ठसा : मारुतीराव पिंपरे

61

>> प्रशांत गौतम

प्रतिभावंत चित्रकार मारुतीराव पिंपरे यांची ओळख अजिंठय़ाची प्रतिसृष्टी निर्माण करणारा कलावंत अशी होती. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील कालप्रवाहात नामशेष होत असलेल्या चित्रकृतींना पुनरुज्जीवित करण्यासाठी पिंपरे यांनी आपल्या आयुष्याचे अर्धे शतक खर्ची घातले. मराठवाडय़ातील या कलावंताने पुण्यात नुकताच अखेरचा श्वास घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास विभागात कार्यरत असतानाच त्यांनी अजिंठा येथील चित्रकृतीवर काम करण्यास सुरुवात केली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी दोन हजार वर्षांपूर्वीच्या येथील लेण्यांमधील चित्रांना नव्याने साकारण्याची अजोड किमया साध्य केली. देशाचे वैभव जतन करण्याचे त्यांचे कार्य खरोखरच अद्वितीय म्हणावे लागेल. त्यांच्या या योगदानामुळे 350 शिल्पचित्रांना जीवदान मिळू शकले, मात्र अजिंठा चित्रकृतींचे भव्य दालन निर्माण करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. अजिंठा येथील कलाकृतींना दोन हजार वर्षांपूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी मारुतीराव 35 वर्षांपासून कार्यरत होते. हिंदुस्थानी पुरातत्व विभागाच्या सहकार्याने कामही सुरू झाले होते. इतकेच नाही तर अजिंठा येथील लेण्यांतील पेंटिंग आणि कलाकुसर ही पिंपरे यांच्याच मार्गदर्शनाखाली पुनरुज्जीवित करण्याचे कामही सुरू झाले होते. पिंपरे यांनी या काळात अजिंठय़ावर शेकडो पेंटिंग्ज तयार केली. त्यांचे प्रदर्शनही जपान, थायलंड अशा देशांत भरविण्यात आले होते. अजिंठय़ाचे चित्र जसे आहे तसे रंगवावे असा सरकारी आदेश असला तरी पिंपरे आपल्या चित्रशैलीतून ती कलाकृती हुबेहूब साकारत. अजिंठा चित्रकृतीविषयी लोकांच्या मनात एवढय़ा दिवसांपासून एक प्रतिमा निर्माण झालेली असते. त्यात आलेला खराबपणा, जीर्णशीर्णपणा लोकांना सहसा आवडत नाही. दोन हजार वर्षांपूर्वीचे चित्र कसे असावे याची ते कल्पना करतात आणि जास्तीत जास्त नावीन्य, ताजेपणा देण्याचा प्रयत्न पिंपरे यांनी केला. त्यांनी 350 अजिंठा चित्रे रंगवली. देशभरात असे उदाहरण कदाचित अपवादानेच असावे. उदगीर गाव असलेले पिंपरे लहानपणी शालेय सहलीच्या निमित्ताने अजिंठय़ास आले. तेव्हापासूनच अजिंठा चित्रशैलीने विलक्षण प्रभावित झाले. शिक्षण घेत असतानाच्या काळात त्यांनी अजिंठा शैलीची चित्रे निर्माण करण्याचा संकल्प केला. पुढील काळात या संकल्पास जी. डी. आर्टमुळे दिशा मिळाली. पुरातत्व खात्यात सेवेत असतानाच अजिंठा चित्रशैलीचा व्यासंग नि अभ्यास वाढला. जो 84 व्या वर्षी थांबला. उदगीर, संभाजीनगर, पुणे असा त्यांचा प्रवास सांगता येतो. ते कुठेही असले तरी त्यांचे लक्ष अजिंठा चित्रकृतीवर कायम असायचे. काळाच्या प्रवाहात धुसर झालेली अजिंठा लेण्यांतील चित्रे अभ्यासून मूळ चित्रांशी साधर्म्य सांगणारी असंख्य चित्रे मारुतीरावांनी जीव ओतून साकारली. रेखीव चित्रकृतींना त्यांनी उत्तम रंगसंगती दिल्याने त्यांची ख्याती जगभरात पोहचली होती. अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी आर्ट गॅलरी निर्माण केली. गॅलरीतील चित्रप्रदर्शनास जपान, कोरिया, चीन देशांतील पर्यटक भेट देत व आवडीचे चित्र खरेदीही करीत असत. पिंपरे यांच्या योगदानाची नोंद राज्य शासनाने घेतली होती. एवढेच नव्हे तर ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी शिफारसही केली होती. मे महिन्यात बँकॉक येथे त्याच्या चित्रकृतींचे प्रदर्शनही भरविण्यात येणार होते. डिसेंबर महिन्यात मराठवाडा विद्यापीठात चीनचे परराष्ट्रमंत्री वॅग आले होते. तेव्हा पिंपरे यांनी त्यांची भेट घेतली व चीनमध्ये अजिंठा चित्रशैलीची प्रतिसृष्टी निर्माण करावी अशी सूचना केली होती. वॅग यांनी त्यास सहमती दर्शवली होती, परंतु पिंपरे यांच्या निधनाने हा प्रकल्प अपूर्ण राहिला. अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी अजिंठा चित्रकृतींचे भव्य दालन असावे अशी पिंपरे यांची बऱयाच दिवसांपासूनची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींची कार्यालयात भेट घेतली होती. आज जगभरातून पर्यटक अजिंठा लेणीस भेट देण्यासाठी येतात. मात्र तेथील चित्रे आता पूर्वीसारखी अस्तित्वात नाहीत. अजिंठा लेणीची शिल्पचित्रे बघायची असतील तर पिंपरे यांच्या घरी बघावी लागतील. गॅलरीचा प्रस्ताव शेवटपर्यंत प्रत्यक्षात आला नाही पिंपरे यांच्या निधनाने अजिंठा लेणीचा एक आधारस्तंभच उन्मळून पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या