
माझ्या रंगभूषा कारकीर्दीची सुरुवात नाटकापासून झाली. आज जरी चित्रपट, मालिकांसाठी काम करत असलो तरी नाटक नेहमीच प्राधान्यक्रमाने राहील… सांगताहेत माधव थत्ते
चित्रपट, नाटक, मालिकेसाठी एखादी व्यक्तिरेखा साकारण्याकरिता कलाकाराला रंगाद्वारे घडवण्याच्या कलेला रंगभूषा म्हणतात, अशी माझी रंगभूषेची व्याख्या आहे. पुण्यात मॅकड्रप नावाच्या दुकानात मी कामाला होतो. तेथे काम करता करता मला रंगभूषेची आवड निर्माण झाली. गेली आठ-दहा वर्षे नोकरी केल्यानंतर रंगभूषा करणे, सर्व प्रकारचे पोषाख शिवणे, ब्राह्मणी, पेशवाई, जिरेटोप, मुसलमानी, रजपुती पगडय़ा शिवणे ही कामे शिकलो.
हे काम करताना लक्षात आलं की, शिवणकामात फार वेळ जातो. त्यापेक्षा मेकअपचं काम इतकं झटपट आहे की, दिवसाला चार प्रयोगांकरिता मी रंगभूषा करू शकतो, त्यामुळे हळुहळू शिवणकाम कमी करून रंगभूषेमध्ये जास्त रस घेतला. पुण्यातल्या भरत नाटय़मंदिर या संस्थेतर्फे होणाऱया संगीत नाटकांसाठी आजही रंगभूषा करत आहे.
संगीत नाटकातल्या रंगभूषेचं वैशिष्टय़ म्हणजे एखादी साधी व्यक्तिरेखा जरी असली तरीही तिचा सर्व चेहरामोहरा रंगभूषाकाराला बदलावा लागतो. भडक मेकअप करावा लागतो. त्या काळात क्रेपर म्हणजे खोटय़ा केसांच्या लडीपासून दाढी-मिशा तयार करायचो. आता तयार मिळत असलेली दाढी ऑसिटोनने धुऊन ठेवून दिली की ती पुन्हा वापरता येते. माझी नाटकापासून रंगभूषेला सुरुवात झाली. त्यानंतर मालिका आणि सिनेमा याकरिता रंगभूषा करू लागलो. त्यामुळे माझ्यासाठी नाटकाला नेहमीच महत्त्व आहे. ‘न्याया घरी अन्याय’ या नाटकापासून माझी रंगभूषा करू लोगलो.
आज शिकलो आणि उद्या रंगभूषाकार झालो असं होत नाही. आपण रंगभूषा केलेल्या कलाकाराचं समाधान होणं फार गरजेचं आहे. रंगभूषेतल्या बारीकसारीक गोष्टी नाटकासाठी रंगभूषा साकारताना शिकायला मिळतात. गेली 50 वर्षे या क्षेत्रात काम करत आहे. या कलेने मला शारीरिक, मानसिक, आर्थिकदृष्टय़ा पूर्ण समाधान दिलं, मात्र अजून रंगभूषेची नवी आव्हानात्मक कामं करता यावीत. ज्यामध्ये मला माझं कौशल्य पणाला लावता येईल अशी माझी इच्छा आहे.


























































