
>> प्रो. डॉ. बाळासाहेब लबडे
मधु मंगेश कर्णिक यांची ‘उधाण’ ही कादंबरी कोकणाच्या भूमीतील माणसाच्या अंतरंगात डोकावणारी आणि समाजातील नैतिक अधःपतनावर भाष्य करणारी एक प्रभावी कलाकृती आहे. ‘उधान’मधून त्यांनी माणसाच्या अंतर्मनातील नैतिक संघर्ष आणि विवेकाच्या लाटांना अभिव्यक्त केलं आहे. परिवर्तनवादी नवा विचार त्यांनी प्रभावीपणे मांडलेला आहे. सूक्ष्म बारकाव्यानुसार वर्णने, घटना-प्रसंग यामुळे या कादंबरीची उंची वाढलेली आहे.
1930 ते 1980 या कालखंडात भारतीय समाजात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर उधाण निर्माण झालं होतं. हाच प्रवाह ‘उधान’च्या कथानकात सजीव होतो. ‘उधान’ या शीर्षकातच प्रतीकात्मकता दडलेली आहे – समुद्राच्या लाटांसारख्या अस्थिर, उसळत्या, पण अखेरीस शांत होणाऱया मानवी मनाच्या गतीचं दर्शन.
कथानकाच्या केंद्रस्थानी असलेले रावसाहेब हे सत्तेचे, परंपरेचे आणि अधःपतनाचे प्रतीक आहेत. ते राजस आहेत, पण असुरक्षित; समाजात प्रतिष्ठित आहेत, पण अंतर्मनात शंकांनी ग्रस्त. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सत्ता आणि विवेक, नैतिकता आणि स्वार्थ यांच्यातील संघर्ष दिसतो. पितृत्वाचा नकार देऊन ते मानवी संवेदनेवर अन्याय करतात आणि या अपराधाची जाणीव त्यांना शेवटी आत्मदाहाकडे नेते.
याउलट, बापू तिरोडकर हे गांधीवादी विचारसरणीचे मूर्त रूप आहेत. त्यांचा साधेपणा, विवेकशीलता आणि नैतिक निष्ठा रावसाहेबांच्या सत्ताकेंद्री वृत्तीला तात्त्विक प्रतिउत्तर देतात. ‘गांधीवाद हा पोशाख नाही, तो जीवनाचा स्वभाव आहे.’ या भूमिकेतून लेखकाने आपल्या वाङ्मयीन प्रवासात सातत्याने जोपासलेल्या नैतिक विचारांचा प्रत्यय येतो. बापू हे कर्णिकांच्या साहित्यातील त्या विवेकी आणि संवेदनशील पात्रांच्या परंपरेचं पुढचं पाऊल आहेत, ज्यांना समाजातील मानवी मूल्ये जपायची असतात.
हिरा, रुक्मिणी, चंपा आणि होनीबाई या स्त्राr व्यक्तिरेखा ‘उधान’मधील भावनिक व सामाजिक गती ठरवतात. हिरा ही मूक सहनशीलतेचं प्रतीक, चंपा बंडखोरीचं आणि होनीबाई अस्तित्वनिष्ठतेचं. या स्त्रिया समाजातील स्त्राrच्या विविध अवस्थांचं प्रतिनिधित्व करतात आणि ‘उधाण’ला एक स्त्राrवादी अर्थविस्तार देतात. कर्णिक यांच्या लेखनात स्त्राr ही केवळ सहानुभूतीचा विषय नसून संघर्षाचं प्रतीक आहे – हीच भूमिका ‘उधाण’मध्ये ठळकपणे दिसते.
शांताराम ही व्यक्तिरेखा कादंबरीतील सर्वात वेदनादायी आणि प्रतीकात्मक आहे. तो म्हणजे नाकारलेलं पितृत्व, समाजाचा अनौरस वारसा. त्याचं अस्तित्व ही आणीबाणीच्या काळातील अन्याय आणि मानवी विवेकाच्या दडपशाहीची जिवंत रूपककथा आहे. कादंबरीची पार्श्वभूमी असलेली आणीबाणी ही राजकीय घटना नाही, तर ती माणसाच्या अंतरात्म्यावर आलेली भीती आणि विवेकहानीचं रूपक आहे. बाह्य सत्तेचा, दडपशाहीचा दबाव आणि अंतर्मनातील विवेकाची झुंज – या दोन्हींचा संगम म्हणजे ‘उधाण.’
कर्णिक यांच्या संपूर्ण वाङ्मयात कोकण हा केवळ भौगोलिक प्रदेश नसून सांस्कृतिक तत्त्वज्ञान आहे. त्यांच्या लेखनात समुद्र, माती, झाडं, आणि माणूस हे निसर्गाच्या अखंड एकात्मतेतून उभे राहतात. ‘उधाण’मध्ये हाच समुद्र माणसाच्या अंतर्मनाचं प्रतीक बनतो – सतत उसळणारा, शांत होणारा आणि पुन्हा उधाण घेणारा. ‘उधाण’ ही सत्ता, नैतिकता, स्त्राr-अस्मिता आणि विवेक यांच्या संघर्षाची बहुआयामी कादंबरी आहे. ती कोकणच्या सामाजिक इतिहासाचं दस्तऐवज असतानाच मानवी अंतर्मनातील द्वंद्वाचं तत्त्वचिंतन आहे. मधु मंगेश कर्णिक यांच्या वाङ्मयीन प्रवासातील ही कादंबरी त्यांची सामाजिक बांधिलकी, लोकसंस्कृतीवरील विश्वास आणि मानवी मूल्यांवरील गहिरं प्रेम यांची साक्ष देते.
मधु मंगेश कर्णिक यांच्या लेखणीत बापू तिरोडकरांसारखी व्यक्तिरेखा केवळ पात्र म्हणून नाही, तर एक तत्त्वज्ञान म्हणून उभी राहते. गावकी जीवनाचा सजीव गंध, संवादातील नैसर्गिकता आणि विनोदाचा हलका स्पर्श, मानवी भावनांतील सूक्ष्म हालचालींचं अचूक चित्रण, आदर्श आणि वास्तव यांचा संघर्ष दाखवण्याची सर्जनशील क्षमता हे सारंच यात दिसते. कर्णिक यांच्या भाषेत ग्रामीण शब्दकळा, भावनिक सूक्ष्मता आणि प्रतीकात्मकता यांचा सुंदर मिलाफ दिसतो. मधु मंगेश कर्णिक यांच्या लेखणीत कोकणाचे सौंदर्य, समुद्राचा लयबद्ध नाद आणि मानवी नात्यांची खळबळ एकत्र गुंफलेली दिसते.
उदा. “देवबागेच्या पुळणीवर सूर्यास्ताच्या घटकेला…” या वाक्यात ते नुसतं दृश्य नाही, तर एक भावनिक पार्श्वभूमी रंगवतात. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती कोकणातील अनौरस संततीची व्यथा वेदना मांडणारी उधाण ही कादंबरी लक्षणीयच. यापूर्वीच्या जयवंत दळवी यांची महानंदा, बा. भ. बोरकर यांची भावीन या परंपरेत बसणारी ही कादंबरी आहे.
उधाण कादंबरी
लेखक – मधु मंगेश कर्णिक
प्रकाशक – मॅजेस्टिक प्रकाशन मुंबई
प्रथम आवृत्ती- 2025
पृष्ठे- 90, किंमत ः 160/-
मुखपृष्ठ- पुंडलिक वझे



























































