
>> अरुण जोशी
पहाटेची वेळ. दक्षिण हिंदुस्थानच्या प्रवासात असताना ट्रेन कर्नाटकातून केरळकडे जात होती. झुंजुमुंजू होता होता अधुनमधून ग्रामीण जनजीवन दिसू लागलं आणि तेवढय़ात कानावर स्वर आले ‘श्रीवेंकटा चलपते तब सुप्रभातम्’ परिचित आवाज. एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा. रेडिओवर प्रभातगीतांमध्ये अनेकदा ऐकलेलं हे स्तोत्र. काही दक्षिणी मित्रांच्या घरीही ते म्हटलं जायचं. ढंग अर्थातच कर्नाटक म्हणजे दक्षिण हिंदुस्थानी संगीताचा आणि स्वर. कालांतराने भारतरत्न झालेल्या सुब्बुलक्ष्मी म्हणजेच ‘एमएस’ या संक्षिप्त नावाने जगद्विख्यात झालेल्या गायिकेचा.
मदुराई येथे 16 सप्टेंबर 1916 रोजी जन्मलेल्या मदुराई षण्मुखवादिवु सुब्बुलक्ष्मी यांच्या घरातच संगीत होतं. तसं ते अनेक दक्षिणी घरात असतं. कर्नाटक संगीत किंवा कथ्थक वगैरेचे धडे बालपणीच दिले जातात. एमएस यांची आई तर उत्तम वीणावादिनी. वडिलांनाही संगीताची जाण. साहजिकच सुब्बुलक्ष्मींना सांगीतिक वातावरण बालपणापासून लाभलं. त्यांचा आवाज अतिशय गोड आणि भावपूर्ण होता. संगीत शिक्षण सुरू झाल्यावर सेम्मनगुडी श्रीनिवास ऐय्यर यांच्याकडे त्यांनी रीतसर संगीतसाधना केली, ती अर्थातच दक्षिणी संगीताची. वयाच्या दहाव्या वर्षीच या बालकलाकार मुलीची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली आणि अकराव्या वर्षी मदुराईच्या प्रसिद्ध ‘रॉककोर्ट टेम्पल’मध्ये पहिला जाहीर कार्यक्रम झाला. (हे रॉक टेम्पल प्रेक्षणीय आहे.) या कार्यक्रमाचं आयोजन करणारे ऐय्यर यांच्याबरोबरच पुढे ‘एमएस’ यांनी चित्रपटात पहिलं काम केलं.
ऐय्यर तत्कालिन काँग्रेस नेते होते. राजकीय नेते आणि चित्रपट अभिनेते एकाच वेळी असण्याची तामीळनाडूची परंपरा अशी बरीच जुनी दिसते. आपल्या या स्तंभात आपण अमराठी गायकांनी गायिलेल्या मराठी गाण्यांविषयी माहिती घेताना त्यांचा जीवनपटही थोडक्यात जाणून घेत आहोत. संगीताची भाषा वैश्विक असते. त्यामुळे स्वरांची उपजत देणगी लाभलेले गायक-गायिका अनेक भाषांतील गाण्यांमधून आपलं गानकौशल्य लीलया प्रगट करतात. भारतरत्न लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांनीही बहुतेक सर्व हिंदुस्थानी भाषांमध्ये गाणी गायली आहेत आणि त्यांच्या स्वरांच्या जादूने अवघं जग मोहित झाल्याचं आपण पाहिलं आहे. आता तर वेगवेगळ्या गानस्पर्धांमधून देशभरातील तरुणाई विविधभाषी गाणी म्हणत असते, परंतु ज्या काळात ध्वनिमुद्रणाचीही सोय मर्यादित होती, प्रवासाची साधनं गतिमान नव्हती. त्या काळातही अनेक गायक-गायकांनी हिंदुस्थानभर दौरे करून अनेक भाषांमधली गाणी गाऊन उदंड लोकप्रियता मिळवली होती हे विशेष.
एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या मराठी गाण्यांमध्ये त्यांनी गायिलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे दोन अभंग प्रसिद्ध आहेत. ‘बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी’ आणि ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ हे अभंग जरूर ऐका. त्यातून सुब्बुलक्ष्मी यांच्या दक्षिणी गानशैलीची झलक जाणवते आणि ते साहजिकच आहे, मात्र तुकोबांच्या रचनेमधली आर्तता त्यातून प्रभावीपणे जाणवते हे महत्त्वाचं. संत एकनाथांचा ‘हरी बोला रे, हरी बोला’ हे अभंगही एमएस यांनी गायिलाय तो आवर्जून ऐकावा असाच आहे. एमएस यांच्या स्वरातल्या जादूविषयी दिग्गजांनी पूर्वीच त्यांचा यथोचित गौरव केला आहे. पंडित नेहरू त्यांना म्हणाले होते, ‘मी केवळ प्रधानमंत्री आहे. तुम्ही तर स्वरसम्राज्ञी आहात.’ लतादीदींनी सुब्बुलक्ष्मींना ‘गानतपस्विनी’ म्हटलं होतं तर किशोरी आमोणकर यांनी सप्तसुरांपलीकडचा आठवा सूर अशा भावना व्यक्त केल्या होत्या.
बडे गुलाम अली खान त्यांना ‘स्वरलक्ष्मी’ म्हणत. सुब्बुलक्ष्मीचं उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण आपल्या महाराष्ट्रातले प्रसिद्ध गायक पंडित नारायणराव व्यास यांच्याकडे झालं होतं. त्या काळात मराठी काव्याशी त्यांचा परिचय झाला असणार आणि भक्तिगीतं गाण्याचा पिंड असलेल्या एमएस यांनी तुकोबांचे अभंग गायले असतील. 1954 मध्ये पद्मभूषण, 1975 मध्ये पद्मविभूषण आणि 1998 मध्ये भारतरत्न असे सर्व नागरी सन्मान प्राप्त करणाऱ्या सुब्बुलक्ष्मी यांची कीर्ती देशविदेशात पसरली होती. म्हणूनच त्यांना आशिया खंडाचं ‘नोबेल’ मानल्या गेलेल्या ‘मॅगेसेसे’ पुरस्कारानं 1974 मध्ये सन्मानित करण्यात आलं. इंग्लंडमधील एडिनबरा म्युझिक फेस्टिव्हल, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमधील मैफल याबरोबरच संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) सेन्ट्रल ऍसेम्ब्लीमध्ये गायनाची संधी 1966 मध्येच प्राप्त झाली होती. सुमारे 70 वर्षे जाहीर कार्यक्रम करणाऱ्या एमएस यांनी पती निधनानंतर 1997 पासून जाहीर कार्यक्रम थांबवले. 11 डिसेंबर 2004 रोजी सुब्बुलक्ष्मी यांनी अखेरचा श्वास घेतला.


























































