
>> कमलेश बिचे
मूळच्या चित्रकलेला चेहऱयांच्या रंगांची भाषा उमगली आणि आयुष्याला एक वेगळेच वळण लागले.
मुळातच मी चित्रकार असल्यामुळे पोस्टर कलर, ऍक्रेलिक कलर, ऑईल कलर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांची मला जाण आधीपासूनच होती. रंगभूषा ही कला इतर रंगभूषाकारांचं निरीक्षण करून लवकरच आत्मसात केली. त्याकरिता मला विशेष प्रशिक्षण घ्यावं लागलं नाही. पण काम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. सुरुवातीला मी नाटय़सृष्टीत नवीन असल्यामुळे काम मिळवण्यासाठी ओळख वाढवणं, माझी कला दाखवणं आवश्यक होतं.
नाटक बघायला गेलो की, मेकअप रूममध्ये जायचो, मेकअप करताना रंगभूषाकारांना बघायचो. त्यांच्याशी ओळखी वाढवत गेलो. पुण्यातील माझ्या मित्रांच्या मदतीने काही निर्मात्यांशी ओळखी झाल्या. त्यातूनच कलाकार, पुणे या नाटय़संस्थेचं पहिलं नाटक मिळालं. ‘मी माझ्या मुलांचा’ या नाटकापासून माझा रंगभूषाकार म्हणून प्रवास सुरू झाला. त्यानंतर ‘घर श्रीमंताचं’ , ‘आत्ता दे टाळी’ , ‘क्लीन बोल्ड’, ‘एक झुंज वाऱयाशी’, ‘मोरूची मावशी’, ‘शांतेचं कार्ट’ अशी पुण्यातली नाटकं करता करता ‘हसवाफसवी’ या मुंबईतील नाटकामुळे मुंबई नाटय़सृष्टीrत माझं पदार्पण झालं. हे सर्वात जास्त लक्षात राहिलेलं आणि माझं सर्वात आवडतं नाटक. पुष्कर श्रोत्री यांच्या सहा निरनिराळ्या भूमिका हे या नाटकाचं वैशिष्टय़. कमीत कमी वेळात पुष्कर श्रोत्री यांच्या सहा भूमिकांचे सहा गेटअप करावे लागत. इथे मला रंगभूषेचं कसब पणाला लावावं लागत असे. हे नाटक मला करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. नंतर मी ‘न आमचे बाप’, ‘अश्रूंची झाली फुले’ अशाप्रकारे वेगवेगळ्या नाटकांमध्ये रंगभूषा करताना अतुल परचुरे, सुबोध भावे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, आनंद इंगळे, सीमा देशमुख, पुष्कर श्रोत्री अशा बऱयाच कलाकारांशी माझा परिचय झाला.
सध्या ‘माझी माय सरसोती’ या नाटकासाठी रंगभूषा करत आहे. याचं वैशिष्टय़ म्हणजे ही नृत्यनाटिका असून यात सुशांत शेलार, अतिशा नाईकसह 20 कलाकार आहेत. विविध विषयांवरील नाटकाच्या रंगभूषा करताना रंगभूषेचे अनेक पैलू शिकायला मिळाले, मात्र लॅटेक्स प्रोस्थेटीक मेकअपमध्ये आव्हानात्मक काम करायला मिळाले तर मला नक्कीच आवडेल. माझी चित्रकार म्हणून ओळख होतीच, पण या कलेने ‘रंगभूषाकार’ म्हणून माझी एक नवीन ओळख निर्माण करून दिली. हीच माझ्यासाठी आनंददायी गोष्ट आहे.


























































