
– दिलीप जोशी ([email protected])
गणित, म्हटलं तर अगदी सोपा आणि नाहीतर अतिशय कठीण विषय. ज्यांना गणित जमतं त्याला ते एखाद्या कवितेइतकंच रम्य वाटतं. बाराव्या शतकातील आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध खगोल अभ्यासक भास्कराचार्य उत्तम गणितीसुद्धा होते. म्हणूनच ते खगोलीय गणिताचा सूक्ष्म अभ्यास करू शकले. त्यांनी अंकगणित हा विषय त्यांच्या कन्येसाठी लिहिलेल्या ‘लीलावती’ या पुस्तकातून अनेक व्यावहारिक उदाहरणं आणि रंजक पद्धतीने मांडला. त्यांचं गणिताचं हे पुस्तक पुढे मध्य हिंदुस्थानात शेकडो वर्षे पाठय़पुस्तक म्हणून मान्यता पावलं. काव्य आणि गणित यांचा सुंदर मिलाफ या पुस्तकातल्या श्लोकरूपी गणितांमध्ये आढळतो. भास्कराचार्यांनी बीजगणित, अंकगणित (लीलावती), गोलाध्याय (भूमिती) आणि गणिताध्य असे एकूण चार गणितविषयक ग्रंथ लिहिले. त्यांच्या ‘सिद्धांतशिरोमणी’ या ग्रंथात या सगळय़ाचा समावेश आहे. शूल्वसूत्र, आर्यभटीय, सिद्धांतशिरोमणी अशा अनेक प्राचीन हिंदुस्थानी ग्रंथांतून गणिताचा विचार आढळतो. शकुंतलादेवी या ‘मानवी कॉम्प्युटर’ मानल्या गेलेल्या गणितज्ञ प्रचंड आकडेमोड काही क्षणात वैदिक गणिताच्या आधारे करीत असत.
आपल्या देशाची गणिताची प्रगती एकेकाळी असामान्य होती. इतकी की, एकदा एक प्रसिद्ध व्यक्ती विदेशातील प्रसिद्ध वैज्ञानिकाला भेटली तेव्हा तो चटकन म्हणाला की, ‘गणितातलं तुमच्या देशाचं योगदान शून्य आहे.’ हे ऐकताच या व्यक्तीला साहजिकच राग आला. मग तो शास्त्र्ाज्ञ हसून बोलला, ‘अहो, गणितातला सर्वात महत्त्वाचा ‘शून्या’चा शोध तुमच्याच देशात लागला हे मोठं योगदान नव्हे?’ आज राष्ट्रीय गणितदिनाच्या निमित्ताने हे सारं सुचलं.
तर जागतिक गणिताला ‘शून्य’ संकल्पना देणाऱ्या आपल्या देशात नंतरच्या काळातही उत्तम गणिती निर्माण झाले. केंब्रिजची गणितातली ‘रँगलर’ पदवी प्राप्त करणारे पहिले हिंदुस्थानी आपल्या महाराष्ट्रातलेच र. पु. परांजपे. विसाव्या शतकाच्या आरंभी ते ‘रँगलर’ होताच त्यावेळच्या ब्रिटिश व्हाइसरॉयने खार-तार (टेलिग्राम) करून त्यांचं अभिनंदन केलं. त्यांच्या स्वागताचा माहितीपटही त्या काळात तयार झाला होता, असं वाचलेलं आठवतं.
गणित या विषयाची अत्यंत आवड असलेले हिंदुस्थानी नेते म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांचे वडील गणिताचे शिक्षक आणि गणितावर पुस्तक लिहिणारे होते. त्यामुळे घरातच ‘गणिती’ वातावरण होतं. एकदा टिळकांना, कालांतराने कोणीतरी विचारलं की, ‘तुम्ही राजकारणात आला नसतात तर काय केलं असतं?’ क्षणाचीही उसंत न घेता टिळक उद्गारले, ‘गणिताचा प्राध्यापक झालो असतो.’ याच त्यांच्या गणितविषयक आवडीतून त्यांनी खगोलशास्त्राचाही अभ्यास केला होता. नंतरच्या काळात गणितात प्रावीण्य मिळवणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. खगोलशास्त्र्ाज्ञ प्रा. जयंत नारळीकर (आणि त्यांचे वडीलही), ‘रँगलर’ झाले. मंगलाबाई नारळीकरही गणितज्ञच. गणिताचा अभ्यास करून परदेश गाजवणाऱ्या हिंदुस्थानी आणि मराठी माणसांची संख्या बरीच आहे.
तरीसुद्धा गणिताकडे पाहण्याचा एकूण दृष्टिकोन ‘कठीण’ विषय असा दिसतो. मलाही शालेय जीवनात गणितापेक्षा भाषा, इतिहास, विज्ञान हे विषय अधिक आवडायचे. गणितात आमची गणती ‘ढ’ अशीच व्हायची. माझ्या परिचयातल्या दोन व्यक्तींच्या गणिताबाबतच्या दोन गोष्टी आठवतात. एकाची एसएससीला गणितात ‘दांडी’ उडाली. तेव्हा तो विषय सोडून एसएससी होता यायचे. म्हणून हे चिरंजीव नंतर पास झाले आणि आर्टस् कॉलेजात गेले. तिथे मात्र अर्थशास्त्रात सोशल (ऑनर्स) करताना अचानक शंभर मार्कांचं गणित सामोरं आलं. त्यावेळी मात्र जिद्दीने, नोकरी करत शिक्षण घेत असूनही कुठलाही ‘क्लास’ न लावता ‘गणित’ सुटलं! कारण तोपर्यंत या विषयात रुची निर्माण झाली होती.
दुसरं उदाहरण असंच. चौथीच्या परीक्षेत गणितात शंभरपैकी फक्त ‘चार’ गुण मिळवलेला विद्यार्थी पुढे आत्मविश्वासाने गणिताचा नावाजलेला प्राध्यापक झाला. थोडक्यात गणिताबद्दलचा ‘टॅबू’ (धास्ती) मनातून गेली तर गणित नक्की जमतं. माझ्या वडिलांचं गणित उत्तम होतं. त्यांना पन्नासपर्यंतचे पाढे (टेबल्स) आणि पावकी, निमकी, सवायकी, दीडकी, औटकीसुद्धा पाठ होती. आता ‘पाढे’ हीच पाठांतराची संकल्पना गेल्याने ‘पावकी-निमकी’ वगैरे इतिहासजमा झाले. पण गणिताच्याच एका प्राध्यापकाने सांगितले की, किमान तीसपर्यंतचे ‘पाढे’ पाठ असले तर एवढय़ातेवढय़ा हिशेबासाठी ‘कॅल्सी’ ऊर्फ (कॅल्क्युलेटर) लागणार नाही. जुनं ते सगळंच सोनं असं नका म्हणू पण जुन्यातलं ‘सोनं’ टिकवायला काय हरकत आहे?
शेवटी एक गंमत. या ‘पावकी, निमकी’प्रमाणे ‘पाउैणकी’सुद्धा असायची. आमचे एक मास्तरजी मजेने शिकवायचे. एक पावणे पावणे, बे पावणे दीड आणि तीन पावणे सवादोन असे ‘पाऊण’ पटीत तीन वेळा सवादोन होतात ते सांगून गुरुजी म्हणायचे, ‘पण घरी तीन पावणे (पाहुणे) आले तर ‘सवादोन’ म्हणू नका.’ मुलं हसून दाद द्यायची आणि पाऊणकी लक्षात राहायची. थोडक्यात काय, गणित कठीण न करता सोपं केलं तर त्यासारखा सुंदर अभ्यास विषय नाही. कधी काळी गणितात ‘शून्य’ असणारेही अभ्यासाने शंभरपैकी शंभर होऊ शकतात.

























































