
>> शिबानी जोशी
काही स्वर… काही सूर मनाच्या गाभाऱयात ठाशीव उमटलेले असतात. त्यांच्या पाऊलखुणा… कधीही न पुसणाऱ्या. अरुण दाते + मंगेश पाडगावकर + यशवंत देव या त्रयींचा परीसस्पर्श झालेली ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी’ 50 वर्षांची झाली त्यानिमित्ताने…
जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीचा काळ. सुप्रसिद्ध कवी आणि दर्जेदार कविता करणारे मंगेश पाडगावकर यांनी एक गीत लिहिलं आणि सुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांच्याकडे सुपूर्द केलं. पाडगावकर म्हणाले, ‘‘या गीताला चाल बांधा. हे गीत अरुण दाते गाणार आहे.’’ काही दिवसांनी यशवंत देव यांनी मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते यांना ‘‘चाल तयार आहे, ऐकायला या’’ असा निरोप दिला. मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते यशवंत देव यांच्या घरी पोहोचले. देवांनी या गीताला दिलेली चाल ऐकल्यावर पाडगावकर आणि दाते यांच्या चेहऱयावर वेगळेच भाव उमटले. पाडगावकर त्यांना म्हणाले की, ‘‘तुमचं संगीत क्षेत्रातलं नाव खूप आहे, पण तरीही मला असं वाटतं की, हे गाणं म्हणजे एक विराणी आहे. थोडंसं दुःखद गीत आहे. मग या गाण्याला अशा प्रकारचा रिदम कशाला?’’
अरुण दाते यांचंही हेच म्हणणं पडलं. ते म्हणाले, ‘‘देवसाहेब, आपण कमाल गाणे करता, पण ही चाल ऐकल्यावर पाढे म्हटल्यासारखे वाटत आहे असं मला वाटतं.’’ यशवंत देव हसतच त्यांना म्हणाले, ‘‘माझा अनुभव आणि वय तुम्हा दोघांपेक्षा जास्त आहे. माझी खात्री आहे, हे गाणं भावसंगीतातलं एक अप्रतिम गाणं ठरेल. आपल्या तिघांच्याही आयुष्यातला एक मैलाचा दगड ठरेल आणि खरोखरच एचएमव्ही कंपनीसाठी हे गाणं रेकॉर्ड झालं आणि या गाण्याने इतिहास रचला. गेली पन्नास वर्षे कोणत्याही दर्जेदार गाण्यांच्या कार्यक्रमात या गाण्याची फर्माईश होते. असं हे गाणं आहे, ‘भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी’. आज या गाण्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत तरी या गाण्याची अवीट गोडी कमी झालेली नाही. अरुण दाते यांच्या आयुष्यात हे भावगीत आयुष्याची शिदोरी बनून गेलं. दात्यांनी 2750 शोज केले. प्रत्येक कार्यक्रमात या गाण्याची फर्माईश आणि वन्स मोअर मिळतो.
अरुण दाते आपल्या आठवणीत सांगत असत की, हे गाणं सुपरहिट झाल्यावर आम्हाला कार्यक्रमांना बोलावलं जायचं. अशाच एका रसिकाने त्याच्या मुलाच्या लग्नाला बोलावलं असताना आम्ही दरवाजातून प्रवेश करत असताना पाहून बँडवाल्यांनी ‘भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी’ हे गाणं बँडवर वाजवायला सुरुवात केली. आम्ही यजमानांना म्हणालो की, ‘‘हे गाणं का वाजवलं आज? या दोघांचं आजच लग्न होत आहे.’’ ते म्हणाले, तुम्हाला त्यांनी ओळखलं म्हणून तुमचं गाजलेलं गाणं वाजवून त्यांनी तुमचं स्वागत केलं.
1926 साली जी. एन. जोशी यांनी ‘रानारानात गेली बाई शीळ’ हे भावगीत गायलं आणि भावसंगीत असा एक नवा मार्ग मराठी संगीतसृष्टीत सुरू झाला. त्यानंतर गजाननराव वाटवे, ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा, मालती पांडे अशा अनेकांनी भावसंगीतामध्ये मोठं काम करून ठेवलं. त्यानंतरचे सर्वात लोकप्रिय ठरलेले भावगीत गायक म्हणजे अरुण दाते म्हणता येतील. भावसंगीतामध्ये शब्दांना जास्त महत्त्व असतं.
शब्द दर्जेदार असतील तर ते गाणं गायलाही मजा येते असं त्यांचं मत होतं. ते कायमच शब्दांना महत्त्व देत असत. कविता आवडली तरच ते गाणं गायला पसंती देत असत. चित्रपट गीत गाणारे गायक खूप लोकप्रिय होतात, परंतु बिगर चित्रपट गीत गाऊन प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या अरुण दाते यांनी संगीत क्षेत्रात भावगीत मार्ग समृद्ध केला आहे. याच गाण्याची आठवण म्हणजे 1978 साली नानासाहेब गोरे इंग्लंडचे कमिशनर असताना त्यांनी अरुण दाते यांचा कार्यक्रम लंडन येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला बीबीसी वृत्तसंस्थेचे काही लोक आले होते. त्यांनाही गाणी आवडली आणि त्यांनी ‘भातुकलीच्या खेळामधले…’ आणि ‘या जन्मावर…’ ही दोन गाणी रेकॉर्ड करून वृत्तवाहिनीवर त्याचं वृत्त केलं होतं. त्यांनी त्यावर त्यांना विचारलं की, ‘‘आपल्याला मराठी समजत नसूनही आपल्याला ही गाणी कशी आवडली?’’ त्यावेळी ते म्हणाले होते की, फक्त दोन वादक आणि एक गायक गातोय…सलग अडीच तास आणि लोकही मंत्रमुग्ध ऐकून त्याचा आस्वाद घेत आहेत असं दृश्य आम्ही कधीच पाहिलं नाही. त्यामुळे आम्ही या गाण्यावर स्टोरी केली. मराठी नसूनही आवडून जाणारं हे गाणं आज पन्नास वर्षांचं झालं आहे.
…आणि म्हणूनच अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते यांनी या गाण्याच्या पन्नाशीच्या निमित्ताने भावगीत गायन स्पर्धेचे आयोजन केलं आहे. पाडगावकरांचे सुपुत्र, देवांचे पुतणे आणि अतुल दाते यांनी मिळून ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या दोन गायक-गायिकांना ते आपल्या कार्यक्रमांमधून गाण्याची संधी देणार आहेत. त्यामुळे मराठी भावगीताची परंपरा पुढे चालू राहील हा त्यामागचा हेतू आहे. एका गाण्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भावगीताकडे नवी पिढी आकर्षित व्हावी यासाठीचा हा उपक्रम स्वागतार्ह म्हणायला हवा.
























































