लेख : मूड पावसाचे

159

>> दिलीप जोशी 

दरवर्षीचा पाऊस नवा असतो. नवी अनुभूती देणारा असतो. हल्ली पावसाचं आगमन आणि एकूणच वर्तन गूढ झालंय. अन्यथा पावसाचेही मूड असतात. झिमझिमणारा पाऊस, टिपटिपणारा पाऊस, धो धो कोसळणारा पाऊस, टप टप बरसणारा पाऊस. क्षणात चिंब करून काही काळ गायब होणारा पाऊस. अशावेळी आकाशातली मेघांची दाटी, त्यांचे वाऱ्याच्या तालावर बदलते आकार आणि मध्येच त्याचं डरकाळ्या फोडत परस्परांवर टकरणं आणि त्यातून उमटणारं विजेचं लखलखतं तांडव. चौमासातला पावसाचा हा खेळ मृग नक्षत्रापासून सुरू होतो तो हस्त नक्षत्राला संपतो. म्हणजे पारंपरिक अनुभवाने त्याचा हा हंगाम ठरलेला आहे. आता क्लायमेट चेंजच्या काळात सगळंच ऋतुचक्र बदलतंय. त्याला पाऊस तरी काय करणार?

पावसाचा लहरी आणि करारी स्वभाव लक्षात घेऊनच महाकवी कालिदासाने ‘मेघदूत’ लिहिलं. क्षितिजावरच्या मदोन्मत्त हत्तींसारख्या दिसणाऱ्या मेघांच्या टकरी पाहून आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याने या मेघाबरोबरच प्रियतमेला संदेश पाठवला. तोपर्यंतच्या महाकाव्यातले संदेश पक्ष्यांकरवी जायचे. मेघाला व्यक्तित्व देणाऱ्या कालिदासाची प्रतिभा विलक्षणच. तर या आषाढाचा आरंभ तीन तारखेलाच झालाय. कालिदासाच्या काळात मेघाचे आणि यक्षाचेही भावविभ्रम येतात. ते एकूणच माणूस आणि निसर्ग यांचे नाते सांगणारे.

पावसाळा सुरू झाला की, आपण सामान्य माणसंही आपापल्या पद्धतीने त्यांचं स्वागत करतो. आस्वाद घेतो. वयानुसार त्याच्या आगमनाचे ‘मूड’ आपल्याला जाणवतात. ‘बाळपणीचा काळ सुखाचा’ असतो. तेव्हा ‘पाऊस आला सवंगडय़ांनो, जलधारा पडती, रिमझिम जलधारा पडती म्हणत त्या पावसात अगदी सर्दी होईपर्यंत बागडण्याचे दिवस असतात. सभोवताल स्वच्छ असताना पूर्वी डबक्यातलं पाणी परस्परांच्या अंगावर उडवून शर्टवर चिखलाच्या चार डागांनी गोंदण तर प्रत्येक जण करायचा. आता गतिमान जीवनात तेवढा वेळ नसतो.

वय वाढत जातं तसं आपल्या पावसाचं वयही वाढतं. बालपणीचा पाऊस आपल्यासारखाच खटय़ाळ, उनाड, मनाला येईल तसं वागणारा असतो, तर तरुणपणीचा पाऊस गहिरा होतो. पाऊस तोच, पण आता तो कुणाची तरी साद घेऊन येतो. हिंवस, धूसर, ओलेतं वातावरण आणि त्यात प्रिय व्यक्तीचा सहवास. कुणा प्रियकराला ते क्षण जन्मभर विसरता येत नाहीत. ‘धुंद वादळाची होती, रात्र पावसाची, भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची’ अशा आठवणी कायम मनात रेंगाळतात. तर कोणी ‘जिंदगीभर नहीं भुलेगे वो बरसात की रात, एक अन्जान हसीना से मुलाकात की रात’ असं मनाशी आळवत राहतो. पहिल्या पावसाने प्रेमाचे अपूर्व दान अनेकांच्या ओंजळीत ओतलेलं असतं. सहवासाची ओढ वाढवणारा पाऊस विरही जनांना मात्र व्याकूळ करतो. तेच मेघ, तोच धुवांधार नजारा, तसाच अंधारलेला दिवस… कुणाला त्यात सर्वसुखाची बरसात गवसते तर विरही यक्षाला मेघदूतकडून प्रियतमेला सांगावा द्यावासा वाटतो. कुणी विरहिणी ‘झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात, प्रियाविण उदास वाटे रात’ म्हणून भरपावसात तनामनाची तगमग अनुभवत असते नि पावसाला साकडं घालते की, ‘बरस असा की प्रिया न जाईल माघारी दारात’.

अनेक महाकाव्यं, भावगीतं, सिनेगीतं यातून कित्येक कवींनी पावसाचे आणि तो अनुभवणाऱ्या माणसांचे मूड साकारलेत. काही वेळा या पाऊसधारा व्याकूळ करतात. कातरवेळी बरसणारा पाऊस बाहेरचा आणि मनातलाही अंधार काही वेळा अधिक गडद करतो. अशा सांजवेळी दूरस्थ प्रियजनांची आठवण मनाला हुरहूर लावते. जलधारा डोळय़ांतही उमटवते.

पावसाळी पर्यटनाला निघालेला मात्र पाऊस मजा आणतो. त्याची तडतडती झड अंगावर घेत दऱ्याडोंगराच्या मार्गाने चालताना तर मौज असते. कडेकपारीतून लहान-मोठे ओहोळ आणि धबधबे फुटलेले असतात. सेल्फीचा नाद सोडून सावधपणे या निसर्गाशी संवाद साधत केलेली पदयात्रा मनाला भरभरून उभारी देते. गेली अनेक वर्षे आम्ही काही जण याचा अनुभव घेतोय. चाळीस वर्षांत अनेक गडकिल्ले, अवघड वाटांचे डोंगर पाहून झालेत. सावधपणे काळजी घेत नुसत्या डोळय़ांनी निसर्गाचा आस्वाद घेताना त्याच्याशी एकरूप होता आलं पाहिजे. आमच्या या असंख्य ‘ट्रेक’चे सुरक्षित जागी काढलेले फोटो आहेतच, पण त्यापेक्षाही त्या क्षणांची असंख्य चित्रं मनात ताजी आहेत. आम्हा ‘साठी’पार तरुणांचा हा सिलसिला अजूनही थांबलेला नाही.

पण 26 जुलैसारखा अक्राळविक्राळ पाऊस साऱ्या चराचराची दाणादाण उडवतो. निसर्गाचं रौद्रभीषण रूप म्हणजे काय याची प्रचीती अशा वेळी येते. त्यातून पृथ्वीचा कोणताच देश सुटलेला नाही. खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी करून पाऊस पाडणारा समुद्र खवळला की, पाचावर धारण बसते. पावसाचा हा मूड सर्वांचीच परवड करणारा.

एरवीचा शांत समंजस पाऊस उल्हसित करणारा, शेतकऱ्याच्या मनात तर उद्याचे पीक फुलवणारा. त्याच्या कष्टांवर समाधानाचं शिंपण करणारा. पाऊस – धरतीचं सख्य जमलं की सोन्यासारखी शेतं फुलतात. निसर्गाचं देणं ‘अनंत हस्ते’च असायचं. ते कृपावंत हात पर्जन्याचे आणि ते क्षण ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’ म्हणण्याचे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या