ठसा – माधवी पुरी-बुच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विलास पंढरी

पुरुषांची  मक्तेदारी असलेल्या शेअर मार्केटचे नियमन करणाऱ्या सेबीच्या चेअरमनपदी नुकतीच मुंबईच्या माधवी पुरी-बुच यांची नियुक्ती झाली आहे. एखाद्या मोठय़ा किंवा महत्त्वाच्या पदावर महिलेची नियुक्ती झाल्यावर तिचा उल्लेख त्या पदावरील ‘पहिली महिला’ असा होतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की, समानतेच्या काही पायऱ्या अजूनही शिल्लक आहेत.

दोन वर्षांपूर्वी माधुरी कानिटकर यांची लेफ्टनंट जनरल म्हणून नियुक्ती झाली होती. मुंबईच्या माधवी पुरी-बुच यांच्या ‘सेबी’वरील नियुक्तीमुळे यातील आणखी एक पायरी गाठली गेली आहे. हे पद आणि नियुक्ती कशी महत्त्वाची आहे हे कळण्यासाठी अगोदर सेबीची थोडक्यात माहिती पाहुयात. सिक्युरिटीज ऍण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ची स्थापना सिक्युरिटीज मार्केटचे नियमन करण्यासाठी एक गैर-वैधानिक संस्था म्हणून 1988 मध्ये प्रथम झाली. नंतर 30 जानेवारी 1992 रोजी ही एक स्वायत्त संस्था बनली आणि संसदेने सेबी कायदा 1992 मंजूर केल्याने तिला वैधानिक अधिकार प्रदान करण्यात आले. सेबीचे मुख्यालय मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असून आणि या संस्थेची अनुक्रमे नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि अहमदाबाद येथे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम क्षेत्रीय कार्यालये आहेत. याशिवाय जयपूर, बंगळुरू, गुवाहाटी, पाटणा, कोची, चंदीगड, भुवनेश्वर येथेही कार्यालये उघडली. सेबी अस्तित्वात येण्यापूर्वी भांडवली समस्यांचे नियंत्रक हे नियामक प्राधिकरण होते. कॅपिटल इश्यूज (नियंत्रण) कायदा,1947 मधून हे अधिकार प्राप्त झाले आहेत. सेबीचे व्यवस्थापन त्याच्या सदस्यांद्वारे केले जाते, ज्यामध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहेः चेअरमन केंद्र सरकारद्वारे नामांकित केले जातात.

दोन सदस्य, म्हणजे केंद्रीय अर्थ मंत्रालयातील अधिकारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक सदस्य. उर्वरित पाच सदस्य केंद्र सरकारने नामनिर्देशित केले जातात. सेबी कायद्याच्या 1999 च्या दुरुस्तीनंतर निधी, चिट फंड आणि सहकारी संस्था वगळता सामूहिक गुंतवणूक योजना सेबीअंतर्गत आहेत. शेअर बाजार हा गुजराती लोकांचा राहिलेला नाही, तर शेअर बाजारातील घडामोडींविषयी आता सामान्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. अगदी सर्वसामान्य लोक हल्ली आज मार्केट का पडलं? करेक्शन कधी होणार? अशा प्रकारच्या चर्चा करताना आढळून येतात. त्यामुळेच ‘सेबी’च्या विविध निर्णयांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा या वित्तीय क्षेत्रातील मोठय़ा संस्थेच्या मुख्य अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या आणि आधीच सेबीच्या सदस्या असलेल्या माधवी बुच यांच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.

12 जानेवारी 1966 रोजी मुंबईत माधवी यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्ली, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद अशा नामांकित संस्थांमधून झाले आहे. कमल पुरी  हे त्यांचे वडील व धवल बुच हे त्यांचे पती होत. त्यांनी वेस्ट चेशायर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केले आहे. ओआरजी मार्ग या प्रसिद्ध मार्केट रिसर्च कंपनीत त्यांनी  मार्केट रिसर्च कन्सल्टंट म्हणूनही काम केले आहे. तसेच आयसीआय या खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँकेत अनेक वरिष्ठ पदांवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे . सेबीचे चेअरमनपद सांभाळताना वरील संस्थांमधील कामाचा अनुभव त्यांना नक्कीच उपयोगी ठरेल. कोणताही मुद्दा मांडताना किंवा निष्कर्ष काढताना त्या प्रत्यक्ष आकडेवारीचा आधार घेतल्याशिवाय बोलत नाहीत हे त्यांच्या कामाचे एक वैशिष्टय़ आहे.

‘एखाद्या कामात महिलांचा सहभाग नसेल तर ते काम अपूर्णच म्हणावे लागेल. मला आव्हाने स्वीकारायला आवडते. मोठे पद नेहमीच महत्त्वाचे असते. कारण आपल्या अधिकारांचा वापर करून इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे त्यामुळे शक्य होते.’ ‘तुम्ही जे काही काम करता आहात ते मनापासून करा आणि त्यासाठी सहकारी, कुटुंब यांना विश्वासात घ्या’, ही माधवी बुच-पुरी यांची गेल्या काही वर्षांतील विधाने आहेत. या विधानावरून त्यांना असलेली सामाजिक जाणीव, सर्वांना बरोबर घेण्याची वृत्ती लक्षात येते. शिस्त महत्त्वाची असलेल्या आर्थिक क्षेत्रातील निर्णय घेताना त्यांचा हा स्वभाव उपयोगी ठरेल असे वाटते.