
>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर
मकरसंक्रांत सण जवळ आला की, गच्चीवरील आठवणी आठवू लागतात. आम्ही 10 बाय 12 च्या खोलीत वाढलो आणि चाळ संस्कृतीत घडलो. आता चाळ म्हटली की जागा अपुरी मग अशा वेळी साधारण 20-25 माणसे जमतील अशी मोक्याची जागा म्हणजे गच्ची आणि ती असायची चाळीतील सर्वात वरच्या मजल्यावर आणि सभोवताली असायचे कौलारू छत. त्यावेळेस मंग्लोरियन कौल हे दणकट व प्रसिद्ध म्हणून वापरले जात असे. अशा या गच्चीवर 15/20 माणसांचा वावर सहज होत असे. मग मकरसंक्रांत, कोजागिरी पौर्णिमा आणि चाळी विशेष सभा तसेच महिलांना वाळवणासाठी या गच्चीचा सर्रास वापर केला जात असे.
मला आजही आठवते संक्रांतीच्या दिवशी सकाळी सहा वाजता उठून गच्चीतून कोणाचा पतंग आधी उडतो ही जणू अलिखित स्पर्धाच असायची. पतंग, मांजा, फिरकी असा सर्वच ऐवज घेऊन आम्ही गच्चीवर जात असू. त्यावेळेस थंडीसुद्धा भरपूर असे. मग गच्चीवर लाऊडस्पीकर लावून या सणाला सुरुवात व्हायची. चहा, नाश्ता आणि जेवण याची सोय गच्चीवरच केलेली असायची. चाळ म्हणजे एक कुटुंब. अशा वेळी समस्त महिलावर्ग थंडीच्या वातावरणात गरम वाफाळलेला चहा घेऊन येत असत. काही वेळाने गच्ची पूर्ण भरून जायची, मग नाइलाजास्तव आम्हाला गच्चीच्या कौलावर जावे लागत असे. गच्चीच्या दोन्ही बाजूंना सांधणारा त्याला आम्ही नळे असे म्हणत ते मजबूत असल्यामुळे आम्ही त्यावरून धावत जाऊन पतंग पकडत असू. मग अशा वेळी कोणाचे तरी छताचे कौल फुटत असे. मग आम्हाला हमखास मोठ्यांकडून ओरडा मिळत असे. अशा वेळेला लपायला आम्हाला गच्चीचा सहारा घ्यावा लागत असे. वाळवणासाठी घातलेल्या फेण्या, कुरड्या, पापड, फणसाची साटं चोरून खाण्याची मजा काही औरच होती. त्यावेळेस चाळी जास्तीत जास्त चार-पाच मजली, मग उंच चाळीतील गच्चीवर जाऊन तेथील संक्रांतीची मजा घेणे आजही आठवणीत आहे.
सकाळची थंडी, दुपारचे सौम्य ऊन, आणि सायंकाळचा सुसाट वारा हे गच्चीवरून अनुभवताना एक वेगळाच आनंद मिळत असे. इतकेच नव्हे तर रात्री आम्ही गच्चीवरून मेणबत्ती लावून कंदील सोडण्यातसुद्धा जणू काय स्पर्धा लागायची. याच दिवशी चाळीतील महिलांकडून गुळाच्या पोळ्या, तिळगूळसुद्धा दिले जात असे. चाळ म्हटलं की एक कुटुंब आणि गच्ची म्हटली की सर्वांचे जमण्याचे ठिकाण हे जणू समीकरणच झाले होते. परीक्षा काळात आणि जागेभावी आम्ही गच्चीतसुद्धा अभ्यास केलेला आठवत आहे तर कधी कधी रात्री गप्पाचा फडसुद्धा रंगलेला आठवत आहे. अलीकडे ज्याप्रमाणे कट्टा ही संकल्पना रुजत चालली आहे त्याप्रमाणे चाळीतील गच्ची हासुद्धा एक प्रकारचा कट्टा होता असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आजही काही जुन्या चाळी आणि त्यावरील गच्ची आहेत, परंतु त्या आता पार जीर्णावस्थेत आहेत तर काही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. बदलेली जीवनशैली, जीर्ण झालेल्या चाळी, अपुऱ्या जागा यामुळे पुनर्विकासाच्या माध्यमातून चाळी कालबाह्य होऊ लागल्या असून टोलेजंग टॉवर्स उभे राहू लागले आहेत. स्वाभाविकच सुरक्षा दृष्टिकोनातून गच्ची ही संकल्पना नष्ट होऊ लागली आहे. उरल्या त्या फक्त आठवणी. त्या मनात साठवून त्यांना उजाळा देण्यातच खरा आनंद आहे.






























































