लेख – लॉक डाऊनच्या काळातील तंत्रज्ञानाचा वापर

973

>> डॉ. स्वाती महादेव जगताप   

एकविसाव्या  शतकात अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे तंत्रज्ञान हीदेखील काळाची गरज बनली आहे. तंत्रज्ञान ही अत्यंत आवश्यक बाब आहे हे सर्वमान्य आहेच, पण याची प्रकर्षाने जाणीव झाली ती कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या लॉक डाऊन परिास्थितीमध्ये.

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात, नव्हे तर देशभर लॉक डाऊन जाहीर केला गेला.सगळा कारभार ठप्प झाला. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल रेल्वे इतिहासात प्रथमच अशी बंद झाली. बस, मेट्रो, शाळा, कॉलेज, गर्दीची ठिकाणे सगळेच बंद झाले. जीवनच थांबलं आहे असं वाटत असतानाच सुरवात झाली ती ऑनलाईन कामांनी.

शाळा, कॉलेज ऐन परीक्षेच्या काळात बंद झाले. मग शिकवणे,  अभ्यासक्रम सुरू झाले ते ऑनलाईन.अधिकार्‍यांच्या सभा ऑनलाईन सुरू झाल्या. करमणुकीचे कार्यक्रम, स्पर्धा, प्रशिक्षण सगळंच ऑनलाईन सुरू झालं. Courser Udemy या व अशा विविध वेबसाईटद्वारे अनेक कोर्सेसचा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात या काळात लाभ घेतला.

रस्ते रिकामे ठेवून चोवीस तास घरात बसून राहणं प्रत्येकालाच कठीण झालं. या कठीण काळात सहजता आणण्यासाठी मोलाचा वाटा ठरला तो तंत्रज्ञानाचा. ठप्प झालेल्या जीवनाला गती मिळाली ऑनलाईनच्या माध्यमातून.

विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक समस्या ऑनलाईनच्या माध्यमातूनच दूर झाल्या. मुळात सध्याची युवापिढी नेहमीच तंत्रज्ञानाचा अवलंब करणारी आहे. त्यामुळे वर्गात कोंडून होणार्‍या तासांपेक्षा स्काईप,  यू टयूब यांवर होणार्‍या अभ्यासाला ते जास्तच उत्साही बनले. शिक्षकांद्वारे दिला जाणारा अभ्यासही ऑनलाईन करण्यात त्यांचा आनंद द्विगुणित झाला. ध्वनिफीत केवळ करमणूक म्हणून नाही अभ्यासासाठी पाहणं त्यांच्या आवडीचं झालं. मुलांनाही शिक्षणाच्या नव्या माध्यमांची ओळख झाली. शिवाय त्याची आवडही निर्माण झाली. सुरुवातीला कठीण वाटणारा हा प्रकार शालेय विद्याथ्र्यांच्या अंगवळणी पडला. ग्रामीण भागात याचे प्रमाण कमी असले आणि तांत्रिक अडचणी असल्यातरी शहरी भागात मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून पुढील इयत्तांच्या अभ्यासक्रमाचे शिकवणे सुरू राहिले आहे. साहजिकच या प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यास ऑगस्ट-सप्टेंबर महिना उजाडला तरी त्याआधी ऑनलाईनमुळे विद्याथ्र्यांची बर्‍यापैकी तयारी झालेली असेल. अभ्यासक्रमांची ओळख झालेली असेल.

शिक्षकांसाठी होणारी प्रशिक्षणे आयुष्यातील मोठा बदल घडवणारी ठरली. शिक्षणात सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं मार्गदर्शन या प्रशिक्षणाने झालं. प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच प्रशिक्षण घेऊन शिक्षकदेखील अद्यावत झाले.

केवळ शिक्षण नव्हे तर आरोग्य, करमणूक, पाककृती यासाठीदेखील घरातील प्रत्येक व्यक्तीने नानाविध प्रशिक्षणे या लॉक डाऊन काळात अनुभवली. कधीच तंत्रज्ञानाचा वापर न केलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी मुलं, नातवंडे यांच्या मदतीने तंत्रस्नेही होण्यात पुढाकार घेतला. काव्य वाचन, वक्तृत्व, संगीत स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या उतारवयास नवी पालवी आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

जंक फूडसाठी उत्साही असणारी तरूण पिढी घरात स्वत: नवीन पदार्थ बनविण्यात सहभागी झाली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. घराघरात बंद झालेले संवाद सुरू झाले. मिनिटामिनिटांचं गणित करून धावणारी जनता स्थिर झाली. न भूतो न भविष्यती अनुभव या काळात घ्यायला मिळाला.

अर्थात सर्वाधिक गैरसोय झाली ती हातावर पोट असणार्‍या मजूर, कामगारांची. या गरीबांवर उपासमारीची वेळ आली. शेतकर्‍याचे अतोनात नुकसान झाले. पोलीस, डॉक्टर यांनी कोरोना लढ्यात अहोरात्र मेहनत केली, करीत आहेत. मात्र दुर्दैवाने या युद्धात त्यातील अनेकांचे  कोरोनाने बळीही घेतले. अर्थात नाण्यालाही दोन बाजू असतात. कोरोनाची एक काळी बाजू नक्कीच आहे, पण या लॉक डाऊनच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्रांत वाढलेला वापर, उपयोग ही त्याची  चांगली बाजूदेखील आहे आणि ती महत्वाचीही आहे.

आपली प्रतिक्रिया द्या