
>> मंगेश भोसले
खूप उशीरा नाटय़रंगभूषेस सुरुवात केली आणि चित्रपट, मालिकांची पार्श्वभूमी असतानाही मंगेश नाटकातच रमला.
रंगभूषेची सुरुवात चित्रपट, मालिकेपासून झाली. त्यानंतर ‘आरण्यक’ या नाटकासाठी ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांना धृतराष्ट्राची भूमिका करायची होती. त्या व्यक्तिरेखेसाठी त्यांची रंगभूषा सध्या करत आहे. रंगभूषाकार उलेश खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही रंगभूषा करू लागलो. सुरुवातीला त्यांची ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अर्धा तास इतका वेळ लागायचा. आता फारच कमी वेळात ती होऊ लागली आहे. प्रयोगाच्या दोन तास आधी ते हजर असतात. रंगभूषा करताना अधूनमधून चहा घेणं, मोबाईलवर बोलणं असं ते करत नाहीत. एकदा मेकअपसाठी बसले की, तो कॉस्च्युमसकट पूर्ण झाल्यानंतरच बाजूला होतात.
बारावी पास झाल्यानंतर एखादा कोर्स करावा असं माझ्या मनात होतं. माझ्या वडिलांचे मित्र शरद सावंत हे मेकअप आर्टिस्ट होते. त्यांच्य़ाशी माझी ओळख झाली. त्यांच्याकडून मी रंगभूषा, वेशभूषा आणि केशभूषा शिकलो. तरुण व्यक्तीला म्हातारा कसं बनवायचं, म्हाताऱयाला तरुण कसं बनवायचं ते शिकलो. त्यांच्याकडून ‘बायको असून शेजारी’, ‘गारंबीचा बापू’ अशी काही नाटकं केली. सध्या ‘निम्मा शिम्मा’, ‘गारंबीचा बापू’, ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकांतील कलाकारांची रंगभूषा करत आहे. यानंतरही मला वेगवेगळ्या प्रकारच्या अनोख्या व्यक्तिरेखा रंगभूषेच्या माध्यमातून साकारायच्या आहेत, हे माझं या कलेतलं वैशिष्टय़ आहे.
रंगभूषा ही एक कला आहे. चेहऱयाच्या आकार आणि त्वचेनुसार त्याला कोणत्या प्रकारचा मेकअप साजेसा आहे, त्यानुसार तो करणे तसेच महत्त्वाचे म्हणजे नाटय़कलाकृती सादर करताना कलाकाराच्या भूमिकेनुसार प्रेक्षकांपर्यंत त्यांना पोहोचवण्याची तयार करणे म्हणजे रंगभूषा. कलाकाराच्या त्वचेप्रमाणे त्याला कोणत्या रंगाचा, प्रकारचा मेकअप चालू शकतो, याचा अभ्यास रंगभूषाकाराला करावा लागतो. सरावाने तो साध्य होत जातो.
मालिका, चित्रपट, नाटक अशा सगळ्याच माध्यमांसाठी रंगभूषा करण्याची संधी मला आतापर्यंत मिळाली आहे. त्यापैकी नाटकातील कलाकारांची रंगभूषा करायला मला जास्त आवडते. त्याचं कारण असं की, मालिका, चित्रपटातील मेकअप आणि गेटअपपेक्षा नाटकातील कलाकारांची वेशभूषा, रंगभूषा यामध्ये वैविध्य असतं. राक्षस, कोल्हा, चेटकीण, ऐतिहासिक नाटकांसाठी दाढी-मिशांचा मेकअप असे वैशिष्टय़पूर्ण काम करायला मिळतं.
अभिनेता सागर कारंडेचा ‘इडियट्स’ नाटकासाठी मेकअप करतोय. त्याच्याकडूनही खूप काही शिकण्यासारखं आहे. वेळेत पोहोचणं, ठरलेल्या वेळी कलाकारांचा मेकअप पूर्ण करणं, नाटकाच्या वेळी पोहोचायला उशीर झाला तरीही कमी वेळात मेकअप पूर्ण करणे, लाईव्ह नाटक दोन तासांचं असतं. एक तास आधी थिएटर देतात. त्या वेळेत कलाकारांच्या वेळेच्या सोयीने त्यांची रंगभूषा कशी लवकर करता येईल, असं सारं वेळेचं नियोजन नाटकाच्या वेळी रंगभूषा करताना शिकायला मिळतं.
मी गोपिनाथ ब्रॅण्डचे मेकअपचे साहित्य कलाकारांची रंगभूषा करताना वापरतो. त्याचे त्वचेच्या रंगाच्या पोतानुसार क्रमांक असतात. ते कोणत्या कलाकारासाठी कोणते वापरायचे ते आम्ही ठरवतो. दाढी मिशा चिटकवण्यासाठी बोरकर गमचा नावाची पेस्ट बाजारात मिळते. ती आम्ही वापरतो. ते किती प्रमाणात वापरायचं, हे सगळं किती प्रमाणात वापरायचं ते रोजच्या अनुभवावरून कळतं. हे साहित्य आमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. कलाकारांची अनोखी व्यक्तिरेखा रंगभूषेच्या माध्यमातून साकारायला मिळते त्यामुळे मला नाटकाचा रंगभूषाकार व्हायला आवडेल.

























































