
>> रविप्रकाश कुलकर्णी
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये म्हणजेच मुळ्येकाका यांच्या भन्नाट संकल्पनेतून साकार होणारा माझा पुरस्कार हा मराठा गर्दी ज्यांना वश असते असे भाग्यंवत दुर्मीळच. मग ते बाळासाहेब ठाकरे असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील. या मानकऱयांच्या यादीत कुठेही उभा राहू न शकणारा एक माणूस आहे, पण त्याची जाहिरात येताच पासेस मिळवण्यासाठी वेळेच्या आधीच लोक शिवाजी मंदिरसारख्या नाटय़गृहात रांगेत तिष्ठत उभे राहतात आणि तासाभरात शिवाजी मंदिर हाऊसफुल्ल होते. या पुरुषोत्तमाचं नाव आहे – अशोक मुळ्ये!
अर्थात आता वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यामुळे असेल, अख्ख्या नाटय़सृष्टीत ते ‘मुळ्येकाका’ म्हणून परिचित आहेत. तर असे हे मुळ्ये एरवी रंगभूमीच्या मागे राहून अनेक उलाढाली करत असतात. मग कधी ते बॅकस्टेज आर्टिस्टला मदतीचा हात पुढे करतील, नाटकाच्या वेधक जाहिराती करतील अशा नाना गोष्टी ते करत असतात. पण पडद्याच्या मागे राहून. कदाचित त्यामुळेच असेल मुळ्ये त्यांना वाट्टेल तेव्हा काहीतरी कार्यक्रम करतात असं आपलं म्हणायचं, कारण त्या कार्यक्रमाच्या दरम्यान ते केव्हाही काहीही बोलतात, बेलगाम बोलतात. मुळ्येंच्या कार्यक्रमात लोक गर्दी करतात, ते अधनंमधनं जी बत्तीशी वाजवतात त्यासाठी!
नाटय़सृष्टीत इतकी वर्षे वावरल्यामुळे इथला बरावाईट अनुभव त्यांनी घेतला असणारच. परंतु मुळ्ये ‘करायचं ते दणक्यात’ या वृत्तीनं करतात. त्यांच्या कार्यक्रमाची सजावट नेत्रदीपक असते आणि कार्यक्रमात भाग घेणारे जीव ओतून काम करतात. सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं ढोंग नाही करता येतं. मुळ्ये तरी त्याला अपवाद कसे ठरतील? मुळ्ये ते पण गुपित त्यांच्या स्वभावाप्रमाणे सांगून मोकळे होतात. ते म्हणतात, ‘माझ्या खिशात पैसा नाही, पण मला पैसे देणारे माझ्या खिशात आहेत!’ पण मुळ्येंचं हे सांगणं अर्धसत्य आहे. त्यांना उद्योजक हाटे, नाटय़निर्मात्या निर्मिती सावंत, दिग्दर्शक विजय केंकरे अशी अनेक मंडळी कोरा चेक देतात. ते कर्ज म्हणून नव्हे तर मुळ्ये हे जे काही करतात ते रंगभूमीच्याचसाठी ते पण निरपेक्षपणे म्हणून देतात. अशोक मुळ्ये या रंगकर्मीला आजपर्यंत करत आलेल्या कार्याला मिळालेली ही दाद असते व असेलही! अशा या अशोक मुळ्येंचा एक कार्यक्रम असतो – ‘माझा पुरस्कार’.
रंगभूमीची अंतर्बाह्य इत्थंभूत माहिती असलेल्या मुळ्येंना स्वतःची म्हणून एक दृष्टी आहे. त्यांना जे आवडतं त्याला ते तत्काळ दाद तर देतातच, पण त्यांच्याकडून ते ‘माझा पुरस्कार’ देतात. त्यांच्या निवडीच्या कलावंतांना ते ‘माझा पुरस्कार’ देतात तो सोहळा म्हणजेच ‘माझा पुरस्कार सोहळा’ असतो. विशेष म्हणजे त्यांची ही निवड इतकी चोखंदळ असते की, तो घेणाऱया कलावंतादेखील सांगावंसं वाटतं – हा ‘माझा’ पुरस्कार आहे.
‘माझा पुरस्कार 2019’मध्येही अशी अवीट गोडी पाहायला मिळाली. हा सोहळा म्हणजे सांस्कृतिक जल्लोष होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोने यांनी केले. मुळ्ये यांची जरब त्यांच्या सूत्रसंचालनावरही जाणवत होतीच. सध्या गर्दी खेचणारा एकमेव नट म्हणजे प्रशांत दामले. त्यामुळे त्याच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ला पुरस्कार अपेक्षितच. पण मुळ्येंचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी उत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कार त्याच नाटकात काम करणाऱयाला अतुल तोडणकर आणि प्रतीक्षा शिवणकरला दिला. गेल्या वर्षी ‘अनारकली’ प्रियंका बर्वेला प्रतीक्षाच्या हस्ते पुरस्कार दिला होता. तर यंदा साक्षात तिलाच! असं हे चित्र दुर्मीळच!
‘हवा येऊ द्या’ फेम नीलेश साबळे आणि श्रेया बुगडे यांनाही पुरस्कार देण्यात आला. मुळ्येंच्या कार्यक्रमात ते समोर असले तरी आणि नसले तरी भासत राहतात. त्यांच्या दराऱयाचा तो परिणाम. एरवी पुरस्कार एक देतो दुसरा घेतो हे ठरून गेलेलं चित्र. पण मुळ्येंनी तो कसा दिला? मुळ्ये म्हणाले, ‘पुरस्कार द्यावे असे हात आता नाहीत. म्हणून हा पुरस्कार तुम्ही प्रेक्षक देत आहात असं समजून तुम्ही फक्त दोन्ही हात पुढे करा, उभं राहायची गरज नाही. हा पुरस्कार समोर ठेवलाय. जणू रंगभूमी तो तुम्हाला देतेय. तो तुम्ही घ्यावा.’ कलावंतांनी तो तसा घेतला असं हे वेगळेपण.
हेच मुळ्ये यांच्या माझा पुरस्काराचे वैशिष्टय़ राहिले आहे. म्हणून तर सलग 11 वर्षे त्याचे ताजेपण आणि उत्कंठा अबाधित राहिली आहे. मयुरी देशमुख वयाच्या 21व्या वर्षी ‘डिअर आजो’सारखं नाटक लिहिते आणि तेवढय़ाच तन्मयतेने त्यातील भूमिका यशस्वीपणे करते म्हणून ‘माझा पुरस्कार’ दिला. एकाच व्यक्तीला दोन पुरस्कारदेण्याऐवजी त्यांनी एकाच ट्रॉफीवर दोन पुरस्कार अशी नोंद केली – उत्कृष्ट नाटक आणि उत्कृष्ट अभिनेत्री यासाठी.
रंगभूमीवर पुन्हा पर्दापण केल्याबद्दल ‘अ परफेक्ट मर्डर’साठी सहायक अभिनेत्याचा पुरस्कार सतीश राजवाडेंना दिला. हा पुरस्कार पुन्हा अभिनयाकडे वळला म्हणून देण्यात आला. मुळ्येंनी दिलेली ही दाद आहे. मुळ्ये म्हणतात, ‘इथे पुरस्कार वापसी नाही. उगाच स्टंट करतात हो. म्हणजे आधी घ्यायचा. त्याची जाहिरात आणि नंतर परत करतात त्याची जाहिरात. काहीतरीच काय? घेतला तर मीच पुरस्कार परत घेईन!’ लोक ‘माझा पुरस्कार’साठी येतात हे असलं ऐकण्यासाठी! यंदाच्या पुरस्कार वेगवेगळ्या कारणांसाठी वैशिष्टय़पूर्ण ठरला.
पण या कार्यक्रमात सर्वस्वी वेगळा कार्यक्रम होता तो केदार परुळेकर यांचा ‘माइंड इट’. हा माणूस समोरच्या वर किती प्रभाव टाकू शकतो आणि दुसऱयाच्या मनातलं धडा वाचल्यासारखं वाचू शकतो त्याचं ते प्रात्यक्षिक थक्क करणारं होतं. नीलिमा गोखलेच्या मनात कोणता मंत्र आहे ते तिनं कागदावर लिहिलं. तोच मंत्र ‘श्री स्वामी समर्थ’ परुळेकरांनी लिहून दाखवला.ठीक आहे होतो योगायोग. पण एकीनं काढलेलं चित्र तेच परुळेकर काढून दाखवतात! सगळा भुलभुलय्या वाटावा असा खेळ.
मुळ्येकाकांचा हा ‘माझा पुरस्कार’ चांगलाच रंगला. अशा या अशोक मुळ्येकाकांचे अनुकरण करणं, त्यांच्यासारखं वागणं कुणालाच जमणार नाही. शेवटी कलावंत खूप आहेत, असतील पण ‘माझा पुरस्कार’ देणारे वल्ली अशोक मुळ्ये वन ऍण्ड ओन्ली आहेत हेच खरं ना!



























































