
>> दिलीप जोशी
तुम्ही म्हणाल हा जूनचा दुसरा आठवडा. पावसाचे वेध लागलेत कुठे… तो सुरूही झालाय. काळ्या ढगांनी एव्हाना आकाश व्यापायला सुरुवात झालीच असेल. या मेघमालेच्या अंधारलेपणाविषयी नाही म्हणत. गेले दोन-तीन महिने ‘कोरोना’ नावाच्या जागतिक धास्तीने संपूर्ण मानव समूहाचं मन झाकोळून गेलंय. गरीब काय नि श्रीमंत काय, सत्ताधीश काय आणि अधिकारशून्य काय, सर्वांना सारख्याच मापाने तोलणारा ‘कोरोना’चा विषाणू अशा काही वेगाने आला की भल्याभल्यांना भयचकित करून गेला. आधी चीन मग इटली, स्पेन, युरोप, अमेरिका, हिंदुस्थानसह आशिया, मध्य पूर्वेतील देश तिकडे दक्षिण गोलार्धातील ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड! कोणीच कोरोना किंवा कोविड-19च्या तावडीतून सुटलं नाही.
हे संकट कधी टळणार? या रोगावर ‘लस’ कधी मिळणार? की याच्यासकटच सावधगिरीने जगावं लागणार? असे तीन महत्त्वाचे पण कोड्यात टाकणारे प्रश्न जगासमोर उभे ठाकले. तातडीने सुचलेला आणि तितक्याच तातडीने अमलात आणण्यासारखा योग्य उपाय होता. ‘टाळेबंदी’ किंवा ‘लॉक डाऊन’ माणसाच्या जीवनात नित्यनव अनुभव नवनव्या परिभाषेला जन्म देत असतात. त्यातलाच एक ‘लॉक डाऊन’. निदान तीन पिढ्या तरी तो बराच काळ विसरणार नाहीत.
त्यातूनच सारे वाहनव्यवहार थबकले. माणसं जिथे आहेत तिथे ठाणबंद झाली. आपल्याच घरात, पण बाहेर न पडण्याच्या पथ्याचा स्वीकार करून खिडकीतलं जग पाहू लागली. ज्याना निवाराच नव्हता ते पायी चालत घराकडे निघाले. तिथेही कोणी स्वागताला उभं होतं असं नाही. कारण सारेच धास्तावलेले. या सर्व गदारोळात कोणाचा दोष नि कोण बरोबर याची अवास्तव चर्चा न करता ‘जगणं’ आणि ‘जगवणं’ हे आपल्या अस्तित्वाचं मूलतत्त्वच अधोरेखित झालं.
या ‘पॅनडेमिक’ म्हणजे सर्वव्यापी रोगाचे सामाजिक. आर्थिक, राजकीय परिणाम काय होतील याची चर्चासत्र सुरूच आहेत. बहुधा त्यांचा सूर आपण कसे बरोबर आणि इतर कसे अयोग्य असा असतो. जागतिक आणीबाणीच्या काळात समस्त मतभेद दूर ठेवून अस्तित्वाची लढाई सर्वांनी एकत्रितपणे लढणं हेच खरं तर हितकारक… पण लक्षात कोण घेतो? कारण संकट खर्या अर्थाने ‘पॅनडेमिक’ होतं नि अजूनही आहे. हा मूळचा ग्रीक शब्द. ‘पॅन’ म्हणजे सर्व ‘डेमिक’ म्हणजे ‘डेमोग्राफी’ किंवा लोकसमूह अशा अर्थाचा. एकूण काय तर संपूर्ण जनजीवन असाच त्याचा ढोबळमानाने अन्वयार्थ. सगळं जगच त्याच्या सपाट्यात सापडल्याने आधी भांबावलं. मग प्रयत्नपूर्वक उभं राहू लागलं आणि आता हळूहळू सावरतंय.
जग ‘कोरोना’च्या खाईत होरपळत असताना तिकडे अमेरिकेत एका कृष्णवर्णीयाच्या निर्घृण हत्येने गदारोळ उडाला आहे. संतप्त अमेरिकन ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चं बंधन झुगारून रस्त्यावर उतरलेत. आंदोलनाला हिंसक वळणही लागताना दिसतंय. बोलघेवड्या ट्रम्प महाशयांची ‘प्रेस’च्या प्रश्नांना उत्तरं देताना तारांबळ उडतेय. अशा प्रसंगी शांत, सूज्ञ नेतृत्वाची गरज असते. पण ट्रम्प यांचा खाक्याच निराळा. लाखो लोकांचा जीव ‘कोरोना’ विकाराने गमावलेली आणि आर्थिक संकटात असलेली महासत्ता या नव्या उद्रेकातून सामंजस्याने बाहेर पडेल अशी आशा करूया.
असा कितीतरी सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक अंधाराचा काळोख जगाला कोंदून राहिलाय. सर्व प्रकारचा अन्याय दूर व्हावा ही अपेक्षा आहे. त्यातला काही माणसाने केलेला तर काही ‘निसर्ग’निर्मित. आपल्याकडे याच नावाच्या वादळाने ठिकठिकाणी नुकसान केलं. मुंबई थोडक्यात बचावली. सरकार आता या सगळ्या संकटांशी संयमाने, पण ठामपणे लढा देतंय. जनताही साथ देतेय. राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार उडाला असून वादळग्रस्तांना सर्वांच्याच मदतीची गरज आहे.
अशा ‘अंधारलेल्या’ काळात थोडा थोडा ‘अनलॉक-1’चा उजेड दिसू लागलाय. बर्याच भागांत रस्त्यावरची वाहनं दुकानं सुरू होतायत. अर्थात हे अंदाज घेत सावधपणेच करावं लागणार हे स्पष्टच आहे. शिस्तबद्ध सावधपणाने जनजीवनाला हळूहळू गती आली की खुंटलेला आर्थिक प्रगतीचा मार्गही दिसू लागेल. कदाचित सर्वांनाच अगदी जगभरच्या सर्वांना आपल्या जीवनधारणा काहीशा बदलाव्या लागतील.
‘कोरोना’ काळात एकच बरी गोष्ट घडली ती म्हणजे प्रदूषणमुक्तीची. अर्थात हे कोणत्याही भयातून न होता ‘पृथ्वी’ वाचवण्याच्या ध्येयातून व्हायला हवं. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला. पर्यावरणतज्ज्ञांनी त्यावेळी दिलेले इशारे लक्षात ठेवून प्रगती करूया. दोन-अडीच महिन्यांत मुंबईतलं प्रदूषणही जवळपास शून्यावर आल्याने गॅलरीतल्या छोट्या बागेतला पिवळा गुलाब (!) कधी नव्हे इतका तरारून फुलला. अशा फुलांसाठी, वनजीवनासाठी आणि जनजीवनासाठीही काही संयम आणि नियमांचं पालन करावं लागेल. मग पावसातही चमकत्या विजेसारखा लख्ख उजेड पडेल!
























































