पहिल्यांदाच एकत्र प्रवास!

320

>> नम्रता पवार

पद्मिनी कोल्हापुरे आणि अशोक सराफ. प्रथमच एकत्र येत आहेत एका मराठी चित्रपटाच्या निमित्ताने दोघांशी एकत्रीत मारलेल्या गप्पा… अनेकदा चित्रपटात जी कथा दाखविली जाते ती खरंतर अनेक लोकांच्या आयुष्याशी रिलेट करताना दिसते. एखादा सिनेमा पाहताना आपण अगदी सहजपणे बोलून जातो की, अरे ही तर माझीच गोष्ट आहे किंवा ही गोष्ट माझ्या शेजाऱयाच्या वा मित्रमैत्रिणीच्या बाबतीत घडलीय… अशीच काहीशी गोष्ट असलेली कथा घेऊन ‘प्रवास’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करत असलेली जोडी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचं चित्रपटातील नातं आणि वैयक्तिक आयुष्य याचा केलेला हा छोटासा ‘प्रवास.’

‘प्रवास ’… जे शेष आहे ते विशेष आहे

प्रवास.. ही एका आनंदी जोडप्याची कथा आहे. चित्रपटाचा नायक अभिजात इनामदार आणि त्याची पत्नी लता एक सुखी आयुष्य जगत असतात. एक असा प्रसंग घडतो की, त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते आणि त्यांचा विलक्षण प्रवास सुरू होतो. जे आयुष्य राहिलंय ते मनासारखं जगायचं आणि समाजासाठी काहीतरी योगदान करून जायचं हा कथेचा गाभा आहे.

प्रवास एकमेकांच्या आयुष्याशी किती रिलेट करतो
चित्रपटातील अभिजातला जेव्हा त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचं समजतं तेव्हा तो सुरुवातीला खचून जातो, मात्र नंतर तो पत्नीच्या मदतीने नव्याने आयुष्य जगायला लागतो. त्यामुळे हा चित्रपट अशोक सराफ यांच्या आयुष्याशी रिलेट होणापेक्षा समस्त लोकांशी रिलेट होतो असं मला वाटतं.
तर पद्मिनांना वाटतं की, ‘प्रवास’मधील लता त्यांच्या आयुष्याशी थोडीफार रिलेट करते. एकेकाळी त्या जरी हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असल्या तरी त्यांच्यावर टिपिकल महाराष्ट्रीयन एकत्रित कुटुंबातील संस्कार झाले आहेत. आता त्या एका अशा स्टेजला आल्यात की, त्या आपलं आयुष्य छान, मनमुराद जगत आहेत. सुकयो महिकारी या आध्यात्मिक संस्थेशी गेली 25 वर्षे जोडल्या गेल्या आहेत.

पती-पत्नीची साथ किती महत्त्वाची
‘प्रवास’मधील अभिजात आणि लता हे एकमेकांना पूरक असं जोडपे आहे. पतीच्या स्वप्नांना पत्नी तेवढय़ाच समर्थपणे साथ देते. अशोकजींना वाटतं की, तरुण वयापेक्षा उतारवयात एकमेकांना एकमेकांची साथ हवी असते. उतारवयातील प्रेम नुसतं प्रेम नसतं तर त्यात एक वात्सल्य असतं. चित्रपटातील पती-पत्नी आणि आमचं वैयक्तिक आयुष्य खूपच वेगळं आहे. निवेदिता आणि मी एकाच प्रोफेशनमध्ये असलो, तरी आम्ही दोघेही आपापल्या कामात व्यस्त असतो. निवेदिताचा मला अतिशय अभिमान आहे. लग्नानंतर एक आघाडीची अभिनेत्री असूनदेखील घर आणि आमचा मुलगा अनिकेतसाठी तिने अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनंतर जेव्हा तिने काम करायचं ठरवलं. आज नाटक आणि सीरियलमध्ये पुन्हा तिचं कौतुक होतंय.

तर पद्मिनीचे म्हणणे आहे की, लग्नानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय हा माझा स्वतःचा होता. माझ्या पतीने मला कायमच स्वातंत्र्य दिलं. मी जेव्हा पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी पाठिंबाच दिला. पती-पत्नीचं नातं हे खूप निरंतर नातं आहे.

एकमेकांबाबत काय वाटतं
माझ्यासोबत सहकलाकार म्हणून पद्मिनी कोल्हापुरे आहेत हे समजल्यावर नक्कीच आनंद झाला. प्रथमच आम्ही एकत्र काम करणार होतो. साधारणतः कसं असतं की हिंदी कलाकार म्हटलं की, त्यांना एक ऑटिटय़ूड असतो, मात्र पद्मिनीबाबतीत मला हा ऑटिटय़ूड कुठेच दिसला नाही. ती खूपच डाऊन टू अर्थ मुलगी आहे. त्यावेळी मी त्यांना म्हणालेदेखील की मामा, तुम्हीदेखील खूप मोठे कलाकार आहात.. तर ते त्यांच्या मिश्कील शैलीत बोलून गेले, मी मोठा आहे कबूल आहे. पण कसं असतं ना, तुम्ही जेव्हा मोठे असता ना तेव्हा डाऊन टू अर्थ असणंदेखील महत्त्वाचं असतं. पूर्ण सिनेमा करताना तिने तिचं स्टारडम कुठेही जाणवू दिलं नाही

तर पद्मिनीचं म्हणणं होत, अशोक सराफ मराठी चित्रपटसृष्टीचे किंग आहेत आणि त्यांनी माझं कौतुक करणं खूपच मोठी गोष्ट आहे. शूटिंगला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सेटवर सगळेजण मामा म्हणून बोलत असतं. मला कळेना त्यांना सगळे मामा बोलताहेत. तर मी पण मामा म्हणू की अशोकजी. नंतर मात्र मीदेखील मामाच बोलायला लागले. खूपच प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत. एकदम वक्तशीर आहेत. मी दिलेल्या वेळेत 5-10 मिनिट उशिराने यायचे, परंतु ते मात्र कायम 5 मिनिट अगोदर हजर असायचेच असायचे.

जिथे निवांतपणा मिळतो….
माझं घर आणि घरातील माझी रूम ही माझी सर्वात आवडती जागा आहे. घरात जे समाधान मिळतं ते जगातील कोणत्याही जागी वा हॉटेलमध्ये मिळणार नाही. घरी खूप छान सकारात्मक वातावरण असतं असं पद्मिनीला वाटतं.

तर अशोकजीना हा प्रश्न विचारला तेव्हा ते त्यांच्या मिश्कील शैलीत म्हणाले, घर… ते पण माझं हं. पॅकअप म्हटलं की शेवटचा प संपेपर्यंत मी माझ्या घरी असतो. कुठेही न थांबता घरी निघतो. आपल्या घरासारखा निवांतपणा कुठेही मिळणार नाही.

आईवडिलांच्या भूमिकेतून…
माझा मुलगा प्रियांकला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होत. बरं मी अभिनेत्री होते वा त्याचे वडील निर्माता आहेत हे स्टारडम आमच्या घरी नसल्यामुळे त्याला काहीच माहीत नव्हतं. त्याने जेव्हा अभिनेता व्हायचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही त्याला खूप पाठिंबाही दिला नाही वा नाउमेदही केले नाही. सर्वप्रथम शिक्षण पूर्ण करायला सांगितलं. तर अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत लेखक, कवी आहे हे सर्वांनाच तसं माहीत आहे. मात्र आता तो कॅनडामध्ये इंग्लिश नाटकांमध्ये कामेदेखील करतो. साहित्याची त्याला विशेष आवड आहे.

जगणं किती सोपं….
जगणं सोपं आहे की कठीण हे प्रत्येक व्यक्तीच्या विचारांवर अवलंबून आहे. प्रत्येकाचा जगण्याचा प्रवास हा खडतरच असतो, परंतु तुम्ही त्याकडे कसे पाहता आणि ते कसं घेता हे महत्त्वाचं आहे. आपलं आयुष्य सुखकर करायचं की, रडतखडत बसायचं हे ज्याचं त्याने ठरवायला हवंय.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या