
>> प्रा . डॉ . प्रकाश खांडगे
एकेकाळी शाहिरी हा वसा होता. ’व्यवसाय’ हे बिरुद शाहिरीला लागलेले नव्हते. साधारणतः बांधिलकीची शाहिरी म्हणूनच तो कलाप्रकार ओळखला जायचा. या बांधिलकीच्या शाहिरीचा बिनीचा शिलेदार अर्थात शाहीर लीलाधर हेगडे यांचे अलीकडेच वयाच्या 94व्या वर्षी निधन झाले. शाहीर लीलाधर हेगडे आदर्श शिक्षक, आदर्श संघटक आणि आदर्श शाहीर होते. स्वातंत्र्यपूर्व काळातच विविध राजकीय विचारसरणीच्या संस्कारांनी शाहिरी प्रेरित झाली होती. 1944 साली लाल बावटा कलापथकाची स्थापना बदलापूरला झाली.
अमरशेख, अण्णा भाऊ साठे, गवाणकर या तिघा शाहिरांनी साम्यवादी विचारांचा झेंडा खांद्यावर घेऊन स्वातंत्र्य चळवळीनंतर गोवा मुक्ती संग्रामात आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या धगधगत्या शाहिरीचा अक्षरशः अंगार फुलविला. त्याच काळात समाजवादी विचारसरणीच्या शाहिरांकडून जनजागरण सुरू होते. शाहीर लीलाधर हेगडे, दादा कोंडके, वसंत बापट, पु. ल. देशपांडे आदी मान्यवरांनी स्वातंत्र्याचे आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम तसेच हिंदुस्थान–चीन युद्ध , हिंदुस्थान– पाक युद्धात जनजागृतीचे कार्य केले. हिंदू विचाराच्या प्रभावाखालील नानिवडेकर, खाडिलकर, सावरकर अशा मान्यवरांची शाहिरी एकीकडे समरकुंडातल्या समिधा होत होती. विचार वेगवेगळे असले तरी या सर्वांचा परस्परांशी संवाद आणि सौहार्द होते, अगदी काँग्रेसच्या म्हणजेच त्यावेळच्या काँग्रेस सरकारच्या विचाराने प्रेरित झाले पद्मश्री शाहीर साबळे आणि शाहीर फरांदे हेदेखील जिवाशिवाची भेट असल्यासारखे वागत.
या सर्व शाहिरांच्या मांदियाळीत शाहीर आत्माराम पाटील आणि शाहीर लीलाधर हेगडे यांचे वेगळेपण नजरेत भरते. कारण दोघानांही प्रतिभेची देणगी लाभली होती. एकाने आयुष्यभर भाजीत कमावले आणि जी जीत गमावले तर दुसऱयाने साने गुरुजी विद्यामंदिरात आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य करता करता शाहिरीचा वसा सांभाळला. पूर्णवेळ शाहीर असे बिरुद दोघांनीही मिरविले नाही पण शाहिरीत आपल्या परंपरा निर्माण केल्या. राष्ट्रसेवा दल हा जणू लीलाधर हेगडे यांचा श्वास आणि ध्यास होता. राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकातील त्यांच्या आणि वसंत बापट यांच्या मार्गदर्शनाखालील महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन हे कार्यक्रम म्हणजे राज्याचे आणि देशाचे सांस्कृतिक वैभव होते. हिंदुस्थान–चीन युद्धाच्या वेळी वसंत बापटांनी चिनी आक्रमणावर रचलेला पोवाडा लीलाधर हेगडे मोठय़ा तडफेने सादर करीत.
महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन या कार्यक्रमांत झेलम परांजपे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची चित्रपट अभिनेत्री स्मिता पाटील नृत्याचे काम करीत असत, अशी आठवण एकदा प्रत्यक्ष मुलाखतीत लीलाधर हेगडे यांनी सांगितली होती. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत, शाहीर अमरशेख अध्यासनात लीलाधर हेगडे यांनी आपले स्वरचित पोवाडे, वसंत बापट यांचे पोवाडे सादर केले होते. लीलाधर हेगडे हे मूळचे ठाणे जिह्यातले. त्यांचा शाहिरीचा वारसा शाहीर म्हात्रे चालवीत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या लोककला अनुदान पॅकेज समितीवर सदस्य म्हणून लीलाधर हेगडे यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या रूपाने बांधिलकीच्या शाहिरीचा बिनीचा शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला. जो शाहिरीचा ’वसा’ अन् ’ठसा’ही होता.



























































