नवलच! – जाडजूड पुस्तके!

>> अरुण

कोणाची कल्पनाशक्ती किती तीव्र असेल आणि कोण किती पानांचं किंवा शब्दांचं पुस्तक लिहील, काय सांगावं! शब्दांऐवजी ‘इमोजी’चा आधार घेत भावना व्यक्त केल्या जातात. ‘ओ माय गॉड‘सुद्धा ‘ओएमजी’ असं म्हणणारे खूप आहेत. पूर्वी आपल्याकडे दक्षिण भारतीय चित्रपटांची नावं भलीमोठी असायची. मग लोकच त्याचं संक्षिप्तिकरण’ (अॅब्रिव्हिएशन) करत असत. ‘दानवीरशूर कर्ण’ या चित्रपटाचं ‘डीव्हीएस कर्ण’ असं ऐकलं तेव्हा आश्चर्यच वाटलं होतं. पण नंतर ‘के-थ्री जी’ या प्रकारची चित्रपटाच्या नावांची संक्षिप्त रूपं सर्रास यायला लागली तेव्हा त्याचं अप्रूप वाटेनासं झालं.

जुन्या पोथ्या, रामायण-महाभारतासारखे वर्णनात्मक ग्रंथ, खूपच शब्दसंपदेचे होते. एकातून एक निघणाऱया अनेक कथानकांची (अॅनेक्डोट) गुंफण इतकी छान असायची की वाचक गुंगून जायचा. अलीकडच्या काळात रोलिंग यांचं ‘हॅरी पॉटर’ हे असंच अनेक भागांचं कथानक ठरलं. आजच्या काळात कोण वाचणार? असा प्रश्न पडलेल्यांना या पुस्तकाच्या कोटय़वधी वाचकसंख्येने सणसणीत उत्तर दिलं.

अनेक भागांतल्या पुस्तकांची एकूण शब्दसंख्या काही हजारांत, लाखांतही जाऊ शकेल, पण काही काही पुस्तकं म्हणजे ‘महाग्रंथ’ एकटाकी लिहितानाच लाखो शब्दांनी सजले. त्यापैकी सर्वात मोठा ग्रंथराज मानला जातो तो 2 लाख शब्दसमृद्ध असणारा ‘इन सर्च ऑफ लॉस्ट टाइम’ नावाचा. मार्सेल प्राऊट यांच्या ग्रंथाची पानं आहेत 13000 (तेरा हजार) आणि शब्दसंख्या आधी म्हटल्याप्रमाणे दोन लाख.

‘मॅरियनबॅड माय लव्ह’ या पुस्तकाचा लेखन कालावधी 30 वर्षांचा आणि शब्दसंख्या 17 लाखांपार गेली आहे असं म्हटलं जातं. मार्क लिच यांचं हे महापुस्तक म्हणजे ‘लाँगेस्ट नॉव्हेल’ (महाकादंबरी) म्हणून जगप्रसिद्ध आहे.

याउलट अगदी सूक्ष्मतम पुस्तकंसुद्धा छापली गेली आहेत. ‘टीनी टेड फ्रॉम टर्निपटाऊन’ हे माल्कम चॅप्लिन यांचं पुस्तक केवळ 0.07 मिलिमीटर  गुणिले 0.10 मिमी. एवढय़ा आकाराचं असून 30 मायक्रोटॅब्लेटचं हे पुस्तक वाचायला स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज लागते. या सूक्ष्माक्षरी ‘टॅब्लेट’ कोरणं (एचिंग) हे एक आव्हानच असणार. आपल्याकडे जयपूरच्या एका कलाकाराने (सुरेंद्र कुमार) तांदळाच्या दाण्यावर 1749 अक्षरं नोंदवून जागतिक विक्रम केलाय!