गणित सोपं असतं

460

>> शैलेश माळोदे

गणितज्ञ एम. एस. रघुनाथन. गणिताचे मर्म समजले की गणितासारखा सोपा विषय नाही.

गणिताला संपूर्ण विज्ञानाची राणी म्हटलं जातं. आपल्या देशात अकारण गणिताची भीती निर्माण केलेली आहे. सेलिब्रिटीज आणि लेखकांनी त्यात आपल्या साहित्याने हातभार लावलाय. म्हणूनच गणित हा शालेय स्तरावरील अत्यंत भयावह विषय ठरलाय, परंतु विज्ञान क्षेत्रात प्रगती करायची झाल्यास गणिताला पर्याय नाही. गणित शालेय स्तरावरच पक्का होण्यात आनंदाचा भाग असल्यास खूपच मदत होते. त्यामुळे उच्च गणित सर्वांना आवडू शकतं आणि त्याचं सौंदर्य उमगू शकतं’’ अगदी दिलखुलासपणे गप्पा मारताना ज्येष्ठ गणितज्ञ आणि राष्ट्रीय उच्च गणित मंडळाचे अध्यक्ष प्रा. एम. एस. म्हणजेच मदबुसी संतानम रघुनाथन यांनी प्रांजळपणे आपली मतं नोंदविली.

अत्यंत हसरं, खेळतं व्यक्तिमत्त्व असलेले प्रा. एम. एस. रघुनाथन यांची निवड 2001 साली रॉयल सोसायटी लंडनचे फेलो म्हणून झाली. 2001 सालीच पद्मश्री आणि 2012 साली पद्मभूषण हे नागरी पुरस्कारदेखील त्यांना हिंदुस्थान सरकारतर्फे प्रदान करण्यात आले असून 1977 साली भटनागर पुरस्कार, 1991 साली श्रीनिवासन रामानुजम पदक तर 1993 ते 96 या काळात सन्माननीय एस. एन. बोस प्राध्यापक या सन्मानासाठी त्यांची निवड झाली. टाटा मूलभूत संशोधन संस्थेत त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन आणि संशोधनाचं कार्य केलं. ते टीआयएफआरमध्ये होमी भाभा मानद प्राध्यापकदेखील होते. द थर्ड वर्ल्ड ऍकॅडमी ऑफ सायन्सेस तसंच अमेरिकन मॅथेमेटिकल सोसायटीचेही सन्माननीय सभासदत्व त्यांना बहाल करण्यात आलंय.

प्रा. एम. एस. रघुनाथन (एमएसआर) यांचा जन्म 11 ऑगस्ट 1941 रोजी आंध्र प्रदेशातील आजोळी अनंतपुरला झाला. तसं त्यांचं कुटुंब चेन्नईला राहत असे. याविषयी अधिक माहिती सांगताना प्रा. रघुनाथन म्हणाले, ‘‘माझे वडील संतानम आमच्या कुटुंबाचा पिढीजात असलेला इमारती लाकडाचा (टिंबर) व्यवसाय सांभाळत. त्यांनी तो आणखी वाढवला, भरभराटीला आणला. ते युरोप आणि जपानला मोठय़ा प्रमाणात निर्यात करीत. शालेय शिक्षणानंतर मी बी.एससी. पदवी फिजिक्समध्ये प्राप्त केल्यावर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये (आयआयएसी) प्रवेश घेतला. मात्र मला आमच्या कुटुंबाच्या व्यवसायात मदत करण्यासाठी तिथलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. माझ्या वडिलांना विज्ञानात खूप रस होता. ते त्याविषयी भरभरून बोलत. त्यामुळे आम्हा मुलांनाही त्यात मौज वाटत असे. माझी आईदेखील शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातली होती. तिचे वडील (माझे आजोबा) इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांनी ‘कॉर्नहिल’ मासिकात लेख लिहिले असून त्यांनी साहित्यिक विल्यम थॅकरे यांच्यावर स्वतःचं एक पुस्तक प्रकाशित केलंय. नंतर असं कळलं की, त्यांच्या नकळत कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन करत ते अमेरिकेत पुनर्मुद्रित करण्यात आलंय.’

मैलापूरच्या पी.एस. हायस्कूल (चेन्नई) आणि मद्रास ख्रिश्चन कॉलेज हायस्कुलात त्यांचं शालेय शिक्षण पार पडलं. त्याविषयी ते म्हणाले, ‘‘1955 साली मी एसएसएलसी (सेकंडरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट) पास झालो. त्या परिक्षेच्या वेळीदेखील एक अत्यंत गमतीची गोष्ट घडली. संस्कृतचा पेपर पूर्ण झाल्यावर मी विसराळूणाने तो पेपर निरीक्षकाकडे देण्याऐवजी स्वतःबरोबर घेऊन परीक्षा हॉलमधून बाहेर पडलो, परंतु माझ्या एका सहाधायाच्या लक्षात हे आल्यावर मी पुन्हा परीक्षा केंद्रावर पेपर देण्यास आलो. तोवर तेथे पेपर टॅली होत नसल्याबद्दल प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. शेवटी माझ्या मुख्याध्यापकांनी माझ्या सचोटीची हमी दिल्यामुळे मला ती संपूर्ण परीक्षा पुन्हा लिहावी लागली नाही.’’ आपल्या शैक्षणिक यात्रेविषयी आणखी मनोरंजक माहिती सांगताना ते पुढे म्हणाले, ‘‘मद्रास विद्यापीठ हे काही मजेशीर नियमांमुळे खास होते. वयाची साडेचौदा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्या विद्यापीठात प्रवेश दिला जात नसे. मात्र वयोमर्यादा गाठल्यावर आणखी वरच्या वर्गात प्रवेश शक्य असे. म्हणून मी 1955 ते 57 या काळात सेंट जोसेफ कॉलेज, बंगळुरू येथून इंटर केलं आणि परत चेन्नईला परतून विवेकानंद कॉलेजात बीए (आर्ट) पदवीसाठी गणित विषयात प्रवेश घेतला.’’

विवेकानंद कॉलेजचं चांगलं नाव होतं. 1960-62 या काळात सुरुवातीच्या प्रशिक्षणानतर त्यांनी आपले मार्गदर्शक प्रा. एम. एस. नरसिंहन यांनी सुचविलेल्या संशोधन विषयावर म्हणजे ‘डिफॉर्मेशन्स ऑफ लिबीयर कनेक्शन्स ऍण्ड रायमेनियन मेट्रिक्स’ यावर काम करून 1963च्या उन्हाळय़ात महत्त्वाचा गणिती प्रश्न सोडविला. पुढे नरसिंहन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध लिहिला. त्यासाठी 1966 साली मुंबई विद्यापीठानं त्यांना पीएचडी बहाल केली. पीएचडीनंतर त्यांनी प्रिस्टनला (यूएस) इन्स्टिटय़ूट फॉर ऍडव्हान्सड् स्टडीमध्ये एक वर्ष उच्च शिक्षणासाठी व्यतीत केलं. त्यांनी पुढे प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना जपान, अमेरिका आणि युरोपातील विविध विद्यापीठांमध्ये व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणून तर विविध आंतरराष्ट्रीय परिषदांतून व्याख्यानं देत महत्त्वाचं काम केलं.

78 वर्षीय रघुनाथन यांनी गणिताच्या प्रसारासाठी खूप महत्त्वाची भूमिका विविध वैज्ञानिक संस्थांतून बजावलीय. प्रशासकीय आणि सल्लागार म्हणून त्यांनी मोलाचं योगदान दिलंय. 1987 साली रामानुजन जनशताब्दीनिमित्त त्यांनी एक मोठी परिषद आयोजित केली. त्यात अनेक प्रथितयश नंबर थिअरिस्ट सहभागी झाले. राष्ट्रीय उच्च गणित मंडळात त्यांनी सर्वात महत्त्वाचं योगदान दिलं. 1983 साली झालेल्या स्थापनेपासून ते मंडळाचे सदस्य होते. या मंडळामार्फत गणित ऑलिंपियाडसाठी चमू तयार करण्यापासून ते संशोधन, शिक्षण मदत देण्यापर्यंत सर्व प्रकारचं कार्य पार पाडलं जातं. प्रा. रघुनाथन यांनी लिहिलेलं पुस्तक ‘सब ग्रुप्स ऑफ लाय गुप्स’ या क्षेत्रातलं अभिजात मानलं जातं. त्याचं रशियन भाषेतदेखील भाषांतर झालंय. तरुणांना गणितप्रेमी बनविणं हे त्याच्ंा मिशन आहे. असे हे प्रा. एम. एस. रघुनाथन अत्यंत भारी.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या