
राज्यकर्त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण देश दुष्काळात भरडला गेल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? ही कर्मकथा आहे 1958 सालच्या चीनमधील आणि या कथेचा खलनायक होता चीनचा तत्कालीन सर्वेसर्वा माओ त्से-तुंग.
देशाचा कारभार हातात घेताच या महाशयांनी ‘फोर पेस्ट कॅम्पेन’ अर्थात ‘चार कीटकांची मोहीम’ अशा नावाची मोहीम सुरू केली. त्यांच्या दाव्यानुसार माश्या, उंदीर, डास आणि चिमण्या या पिकांचे अतोनात नुकसान करतात आणि शेतकऱ्याचे सर्व प्रयत्न, मेहनत व्यर्थ घालवतात. शेतकऱ्याचे श्रम कामी येण्यासाठी आणि अन्नधान्य उत्पादनात वाढ होण्यासाठी या चार प्राण्यांचा पूर्ण नायनाट करणे अत्यंत गरजेचे होते. या प्राण्यांना मारणाऱ्यांसाठी इनामदेखील घोषित करण्यात आले.
मोहिमेची सुरुवात मोठी धडाक्यात झाली. लोकांनी दिसेल तिथे या प्राण्यांना मारण्यास सुरुवात केली. त्यातल्या त्यात उंदीर, माश्या, डास हे सहज सापडणे अशक्य. ते स्वतःला झटकन लपवून घेत असत, पण लहानग्या चिमण्या मात्र स्वरक्षणात अपुऱ्या पडल्या आणि हजारोंच्या संख्येने मारल्या गेल्या. लोकांनी चिमण्यांना तर मारलेच, पण त्यांची अंडी फोडली, घरटीदेखील उद्ध्वस्त केली.
हजारोंच्या संख्येने चिमण्या नाहीशा झाल्या आणि त्यांचे मुख्य भक्ष्य असलेले टोळ सुरक्षित झाले. टोळांची संख्या बेसुमार वाढली आणि त्यांच्या टोळधाडींनी जवळपास सर्व पिके पूर्णपणे नष्ट झाली. अखेर 1960 साली चिनी पक्षी अभ्यासक शो-शिन चेंगने चिमण्यांचे महत्त्व माओला पटवून दिले आणि मोहीम थांबविण्याची विनंती केली. माओ त्से-तुंगला आपल्या चुकीची जाणीव होईपर्यंत खूप उशीर झाला होता. चीनमध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला आणि उपासमारीने लाखो लोकांचा मृत्यू झाला. एक चुकीचा निर्णय संपूर्ण देशाला संकटात कसा टाकू शकतो त्याचे हे एक उत्तम उदाहरण.
स्पायडरमॅन



























































