कलात्मकतेला जागतिक कोंदण

>> प्रा. सूरज अ. पंडित >>

मुंबई ग नगरी बडी बांका… जशी रावणाची दुसरी लंका… वाजतो ग डंका…’ साधारण शंभरेक वर्षांपूर्वी मुंबईचं हे पठ्ठे बापूरावांनी केलेलं वर्णन आज पुनःपुन्हा आठवतं. डोळ्यांत स्वप्न घेऊन मुंबईच्या रेल्वे फलाटावर पहिल्यांदा उतरणार्‍या प्रत्येकाच्या मनात साधारण हीच भावना घर करून असते. ही नगरी हाताला काम आणि पोटाला अन्न देते. आणि म्हणूनच ती दिसामासाने वाढत गेली…अमर्याद, अफाट आणि अनिर्बंध. इलाही जमादारांच्या शब्दांत सांगायचं तर ‘लहान होती अल्लड होती एके काळी तीही, अशी बहकली कुणीच नाही सावरली मुंबई’.

खरचं कोणी एक राजा दुसर्‍याला ही सात बेटं आंदण देतो काय, आणि एका कधीही न झोपणार्‍या शहराचा जन्म होतो काय! पोर्तुगीजांना या सात बेटांच्या मुंबईचे महत्त्व कधीच उमगले नाही. मुंबई ही मुंबई झाली तीच मुळी ब्रिटिशांमुळे. त्यांचा द्रष्टेपणा आणि स्थानिकांचे कर्तृत्व यातून खरी मुंबई उभी राहिली. म्हणूनच फोर्ट परिसरात फिरताना खर्‍या मुंबईकराचं मन आजही भरून येतं. त्या भव्य इमारती, मैदाने आणि वेगळंच भारावलेलं वातावरण. मुंबई ही व्यापार्‍यांची, श्रमिकांची तशीच साहेबाची.

आधुनिक मुंबईच्या स्थापत्य परंपरेचे प्रमुख दोन टप्पे आहेत. एक म्हणजे १९व्या शतकाच्या उत्तरार्धातला, जो साधारण पहिल्या महायुद्धापर्यंत होता तर दुसरा दोन महायुद्धाच्या मधील काळात मुंबई भरलेला. यातील पहिल्या प्रकारच्या स्थापत्य परंपरेत हायकोर्ट, मुंबई विद्यापीठ, एशियाटीक सोसायटीची इमारत अशा काही महत्त्वाच्या इमारतींचा समावेश होतो तर दुसर्‍या स्थापत्य परंपरेत ओवल मैदानाच्या समोरच्या बाजूस तसेच मरीन लाइन्सच्या समुद्राकडे पहात हारीने उभ्या असलेल्या अनेक इमारतींचा समावेश होतो. या इमारतीच काळाच्या ओघात मुंबईची ओळख बनल्या. दक्षिण मुंबईच्या घडणीच्या, इतिहासाच्या साक्षीदार बनल्या. यांचे मुंबईच्या सांस्कृतिक घडणीत विशेष स्थान आहे.

मुंबईच्या या स्थापत्य वारशाची नोंद आज जागतिक स्थरावर घेतली गेली आहे. अनेक शहरांच्या तौलनिक अभ्यासानंतर मुंबईच्या या वारशाची नोंद जागतिक वारसा म्हणून केली गेली आहे. प्रत्येक मुंबईकराला याचा सार्थ अभिमान आहे. आज मुंबईच्या परिसरामध्ये तीन महत्त्वाची जागतिक वारसा स्थळे आहेत. एक म्हणजे ‘घारापुरी बेटावरची एलिफंटा लेणी’, दुसरे आपले सगळ्यांच्याच ओळखीचे असलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ हे रेल्वे स्थानक आणि आता हा स्थापत्य वारसा. संपूर्ण जगात एवढी वारशाची श्रीमंती लाभलेली अशी अभावानेच शहरे असतील.

या सार्‍याची सुरुवात साधारण दोन तपांपूर्वी झाली. सामान्य नोकरदार मुंबईकराला फोर्ट परिसरातील या भव्य इमारतींशी फारसे घेणे – देणे नसायचे. मध्यंतरीच्या काळात तर या इमारतींकडे एक पारतंत्र्याचे प्रतीक म्हणूनही पाहिले गेले. याच इमारतींमध्ये पोटार्थी काम करणार्‍या मुंबईकरांनाही त्यांबद्दल फारसे सोयरसूतक नव्हते. कदाचित ते अतिपरिचयातून झाले असावे. एखादाच रसिक रस्त्यात थांबून यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेताना दिसत असे. त्यातही प्रामुख्याने परदेशी पर्यटक असत. याच पार्श्वभूमीवर काही उत्साही मंडळींच्या ही अनास्था लक्षात आली. त्यांनी या भागात ‘हेरिटेज वॉक’ घ्यायला सुरुवात केली. तरीही परिस्थितीत फारसा बदल झाला नव्हता.

आभा लांबा, फिरोजा गोदरेज या सारख्या रसिक आणि वारशाची जाण असलेल्या मोजक्याच व्यक्तींना ही अनास्था अनाकलनीय होती. त्यांनी या विषयी ठोस काम करायचे ठरवले. आभा लांबा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हॉर्निमन सर्कल, हुतात्मा चौक या परिसरातील वारशाच्या विशिष्ठ सादरीकरणाबाबत विचार मांडायला सुरुवात केली. युरोपातील अनेक शहरात अशा वारसा इमारतीच्या सादरीकरणावर विशेष मेहनत घेतली जाते. त्याचा त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या संवर्धन आणि प्रामुख्याने सादरीकरणासाठी लागणारा आराखडा तयार केला. रस्त्याच्या कडेनी जाताना या इमारती आणि पर्यायाने साराच परिसर नेटका आणि आकर्षक कसा दिसेल या संबंधी समविचारी विद्वान आणि स्थानिकांशी चर्चा केल्या. यासाठी एक विशिष्ट साइनेज तयार करण्यात आले.

मुंबईमध्ये याच काळात अनेक कंझर्वेशन आर्किटेक्टस् अशाच प्रकारचे काम करत होते. काही स्थानिक चाळी, तर काही गावठाणांच्या जतनाचा प्रयत्न करत होते. स्थानिकांचा हा अस्तंगत समांतर वारसा जगापुढे मांडण्याचे हे प्रयत्न होते. यातूनच ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority)आणि बृहन्मुंबई महानगर पालिका यांच्या वारसा संवर्धन समित्या स्थापन झाल्या. Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) च्या वारसा संवर्धन समितीने त्यांच्या अखत्यारीतील प्रदेशातील वारसा स्मारकांची यादी बनवली. त्याची संख्या दोन हजारांच्या वर होती. त्यांचे रीतसर वर्गीकरण केले गेले. हे वर्गीकरण करताना त्याचे चौकट, ठोकताळे आणि नियम बनवण्यापासून सुरुवात होती. मुंबईतील अनेक कंझर्वेशन आर्किटेक्टस्चे यामधील योगदान अनन्यसाधारण आहे. विकास दिलावरी यांनी फ्लोरा फाऊंटन, आर्मी–नेव्ही बिल्डिंग, मुंबई विद्यापीठाचे वाचनालय, रॉयल यॉट क्लब अशा अनेक वारसा इमारतींचे जतन केले. नीरा अडारकरांसारख्या स्थापती-विदुषींनी हा वारसा सामान्यांपर्यंत पोहोचावा म्हणून त्याविषयी ग्रंथांची निर्मिती केली आणि अशा अनेक प्रयत्नातून जनजागृती होत या वारश्याच्या संवर्धनाविषयी चर्चा सुरू झाली.

आभा लांबा यांनी फोर्ट परिसरातील अनेक वारसा स्मारकांच्या, इमारतींच्या जतनाचे आणि संवर्धनाचे कार्य केलेले आहे. मुंबई विद्यापीठाचे दीक्षांत सभागृह, एल्फिन्स्टन महाविद्यालय, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टची इमारत अशा अनेक इमारतींचा यात समावेश होतो. या शिवाय नागरी वारसा व्यवस्थापनामध्ये ही आभा लांबा यांचे मोलाचे योगदान आहे. या सार्‍या कामाचे एकत्रित फलित म्हणजेच या १९व्या व २० व्या शतकातील वारशाला आज जागतिक वारशाचा दर्जा मिळाला आहे. मुंबई नावाचे अजब रसायन घडवणार्‍या व्यक्ती, कुटुंबे, घटना यांच्या या इमारती साक्षी आहेत.

आता प्रश्न येतो तो म्हणजे या गत वैभवाच्या जतनाचा. याला जागतिक वारसाचा दर्जा मिळालयाने सामान्य मुंबईकराच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? या इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे काय? या जुन्या इमारतींच्या जतनासाठी फार खर्च येतो, तो कोण करणार? असे एक ना दोन अनेक प्रश्न उपस्थित होतात. या पैकी काही प्रश्नांची उत्तरे काळच देईल. परंतु या सार्‍या खटाटोपामूळे पर्यटन व्यवसायात मोठा बदल होऊ शकतो. जागतिक वारश्याचे स्थान मिळालेल्या वास्तू पहाण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पर्यटक येतात. यातून पर्यटन व्यवसायाशी संबंधित अनेक व्यवसायांमध्ये रोजगाराच्या संधी उत्पन्न होतात. आज जगभर अशी धारणा आहे की जागतीक वारश्याचे स्थान प्राप्तझाल्यावर स्थानीक पर्यटनात साधारण २०% पर्यंत वाढ होते. आज आपल्या देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला याचा निश्चितच हातभार लागणार आहे. एकमेकांच्या जवळ असलेल्या तीन जागतिक वारसा स्थळांमुळे मुंबईत येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ संभवते. याच जुन्या इमारतींच्या पुनर्वापरातून या पर्यटनाला नवनवीन आयाम लाभणार आहेत हे निश्चित.

अनेक नवनवीन परंपरांचा पाया मुंबईत रचला गेला, हा मुंबईचा इतिहास आहे. नवीन पायंडे पाडणे, नव्याला सामोरे जाणे आणि त्यातून सामाजिक आणि आर्थिक उन्नती साधणे हा मुंबईचा स्वभाव आहे. या स्वभावाला अनुसरूनच आज मुंबईने एका नव्या युगाच्या परिभाषेची ओळख देशाला करून दिली आहे. म्हणूनच अनेक स्वप्नांना जन्म देणार्‍या आणि त्यांना सत्यात उतरवण्याची उमेद देणार्‍या या मुंबईला आणि तिच्या वारशाला त्रिवार सलाम!

(लेखक पुरातत्वशास्त्र तज्ञ आहेत.)