाचनाचा छंद जोपासता आला. मुलाचं लग्नही याच दरम्यान ठरलं त्यामुळे सुनेचे सगळे सणवार, मंगळागौर दणक्यात साजरं करता आले. मनसोक्त फिरता आलं. नोकरीमुळे रजा मिळायची नव्हतं. बँकॉक, राजस्थानमधील मारवाड, मध्य प्रदेश, कोकण, महाबळेश्वर, परळी वैजनाथ अशी खूप ठिकाणं बघितली. त्यामुळे नोकरीपासून बाहेर पडले याचं दुःख होत नाही. नवनवीन पदार्थही बनवता येतात. टीव्हीवरील आवडती मालिका बघता येते. वाचनही होतंय. घराजवळच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहायलयात नाव नोंदवलंय. दिवाळी अंक मला वाचायला आवडतात. कामाला जायचे तेव्हा ते वाचायला वेळ मिळायचा नाही. फॅमिली गेट टु गेदर करता येतं. नात्यातले लोक, मैत्रिणी, लग्नकार्याला आवर्जून उपस्थित राहता येतं. तेव्हा कर्तव्य पार पाडली आता आपण स्वतःच्या आनंदासाठी जगायचं, असं मला वाटतं. –  सरिता कसबेकर, निवृत्त सेल टॅक्स अधिकारी  

 

आनंदाचे मोल जाणा

निवृत्तीपूर्वीच आपल्याला काय करायचं आहे, दिवसभरातील मिळालेल्या वेळेचा उपयोग कसा करायचा, याचं आधीच नियोजन केलेलं असेल तर नंतर त्याचा फायदाच होतो. मी प्रॉक्टर ऍण्ड मॅम्बलमध्ये नोकरीला होते. दररोज बेलापूर ते ठाणे प्रवास करायचे. रिटायर्डनंतर प्रवास कमी होतो. सकाळचा प्रवासाचा वेळ नियमित व्यायामाला द्यायचं ठरवलं. त्याकरिता मला पोहण्याची आवड. नोकरीमुळे त्यासाठी वेळ मिळायचा नाही.  म्हणून सकाळी पोहण्याच्या क्लासला जाऊ लागले. याबरोबर योगासनेही शिकले. त्यामुळे उत्साही, ताजेतवाने राहायला मदत झाली. याशिवाय स्वेटर विणायची कला आधीपासूनच अवगत होती. त्यामुळे नवनवीन डिझाईनचे स्वेटर विणणे, इतरांना विणायला शिकवणे यातून खूप आनंद मिळतो. हा मिळालेला वेळ नातवंडांबरोबर घालवण्यातही एक वेगळीच मजा  असते. या अवर्णनीय आनंदाचा अनुभव मला भरभरून उपभोगता येतोय, याचे समाधान वाटते. त्यांना नवनवे पदार्थ करून घालते. त्यांचे लाड पुरवते. मनःशांतीकरिता नामजप, ध्यानधारण करते. कुटुंबीयांसोबत सुखाचे क्षण घालवणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, थोडक्यात काय तर इतरांसाठी जगता जगता स्वतःच्या आनंदालाही महत्त्व द्यायचा प्रयत्न करते. –  रेखा मांडवीकर, प्रॉक्टर अँड गॅम्बल

 

छंद जोपासायला वेळ द्या!

पालिकेच्या शाळेत मी शिक्षिका होते. त्यानंतर शिवडीतील बारादेवी उपरा या शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाले. 37 वर्षे नोकरी केली. माझी शिवडीतली शाळा डोंगरावर होती. दररोज 105 पायर्‍या चढउतार करावा लागे. तो बंद झाल्याने निवृत्तीनंतर गुडघेदुखी सुरू झाली. त्यावर उपचार घेतले. या आजारपणातून बरी झाल्यावर फॅमिली वेल्फेअर सेंटरची सभासद झाले. याचा मला खूपच फायदा झाला. तिथे पोलीस, डॉक्टर, वकील यांची व्याख्याने ऐकण्याची संधी मिळाली. बर्‍याच सामाजिक अडचणींवरही मार्गदर्शन मिळाले. ज्येष्ठ नागरिक म्हणून स्dवतःची काळजी कशी घ्यायची हे शिकले. तिथेच मला भजनाची गोडी लागली. पेटीवर भजन तसेच विविध राग वाजवण्याचा सराव करते. याच ठिकाणी निवृत्तांसाठी मंगळागौर, नृत्य स्पर्धा असतात. त्यातही भाग घेते. याशिवाय योगा शिकते, दररोज पेटीवादनाचा सराव, धार्मिक ग्रंथ वाचन, स्वेटर विणायला शिकणे यामध्ये वेळ सहज निघून जातो. त्यामुळे राहून गेलेल्या गोष्टी शिकायला वेळ मिळाला आहे. –  सुषमा राणे, निवृत्त मुख्याध्यापिका

 

कोणती आवड जोपासाल?

  • वाचनाची आवड असल्यास ग्रंथालयाचे सभासद होता येईल.
  • एखादी शिकायची राहून गेलेल्या कलेसाठी वेळ देता येईल.
  • अवगत असलेली कला दुसऱयांना शिकवण्यात वेगळाच आनंद असतो.
  • लेखनाची आवड असते. जोपासता येईल. यामध्ये एकांकिका, कविता, नाट्यलेखन करा.
  • लहान मुलांना शिकवण्याची आवड असल्यास एखाद्या एनजीओमध्ये शिकवा.
  • समाजकार्याची आवड असल्यास एखाद्या समाजिक संस्थेत सहभागी होऊ शकता.
  • पोहणे, योगासने करणे शिकल्यामुळे शरीर तंदरुस्त राहायला मदत होईल.
  • फिरण्याची आवड असल्यास भरपूर फिरू शकता. जेणेकरून शरीर उत्साही, तंदरुस्त राहायला मदत होईल.