आभाळमाया : अवकाशयात्रेचा परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाशात  जाऊन परत येणार्‍या अवकाशयात्रींच्या शरीरावर, मनावर नेमका काय परिणाम होतो याचा अभ्यास अगदी सुरुवातीपासून अवकाशयात्रांमध्ये केला गेला. त्यासाठी ‘लायका’ नावाचे श्वानसुद्धा अंतराळात पाठविण्यात आले. पुढे अनेक देशांचे अंतराळयात्री, अवकाशविहार करून येऊ लागले. स्पेस स्टेशनवर बराच काळ राहू लागले. निर्वात, वजनरहित अवस्थेत खूप काळ घालवू लागले तेव्हा मानवी शरीरावर या प्रवासाचा कोणकोणत्या प्रकारे परिणाम होतो याचा प्रयोग आणि परीक्षणाची कक्षा वाढत गेली.

या अभ्यासामागचा उद्देश पुढील काळात ‘स्पेस फ्लाइट’मधून प्रवासी न्यायचे असतील किंवा चंद्र-मंगळावर वसाहती करण्याचा विचार असेल तर पृथ्वीच्या वातावरणाला लाखो वर्षे सरावलेल्या प्राण्यांवर आणि त्यातही माणूस नावाच्या प्राण्यावर या अंतराळगमनाचा परिणाम असून समजणं गरजेचं होतं. पृथ्वीवरचे काही सूक्ष्म जीव माणसाबरोबर अंतराळात (चंद्रावर वगैरे) गेले तर अथवा अंतराळात काही सूक्ष्म (एकपेशीय) जीव असले आणि ते अंतराळयात्रींबरोबर पृथ्वीवर आले तर? असे अनेक प्रश्न होते. म्हणूनच नील आर्मस्ट्राँग, एड्विन ऑल्ड्रिन वगैरे पहिले चांद्रवीर पृथ्वीवर परतले तेव्हा त्यांना काही काळ विशेष खोलीत (क्वारेन्टाइनमध्ये) घालवावा लागला. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष निक्सन आणि या चांद्रवीरांची पहिली भेट बंद काचेआडूनच झाली.

अंतराळयात्रेत असे प्रयोग करण्यासाठी आधुनिक वैद्यकीय आणि संशोधन करणारी व अंतराळात जाण्यास सक्षम असणारी व्यक्ती असणं गरजेचं असतं. मेडिकल क्षेत्रातील संशोधक आणि जीवशास्त्रीय संयुगांचा विशेष अभ्यास असलेल्या मिली ह्युजेस-फुलफोर्ड अशाच योग्य अंतराळवीर ठरल्या.

अमेरिकेतील टेक्सास राज्यात १९४५ मध्ये जन्मलेल्या फुलफोर्ड यांनी टालॅटन विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी घेतली. नंतर त्यांनी डॉक्टरेटही मिळवली. त्यानंतर त्या डॅलास येथे मेडिकल स्कूलमध्ये काम करू लागल्या. त्यांचे अस्थी आणि कॅन्सर याविषयीचे १२० शोध निबंध (पेपर) प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्या अमेरिकन लष्करात मेजर म्हणून दाखल झाल्या.

१९८३ मध्ये त्यांची ‘नासा’तर्फे अंतराळयात्रींच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आणि १९९१ मध्ये त्यांना पहिल्या स्पेसलॅब प्रकल्पात अंतराळयात्रेची संधी मिळाली. अंतराळातील नऊ दिवसांच्या वास्तव्यात त्यांनी ऑस्टिओब्लास्ट किंवा हाडातील पेशींच्या वाढीवर विशेष संशोधन केलं. या संशोधनावर आधारित प्रयोग पुढच्या अंतराळयात्रांमध्येही सुरू राहिले. अंतराळात जाणार्‍या माणसांच्या ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांची क्षमता कमी होऊन ती ठिसूळ होण्याचा विकार का आणि कसा जडतो याचा सांगोपांग अभ्यास फुलफोर्ड यांच्या संशोधनामुळे झाला. अतिशय नगण्य गुरुत्वाकर्षणाच्या जागेत अंतराळयात्रींच्या शारीरिक ऍनॅबोलिक सिग्नलमध्ये (चयापचयातील शरीर सक्षम करणार्‍या चयक्रियेत) काय फरक होतो याची नोंद केली गेली.

कोलेस्टेरॉल चयापचय आणि टी-सेल जीन संशोधन केल्यावर अपोलो यानातून गेलेल्या अंतराळयात्रींना झालेल्या शारीरिक समस्येचा उलगडा झाला. फुलफोर्ड यांच्या अशा प्रकारच्या मूलभूत संशोधनासाठी त्यांना अनेक सन्मान लाभले. स्पेस मेडिसीन आणि रिसर्च कौन्सिलचं सभासदत्व त्यात महत्त्वाचं होतं. महिला अंतराळयात्रींनी वेगवेगळ्या काळात विविध स्पेस मिशनमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्यांचं आजचं संशोधन हाच उद्याच्या सर्वसामान्यांच्या स्पेस वारीसाठीचा पाया ठरणार आहे. कारण एलॉन मस्कसारखे उत्साही लोक चंद्र-मंगळावर पर्यटक घेऊन जायला उत्सुक आहेत. सध्या तरी फक्त अंतराळ फेरफटका मारून पृथ्वीवर परतण्याइतकाच उत्साह बहुतेक संभाव्य अंतराळ प्रवाशांमध्ये दिसतोय, पण काळ वेगाने बदलतोय. उद्याची सिद्धता आजच करावी लागतेय. त्यासाठीच असे प्रयोग गरजेचे असतात. पे-लोड स्पेशॅलिस्ट फुलफोर्ड यांची कामगिरी म्हणूनच महत्त्वाची.

[email protected]