
>> नवनाथ दांडेकर
महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला चटका लावणारी घटना 19 ऑगस्टला घडली. पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंग क्षेत्राचे चालते-बोलते विद्यापीठ असलेले व्यायाम महर्षी मधुकर दरेकर यांनी या जगाचा निरोप घेतला. अखेरच्या श्वासापर्यंत केवळ पॉवरलिफ्टिंग आणि पॉवरलिफ्टर्सच्या हिताचाच विचार त्यांनी केला. 60 वर्षे त्यांनी व्यायाम, शरीरसौष्ठव आणि पॉवरलिफ्टिंग क्षेत्राच्या विकासासाठी आपले आयुष्य वेचले. या कालखंडात राज्यातच नव्हे, तर देशभरात अनेक गुणी वेटलिफ्टर्स आणि पॉवरलिफ्टर्स त्यांनी घडवले. महाराष्ट्रात पॉवरलिफ्टिंग म्हटले की, मधुकर दरेकर हे नाव त्यामुळेच आदराने घेतले जातेय.
शरीरसौष्ठव आणि व्यायाम क्षेत्रात एक आदरणीय आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून दरेकर सरांना ओळखले जात होते. कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी आपल्या शिष्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करीत शरीर सुदृढ राखण्यासाठी मार्गदर्शन केले होते. वयाच्या 80 व्या वर्षानंतर आपल्या पीळदार शरीरयष्टीने ते सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे. शरीरसंपदा कमावण्यासाठी उत्तेजक अथवा स्टेरॉईड्सचा वापर करू नका असे ते आपल्या शिष्यांना आग्रहाने सांगायचे. मुंबईतील ग्लॅक्सो लॅबोरेटरीजमध्ये 34 वर्षे सेवा केल्यावर दरेकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत स्वतःचे अवघे आयुष्य व्यायाम, पॉवरलिफ्टिंग आणि शरीरसौष्ठव क्षेत्राच्या विकासासाठी वाहिले होते. सुमारे 60 वर्षे त्यांनी या क्षेत्रात राज्य आणि देशाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके मिळवून देणारे हजारो खेळाडू घडवले.
1983 मध्ये प्रथमच महिलांना पॉवरलिफ्टिंग आणि वेटलिफ्टिंग प्रशिक्षण देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला होता. त्याचेच फलित म्हणून आज महाराष्ट्राच्या अनेक महिला पॉवरलिफ्टर्स जगभरात देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत. जिगरबाज खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि प्रशासक असा त्यांचा प्रवास युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणाराच आहे. महानगरपालिका शाळांतून मोफत प्रशिक्षण देण्याच्या दरेकर यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी पालिका आणि महाराष्ट्र सरकारकडे जागा उपलब्ध करून देण्यासाठी साकडे त्यांनी घातले होते.
खेळाडू म्हणून महाराष्ट्राला आणि देशाला वेटलिफ्टिंग व पॉवरलिफ्टिंगमध्ये अभिमानास्पद यश मिळून देणाऱ्या मधुकर दरेकर सरांनी आपल्या आयुष्यातील तासन्तास या खेळाला अर्पण केला. खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रशासक म्हणून त्यांनी क्रीडा क्षेत्राला दिलेले बहुमूल्य योगदान न विसरता येणारे आहे. त्यामुळेच पॉवरलिफ्टिंग आणि मधुकर दरेकर असे समीकरणच बनले. या खेळातील त्यांचे त्यांचे करी नव्या खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देणारेच आहे. पॉवरलिफ्टिंग हा खेळ त्याच्या रक्तातच जणू भिनला होता. आपल्या प्रशिक्षक पदाच्या कारकीर्दीत सरांनी महाराष्ट्राला एकाहून एक सर्रास खेळाडू दिले. या खेळाडूंची गणतीही करता येणार नाही. त्यातील अनेक खेळाडूंना श्री शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यात नागेश पुजारी, संदीप सावंत, अनंत चाळके, उद्देश शिंदे, संतोष बुटे, मनोज मोरे, तुषार दरेकर, राजेश कामठे या पुरुष खेळाडूंचा तर अलका कुलकर्णी, रक्षा महाराव, विजया नर, कल्पना सावंत, निशा साटम, स्नेहांकिता वरुटे, सोनाली गीते या महिला खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्या या शिष्यांनी राष्ट्रीयच नव्हे, तर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत आपल्या खेळाची चमक दाखवली आहे.
पॉवरलिफ्टिंगसारख्या उपेक्षित खेळाला दरेकर सरांचा परीसस्पर्श झाला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा खेळ प्रकाशझोतात आला. त्यानंतर या खेळाने महाराष्ट्राच्या सीमा ओलांडत अन्य राज्यांतही पाय रोवले. पाहता पाहता विदेशातही हा खेळ पोहोचला. एखाद्या व्रतस्थ ऋषींप्रमाणे दरेकर सरांनी या खेळाची खूप मोठी सेवा केली. रत्नगिरीतील कशेडीसारख्या छोट्या गावातून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेल्या सरांनी 7व्या वर्षी मुंबई गाठली होती. मग जिद्द, मेहनत, चिकाटी या त्रिसूत्रीच्या बळावर दरेकरांनी उत्तुंग गरुडझेप घेतली. या खेळात त्यांनी घेतलेली विकासाची मोठी भरारी खरोखरच कौतुकास्पद आणि नव्या पिढीतील खेळाडू व प्रशिक्षकांना प्रेरणा देणारीच आहे. दरेकर सरांच्या या महान कार्याचा वारसा आता त्यांची मानसकन्या आणि शिष्या कल्पना सावंत या चालवत आहेत.
पॉवरलिफ्टिंग हा दरेकर सरांचा श्वासच बनला होता. त्यामुळे आपल्या आयुष्यातील अन्य सर्व गोष्टींना त्यांनी दुय्यम स्थान दिले. सरांचे या क्षेत्रातील हे प्रचंड कार्य पाहता ‘झाले बहु, होतील बहु, परी यासम हाच’ ही उक्ती त्यांना तंतोतंत लागू पडते. पॉवरलिफ्टिंग आणि शरीरसंवर्धन या खेळांतील सरांच्या कार्याची नक्कीच सुवर्णाक्षरांनी नोंद करावी लागेल. त्यांच्या या अजोड आणि बहुमूल्य कामगिरीची आठवण महाराष्ट्र कदापि विसरू शकणार नाही. या महान क्रीडा प्रशिक्षकांना आणि त्याच्या कार्याला सादर प्रणाम.




























































