लेख – लॉकडाऊन ते क्वारंटाईन व्हाया अनलॉक

432

>> सुरेंद्र मुळीक

जी जनता सुरुवातीला या विषाणूबाबत गंभीर नव्हती तीच जनता आता कोरोनाबाबत गंभीर आणि भयभीत झालेली मुंबईत पाहायला मिळाली. याच जनतेने मुंबईतून पळ काढण्यासाठी आकांडतांडव केले आणि मिळेल त्या मार्गाने आपले राज्य, आपला जिल्हा गाठला. परप्रांतीय पळालेच, पण जेव्हा राज्यातील जनतेनेही आपल्या गावी जाण्यास सुरुवात केली तेव्हा सारेच काळजी करू लागले. याचे कारण ग्रामीण भागातील अपूर्ण वैद्यकीय सेवा आणि तेथे असणारी वयस्क माणसे. त्यामुळे ही साथ जर ग्रामीण भागात पसरली तर हाहाकार उडेल या चिंतेने सरकारने जिल्हाबंदी कायम ठेवीत रेल्वे आणि एसटी सेवाही बंद ठेवली. कोरोना जोपर्यंत नियंत्रणात येत नाही तोपर्यंत हे असेच राहील हेदेखील स्पष्ट केले.

शासकीय नियमानुसार 14 दिवस होम क्वारंटाईन झालो आणि कोकणच्या मातीत मिसळून पुन्हा एकदा ताजातवाना झालो. पंधराव्या दिवसापासून मला कोकणच्या जनतेने स्वीकारले हे खरे. यात कोकणच्या जनतेचे काहीच चुकले नाही. चुकले ते मुंबईकर जनतेचे. मुंबईकर जनतेने विदेशातून येणाऱयांना क्वारंटाईनचा नियम लावला नाही. त्यामुळेच त्यांच्यावर हा प्रसंग बेतला आणि त्यांना गावी येऊन क्वारंटाईन व्हावे लागले. ग्रामीण जनतेने एकजुटीने हे केले व ते योग्यच आहे. याला आपण अपमानास्पद वागणूक असे का म्हणावे?

गावात येताना मलाही प्रथमतः तसेच वाटत होते, पण प्रत्यक्षात तसे काहीच जाणवले नाही. गावात जाऊन क्वारंटाईन म्हणजे काय, याचा अनुभव घ्यावा असे मनाशी ठरवूनच मी मुंबई सोडली. कारण अशी संधी वारंवार येत नाही. पत्रकारांनी तर अशी संधी सोडायची नसते. म्हणूनच क्वारंटाईनचे नियम असतानाच गावी जाण्याचे ठरविले. अर्थात मुंबई सोडताना नियम कुठेही तोडला जाणार नाही याची काळजीही घेतली. विशेष म्हणजे लॉकडाऊन असताना मुंबई सोडायची नाही असेही मी ठरवले होते. अखेर तो दिवस उजाडला. 1 जूनपासून लॉकडाऊन उठले आणि अनलॉक- 1 ची प्रक्रिया सुरू झाली. मी गावी जाण्याचे निश्चित केले.

’कोरोना’ विषाणू हिंदुस्थानात येणार नाही आणि आला तरी उष्णता असल्याने टिकणार नाही हे सारे समज चुकीचे ठरले. कोरोना विषाणू हिंदुस्थानात आला. त्याने उन्हाळ्यात टिकाव धरला आणि आतापर्यंत सहा लाख लोकांना त्याने विळखा घातला आहे. त्यातील वीस हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याला कोण जबाबदार आहे किंवा कसे हा मुद्दा बाजूला ठेवला तरी या सर्व घटनांतून एक स्पष्ट दिसून आले की, जी जनता सुरुवातीला या विषाणूबाबत गंभीर नव्हती तीच जनता आता कोरोनाबाबत गंभीर आणि भयभीत झालेली मुंबईत पाहायला मिळाली. याच जनतेने मुंबईतून पळ काढण्यासाठी आकांडतांडव केले आणि मिळेल त्या मार्गाने आपले राज्य, आपला जिल्हा गाठला. परप्रांतीय पळालेच, पण जेव्हा राज्यातील जनतेनेही आपल्या गावी जाण्यास सुरुवात केली तेव्हा सारेच काळजी करू लागले. याचे कारण ग्रामीण भागातील अपूर्ण वैद्यकीय सेवा आणि तेथे असणारी वयस्क माणसे. त्यामुळे ही साथ जर ग्रामीण भागात पसरली तर हाहाकार उडेल या चिंतेने सरकारने जिल्हाबंदी कायम ठेवीत रेल्वे आणि एसटी सेवाही बंद ठेवली. कोरोना जोपर्यंत नियंत्रणात येत नाही तोपर्यंत हे असेच राहील हेदेखील स्पष्ट केले.

शासनाच्या या जिल्हाबंदीच्या कचाटय़ात मोठय़ा प्रमाणात सापडला तो कोकणी माणूस. याचे कारण मुंबई आणि आसपासच्या जिह्यांत मोठय़ा प्रमाणात कोकणी माणसाचे वास्तव्य आहे. त्याखालोखाल प. महाराष्ट्रातील जनतेचे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जनताही राहते, पण त्यांची संख्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे 24 मार्च ते 31 मेपर्यंतच्या लॉकडाऊनच्या काळात गावी जाण्यासाठी सर्वात जास्त घाई केली ती मुंबईस्थित कोकणी चाकरमान्यांनी. मिळेल त्या वाहनाने आणि मिळेल त्या मार्गाने त्यांनी गाव गाठण्याचा प्रयत्न केला, पण चाकरमान्यांच्या या प्रकाराला त्यांच्याच गावांमधील लोकांनी जोरदार विरोध केला. यामुळे या पलायननाटय़ाला थोडासा लगाम बसला. याबाबत मी 28 मार्च रोजी एक लेख लिहिला आणि म्हटले होते की, चाकरमानी आज ना उद्या आपल्या गावी येतीलच. तेव्हा वाद करू नका. त्यांना ‘क्वारंटाईन’ करा. विदेशातून येणाऱयांना मोकळे सोडले आणि मुंबईत कोरोना पसरला तसे ग्रामीण भागात होता कामा नये म्हणून गावाकडे येणाऱया प्रत्येकाला क्वारंटाईन करायलाच हवे. त्यानुसारच 2 मेनंतर या प्रक्रियेने जोर घेतला व राज्यातील सर्वच भागांत क्वारंटाइन प्रकार सुरू झाला. सुरुवातीला 14 दिवस संस्थात्मक व 14 दिवस होम क्वारंटाईन केले जात होते. 28 मेनंतर केवळ 14 दिवस होम क्वारंटाईन असा नियम शासनाने जारी केला. यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला. त्यातच जून महिन्याच्या सुरुवातीला केंद्राने अनलॉक जाहीर केले. यामुळे गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

या अनलॉक संधीचा फायदा घेत मीदेखील गावी जाण्याचे ठरविले, पण वाहनाचा प्रश्न होता. रेल्वे, एसटी बंद, खासगी गाडीने जाण्याचे ठरविले तर चालकाचा प्रश्न. अखेर मुलानेच गाडी चालविण्याचा निर्णय घेतला. मुंबई-गोवा मार्गावर गाडी चालविण्याचा अनुभव नसला तरी कोरोनाने दिलेली ही संधी आहे असे मानत आम्ही निघालो. मुलाचे पीएच. डी. संशोधन केंद्र सिंधुदुर्ग असल्याने त्यालाही गावी जाणे जरुरीचे होते. तीन महिने अभ्यास थांबला होता. या विचारात आम्ही कोकणातील एकेक स्थानके मागे सोडत पुढे जात होतो. नेहमीचा प्रवास व आजचा प्रवास यात फारच फरक होता. अनलॉक सुरू होऊन शिथिलता झाली असली तरी भीती मात्र सर्वत्र कायम होती. रायगड जिह्यात एकाही ठिकाणी पोलिसांनी गाडी थांबवली नाही. मात्र गाडीकडे करडय़ा नजरेने पाहत होते. मास्क लावला की नाही, गाडीत जास्त माणसे आहेत का हा त्यामागचा उद्देश असावा. आम्ही गाडीत तिघेच असल्यामुळे आमची गाडी कदाचित थांबवली नाही. कशेडी घाटात रत्नागिरीच्या जनतेसाठी रांग होती. मी फक्त म्हणालो, सिंधुदुर्ग. पोलीस म्हणाले, चला जाऊ द्या आणि मी पुढे निघालो. रत्नागिरी जिल्हा तसा मोठा आणि माझ्या गावी जाणण्यासाठी 520 किमीचा प्रवास एका दमात व तोही अशा स्थितीत शक्य नव्हता. म्हणून लांजा येथील माझा मित्र रवींद्र चव्हाण याच्या शेतावर एक रात्र मुक्काम करण्याचे ठरविले. स्टेट बँकेतील असिस्टंट ब्रँच मॅनेजरची नोकरी सोडून चव्हाण शेतीच्या व्यवसायात उतरला. त्याचा मुलगा आदित्य आणि सून गौरी दोघेही बीएस्सी, एमबीए (ऑग्रिकल्चर) असल्याने ते लांजा येथील 10 एकर जमिनीवर शेतीचे विविध प्रयोग करीत असतात.

सायंकाळी त्यांच्या शेतावर पोहोचलो. तीन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर प्रथमच कोकणातील मातीला पाय लागले होते हा आनंद त्यापेक्षा वेगळा होता. असे जरी असले तरी खरी कसोटी सिंधुदुर्गमध्ये जाण्याची होती. दुसऱया दिवशी सकाळी निघालो. राजापूरच्या हातिवली चेकपोस्टवर गाडी पोलिसांनी थांबवली. कुठे जाताय? आमची नावे लिहून घेतली. गाडी पुढे निघाली आणि सिंधुदुर्ग जिह्याची हद्द खारेपाटण आली. याच चेकनाक्यावर मागील तीन महिन्यांत इतिहास रचला होता. वाहनांच्या 15 – 15 किमीच्या लांबच लांब रांगा लागत होत्या, पण आज कोणीच नव्हते. दोनच गाडय़ा होत्या. पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली, कुठून आलात, का आलात, कुठे जाणार, किती दिवस राहणार, चालकाचे नाव काय..वगैरे. चौकशी संपली. मग आरोग्य विभागाने चौकशी सुरू केली.

पुन्हा तेच प्रश्न. हातावर लोखंडाच्या जाड सळीने क्वारंटाईनचा शिक्का बसला आणि मी माझ्या गावी क्वारंटाईन झालो. यात अपमान कसला? असा प्रश्न माझ्या मनाला मीच विचारला आणि हसत हसत क्वारंटाईन झालो. क्वारंटाईनचे 14 दिवस संपले, पण अजून घरातच आहे. विनाकारण बाहेर पडायचे नाही. या 14 दिवसांच्या कालावधीत मळगाव ग्रामपंचायतीपासून आरोग्य विभागातील कर्मचारी सर्वांनीच सहकार्य केले. ग्रामपंचायतीचे नियम आपल्याच आरोग्यासाठी आहेत हे आपण विसरून कसे चालणार?

आपली प्रतिक्रिया द्या