आभाळमाया – मंगळावरील मिथेन

491

>> वैश्विक ([email protected])

चंद्राइतकंच माणसाचं लक्ष शेजारच्या मंगळाकडे लागलंय. उद्याच्या वसाहतीच्या दृष्टीने आपल्या सूर्यमालेतला तो सर्वात अनुकूल ग्रह. त्याच्याविषयी अनेकांच्या अनेक कल्पना आहेत. प्राचीन समजुतीनुसार हा ‘लाल’ दिसणारा ग्रह ‘उग्र’ आहे, परंतु मंगळपृष्ठावरील दगड-मातीतल्या लोहाच्या अधिक प्रमाणामुळे तो लाल दिसतो आणि प्रत्यक्षात त्याचं स्वरूप पृथ्वीपेक्षाही थंड आहे. याचं कारण म्हणजे तो सूर्यापासून पृथ्वीपेक्षा सात कोटी किलोमीटर दूर आहे. मात्र तो साधारण पृथ्वीएवढाच व पृथ्वीसारखा टणक पृष्ठभागाचा ग्रह असल्याने आणि तेथे पूर्वी कदाचित जीवनिर्मिती झाली असल्याने त्याची निवड भविष्यातील नवे वसतिस्थान म्हणून करता येईल, असे संशोधकांना वाटते. त्याहीपुढे जाऊन इलॉन मस्कसारख्यांनी तर चंद्र-मंगळ पर्यटनाचे संभाव्य कार्यक्रम आखून या संशोधनाला व्यावसायिक रूप देण्याचं ठरवलेलं दिसतं.

हिंदुस्थानची अवकाश संशोधन असलेल्या ‘इस्रो’नेही ‘मंगलयाना’द्वारे मंगळाचा शोध घेण्याचे ठरविले आहेच. आपल्या चांद्रयान-2 वरील लॅण्डर ‘विक्रम’चे अवतरण सुखरूप झाले नसले व त्यातील रोव्हर ‘प्रज्ञान’चे अपेक्षित कार्य घडले नसले तरी त्यांचं नेमकं काय झालं हे एव्हाना शास्त्र्ाज्ञांना समजलेलं असेल. या अखेरच्या टप्प्यातील अपयशापेक्षा ‘इस्रो’ने केलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे मोल महत्त्वाचे आहे हे सर्वांनीच मान्य केले आहे. अपयशावर चिंतन करून आपले पुढचे चंद्र, मंगळ तसेच सूर्याकडे जाणाऱया ‘आदित्य’ यानाच्या प्रक्षेपणाच्या वेळी योग्य ती काळजी घेतली जाईलच यात शंका नाही.

यावेळी मंगळावर सापडलेल्या मिथेन वायूविषयी थोडेसे मंगळावरील वातावरणही पृथ्वीसारखे दाट नाही. तिथल्या विरळ वातावरणात 95 टक्के कार्बनडायऑक्साईड, अडीच टक्के नायट्रोजन आणि अगदी अत्यल्प म्हणजे अवघा 0.13 टक्के ऑक्सिजन आहे. उद्या मंगळावर वसाहत करायची तर पाणी असावे लागेल आणि त्यासाठी हायड्रोजन-ऑक्सिजनही असावा लागेल. पाण्याचे विपूल साठे तिथे सापडले तर त्याचे विघटन करून हायड्रोजन, ऑक्सिजन मिळवता येईल.

परंतु ते जलसाठे तेथे आहेत का? मंगळपृष्ठाचे निरीक्षण करताना गॅलिलिओच्या काळात तेथील पृष्ठभागावर पर्वतरांगांमध्ये पृथ्वीवरही आढळतात तशा घळी दिसल्या. त्याला इटालियन भाषेत ‘कनाली’ म्हटले गेल्याने  तेथे ‘कॅनॉल’ किंवा पाण्याचे कालवे एकेकाळी असावेत असा समज पसरला. नंतरच्या काळात तर मंगळावर अनेक ‘प्रोब’ (संशोधन यानं) पोहोचली त्यांना काही त्या ‘घळीं’मध्ये पाणी आढळलं नाही.

मात्र मंगळावर पूर्वी माणसं राहत होती व तेथे मानवी चेहेऱयाचे विशाल शिल्प आहे इथपासून ते त्यांच्या पृष्ठभागाखाली ‘लिटल ग्रीन मेन’ राहतात अशा कल्पनांना पंख फुटले. 1930 च्या दशकात एच. जी. वेल्स यांच्या याच नावाच्या काल्पनिक कादंबरीचे सादरीकरण अमेरिकन रेडिओवरून झाले. त्यावेळी हे लाल मंगळावरचे बुटके हरित-प्राणी पृथ्वीवर आक्रमण करतील असं अनेक भाबडय़ा लोकांना खरं वाटलं. इतकं त्या कथेचं सादरीकरण प्रभावी होतं.

अर्थातच तसं काही झालं नाही आणि अंतराळ भ्रमण करणारी यानं माणूस पाठवू लागला तेव्हा मंगळाचं जवळून दर्शन झालं. तिथे भयप्रद असं काहीच नव्हतं. गेल्या काही दशकांत तर ‘पाथफाइण्डर’सारखे ‘रोव्हर’ मंगळावर पोचले. त्यातून मंगळाची अधिक ओळख पटली. अशाच एका प्रयत्नात युरोपीय स्पेस एजन्सीने ‘मार्स एक्प्रेस ऑर्बिटर’ पाठवलं. ते मंगळाभोवती फिरताना व त्याचा सूक्ष्म वेध घेताना त्याला मंगळावरील ‘गेल’ या विवरापासून 30 किलोमीटर पूर्वेला ‘मिथेन’ नावाचा वायू आढळला. त्यालाही आता बराच काळ लोटला आहे.

मात्र 96 किलोमीटर व्यासाच्या आणि मंगळाच्या विषुववृत्ताजवळ सापडलेल्या ‘मिथेन’ने तिथे एकेकाळी सजीव सूक्ष्मावस्थेत तरी असावेत याची शक्यता बळावली. कारण मिथेन हा अल्पजिवी, पण ज्वालाग्रही वायू कुजलेल्या ‘बायोमास’ अथवा जैविक कचऱयातून तयार होतो. तो माणसासाठी घातक आहे. आपल्याकडे ‘मॅनहोल’मध्ये तो सापडत असल्याने तेथे काम करणाऱयांना ‘मास्क’ घालून काळजी घ्यावी लागते.

‘बायोमास’मधून हा वायू निर्माण होत असल्याने एकेकाळी मंगळावर वनस्पती किंवा शेवाळासारख्या पसरणाऱया सूक्ष्म वनस्पती होत्या का? आणि असतील तर त्यांच्या वाढीसाठी लागणारं पाणी तिथे होतं का? त्यात ‘मिथेनोजेन्स’मुळे सूक्ष्मसजीवांचा अंदाज येईल का? दुसरी गोष्ट म्हणजे ‘मिथेन’ वायू सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होणारा असल्याने ‘नासा’च्या ‘क्युरिऑलिटी रोव्हर’ला किंवा इतर कोणत्या संशोधनात आणि तुलनेने अलीकडच्या काळात ‘मिथेन’ आढळला असेल तर तो ‘ताजा’ म्हणायला हवा. किंवा त्याचे साठे मंगलपृष्ठाखाली कुठेतरी दडलेले असावेत आणि एखाद्या विवरातून वायू वर येत असावा. ‘गेल’ विवराजवळचं नोंदलेलं निरीक्षण तेच सांगतंय. मिथेन तयार होण्याच्या ‘सर्पन्टायनिझेशन’ प्रक्रियेसाठी भूगर्भातील उष्णतेबरोबरच पाणीही गरजेचं आहे. मग मंगळाच्या धुवीय भागात बर्फाच्या टोप्या (कॅप) आहेत तसं भूपृष्ठाखाली पाणी दडलेलं आहे का?

या अनेक प्रश्नांच्या निश्चित उत्तरांमधून मंगळाचं रूप आपल्याला अधिकाधिक समजत जाईल. येत्या काही वर्षांत हे संशोधन वेग घेईल आणि मंगळ माणसासाठी म्हणजे तिथे जाऊन राहण्यासाठी किती उपयुक्त आहे ते ठरेल. मानवी वस्तीच्या ‘मंगळ-तोरणा’चं भवितव्य अशा संशोधनावरच अवलंबून आहे.

आपली प्रतिक्रिया द्या