एकाचे हित दुसऱ्याचे अहित ठरू नये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. ऋतू सारस्वत

महिलांची सुरक्षितता आणि प्रतिष्ठेसाठी समाज, व्यवस्था आणि कायदा आहे, परंतु काही प्रकरणांत कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे समोर आले असून त्यामुळे पुरुषांना विनाकारण पीडा सहन करावी लागली आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेत आपला ‘स्व’ जपण्यासाठी स्त्रीला खूपच झगडावे लागत आहे हे खरे; परंतु त्यामुळे पुरुष शोषणकर्ता आणि स्त्री शोषित असे समीकरण बनविल्यास समाजाचा समतोल विकासही शक्य होणार नाही. सध्याच्या स्थितीत महिलांवरील अत्याचार वाढले आहेत आणि महिलांचा संघर्षही वाढला आहे हे खरे असले तरी एकाचे हित दुसऱयाचे अहित ठरू नये, याची काळजी सगळय़ांनीच घ्यायला हवी.

गेल्या महिन्यात काही असे प्रश्न निर्माण झाले, ज्यांच्याकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही. दोन महत्त्वाच्या बातम्या वर्तमानपत्रांत छापून आल्या; परंतु नेहमीप्रमाणे आपल्या समाजाने, बुद्धिजीवी वर्गाने या घटनांकडे लक्ष दिले नाही. कारण या बातम्या सनसनाटी निर्माण करणाऱया नव्हत्या. पहिली बातमी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी संबंधित आहे. या प्रकरणात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱया युवतीने आपल्या साथीदारावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने संबंधित युवकाला शिक्षा दिली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय बदलताना असे म्हटले की, जबरदस्तीने लैंगिक शोषण झाल्याचा महिलेचा आरोप असला तरी वस्तुस्थिती पाहून असे म्हणता येते की, कोणतीही महिला चाकूच्या धाकाने लैंगिक शोषण झाल्यावर आरोपीला प्रेमपत्र लिहिणार नाही आणि चार वर्षांपर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही त्याच्यासोबत राहणार नाही.

दुसरी बातमी गेल्या महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ातील आहे. दिल्लीच्या वेगवेगळ्या न्यायालयांत नऊ अशी प्रकरणे समोर आली, ज्यात बलात्कार पीडितांनी बलात्काराबरोबरच अन्य अत्याचारांचा हवाला देऊन तक्रार दाखल केली होती, परंतु जेव्हा न्यायालयात जबाब देण्याची वेळ आली, तेव्हा आपण हा खटला रागातून दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारची प्रकरणे गेल्या काही वर्षांत वाढली आहेत. कारण आपल्याकडे ‘लैंगिक समानता’ या शब्दाचा अर्थ स्त्रीला बरोबरीचा हक्क देणे असाच घेतला जातो. हा अपूर्ण अर्थ रूढ करण्याच्या प्रयत्नांत पुरुषांचे अधिकार मारले गेले आहेत. एवढेच नाही तर त्यांच्याशी आपण इतके निष्ठुर झालो आहोत की, समाजात घडणाऱया प्रत्येक नकारात्मक घटनेसाठी पुरुषच जबाबदार आहेत असे मानून आपण त्यांच्यावर संवेदनशून्य आणि शोषणकर्ते असल्याचा आरोप करतो आहोत.

केवळ महिलांच्या अधिकारांबद्दल बोलणे हा लैंगिक समानतेचा अर्थ मुळीच नाही. लैंगिक समानता ही अशी अवस्था आहे, जिथे जैविक अंतरंग भिन्न असूनसुद्धा सर्व संधी आणि संसाधनांपर्यंत पोहोचण्यात स्त्री-पुरुष एकसारखेच सक्षम असतात. आपली राज्यघटनाही जात, धर्म आणि लिंगाच्या आधारे भेदभाव केला जाऊ नये या विचारांवर आधारलेली आहे, परंतु आपली व्यवस्था पुरुषांबद्दल भेदभाव करताना कधीच दिसत नाही का? डिसेंबर 2012 मध्ये घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर सरकारने बलात्काराच्या व्याख्येत बदल केला. पोलिसांनी प्रत्येक गुन्हा दाखल करून घेणे अनिवार्य केले. 2013 मध्ये दिल्लीत बलात्काराची 1636 प्रकरणे नोंदविण्यात आली, तर 2012 मध्ये 706 प्रकरणेच नोंदविण्यात आली होती. अधिकृत आकडेवारीनुसार, दिल्लीत शिक्षा होण्याचा दर 2012 मध्ये 49 टक्के होता तर 2013 मध्ये तो घटून 27.1 टक्के झाला.

देशातील एका इंग्रजी दैनिकाने केलेले तत्कालीन संशोधन तसेच न्यायालयांत सुरू असलेल्या विविध खटल्यांच्या निकालांनंतर एक वास्तव समोर आले. चाळीस टक्के प्रकरणांमध्ये न्यायालयाला असे आढळून आले की, संबंध परस्पर संमतीने करण्यात आलेले होते. तसेच अधिकांश प्रकरणांत मुलीच्या आईवडिलांनी तक्रार दाखल केली होती. सुमारे 25 टक्के प्रकरणांमध्ये असे आढळून आले की, मैत्री केल्यानंतर किंवा साखरपुडा झाल्यानंतर पुरुषांनी लग्नास नकार दिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. जेव्हा दोन व्यक्ती परस्पर संमतीने संबंध प्रस्थापित करतात आणि नंतर एखाद्या कारणाने त्यांचे नाते तुटते, तेव्हा तो बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी आधार मानावा का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासंदर्भात मे 2020 मध्ये ओडिशा उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण टिपणी करताना म्हटले आहे की, लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे बलात्कार नव्हे. न्यायालयाने असाही प्रश्न उपस्थित केला आहे की, जिथे स्वतःच्या मर्जीने संबंध प्रस्थापित होतात,अशा घटनांत बलात्काराच्या कायद्याचा वापर केला जावा का?

गेल्या वर्षी तर अशा घटनांना पूरच आल्याचे पाहायला मिळाले. 2016 मध्ये नवी दिल्लीच्या न्यायालयात बलात्काराच्या खोटय़ा खटल्यात न्यायालयाने म्हटले की, बलात्काराच्या खोटय़ा आरोपांचा सामना करीत असलेल्या पुरुषांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी कायदा तयार करण्याची वेळ आता आली आहे. कारण प्रत्येक जण केवळ महिलांचीच प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसते आहे. प्रत्येक जण महिलांसाठी सुरक्षितता आणि प्रतिष्ठा यासाठी संघर्ष करीत असताना पुरुषांचा सन्मान आणि प्रतिष्ठेचा उल्लेख कुणीच करत नाही याविषयी न्यायालयाने चिंताही व्यक्त केली होती. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे तयार झाले, परंतु मतलबी महिलांपासून पुरुषांचा बचाव करण्यासाठी कायदा कुठे आहे? आगामी काळात पुरुषांकडे अशा पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले गेल्यास समाजाचा संतुलित विकास शक्य होणार नाही.
शारीरिक भेदांच्या आधारावर मानवी भावनांची वाटणी करणे कदापि इष्ट ठरणार नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. महिलांमध्येही पुरुषांप्रमाणे क्रोध, ईर्षा, प्रेम, द्वेष, घृणा अशा भावना प्रवाहित होत असतात. त्यामुळे पुरुष शोषणकर्ता आणि स्त्री शोषित असा विचार करणे मानवाधिकारांचे हनन करणारे नाही का? आपली हीच मानसिकता समाजाला दोन भागांमध्ये विभाजित करत आहे, जिथे तथाकथित महिलावादी समूहाने पुरुषांना शोषक सिद्ध करण्यासाठी कोणतेही प्रयत्न शिल्लक ठेवलेले नाहीत, परंतु हा विचार घातक आहे. कारण पीडा आणि अपमान या भावना शारीरिक भेद मानत नाहीत. पुरुषसत्ताक व्यवस्थेत महिलांना आपला ‘स्व’ जपण्यासाठी कठोर संघर्ष करावा लागत आहे याबद्दल अजिबात दुमत असण्याचे कारण नाही, परंतु त्यामुळे एकाचे हित दुसऱयाचे अहित ठरू नये याची काळजी सगळय़ांनीच घ्यायला हवी.