लेख : मुद्दा : मुंबई (चुकांचे) विद्यापीठ!

85

>> जयेश राणे

वर्ष 2014 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने परिपत्रक काढून देशातील विद्यापीठांना पदव्यांच्या नावांमध्ये सहा महिन्यांत बदल करावा अशी सूचनाही केली होती. मुंबई विद्यापीठाने तसे न केल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना केंद्रीय सेवेत जाताना बसत आहे. 4 वर्षे होऊनही सूचनेवर कार्यवाही करावीशी न वाटणे हा अक्षम्य बेजबाबदारपणा आहे. मुंबई विद्यापीठात देण्यात येणाऱ्या ‘एमआयएम’, ‘एमएफएम’, ‘एमएमएम’, ‘एमएचआरडीएम’, ‘बीएमएम’, ‘बीएसएम’, ‘एमएसएम’ या पदव्यांची नावे आयोगाच्या यादीत वेगळ्या नावाने देण्यात आली आहेत. विद्यापीठाने या पदव्यांच्या नावात आयोगाच्या नियमांनुसार बदल करणे अपेक्षित आहे, ते झालेले नाही. ही मुंबई विद्यापीठाची गंभीर चूक आहे.

पेपर तपासणी, निकाल यांच्या गोंधळामुळे या विद्यापीठाची अपकीर्ती होण्यासह अनेक विद्यार्थ्यांना याचा मानसिक, आर्थिक त्रास सोसावा लागला आहे. त्यांच्या चुकांचे परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत हे तीव्र संतापजनक आहे. या सर्व गोष्टी पाहता मुंबई विद्यापीठाचा कारभार कसा चालतो? असा प्रश्न आहे. चुकांवर चुका करणाऱ्या विद्यापीठापुढे विद्यार्थी हतबल झाले आहेत. स्वतःचे प्रशासन स्तरावरील कामकाज कसे करावे हे यांना शिकवण्याची नितांत आवश्यकता आहे. गंभीर चुका झाल्या तरी कारवाईचा धाक वाटत नसल्याने वर्षे लोटली तरी त्याच चुका कायम आहेत, तसेच त्यात नवीन चुकांचीही भर पडत आहे. या स्थितीत विद्यार्थ्यांनी काय करावे ? आपल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक, नोकरी यांच्या स्तरावर हानी होऊन अमूल्य संधी गमवावी लागली आहे, त्यांच्याविषयी यांना काहीच संवेदना नाही असे उघड होत असलेल्या गंभीर चुकांवरून कळते. होतकरू विद्यार्थी जीवाचे रान करून अभ्यास करत असतात. मात्र आपल्या चुकांवर अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठाला आवड नसल्याने त्यादृष्टीने दुरुस्ती करण्यासाठी सवड असणे लांबच राहिले आहे.

शैक्षणिक क्षेत्राशी निगडित एका अति महत्त्वाच्या प्रशासकीय व्यवस्थेच्या सूचनेवर वर्षानुवर्षे कार्यवाही का होत नाही याचा खुलासा विद्यापीठाने केला पाहिजे. जे आयोगाचे ऐकत नाहीत ते विद्यार्थ्यांच्या सूचनांची काय दखल घेत असतील? आपल्या हातात पडलेली पदवी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पदव्यांच्या यादीनुसार ग्राह्य नसल्याचे ऐनवेळी कळल्यावर कुणालाही धक्का बसणे साहजिकच आहे. त्यात दुरुस्ती करवून घेण्यासाठी पुन्हा विद्यापीठाच्या चकरा मारा. हे सहन न होऊन कोणी टोकाचे पाऊल उचलल्यास त्याला मुंबई विद्यापीठच जबाबदार असेल. सर्वच विद्यार्थ्यांची मानसिकता समान नसते हे यांना ज्ञात असूनही यांनी चुका करण्याचा धडाकाच लावला आहे. विद्यापीठाची ढासळत चाललेली प्रशासन स्तरावरील गुणवत्ता कधी सुधारणार हे अनिश्चित असले तरी त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे हे अभ्यासण्यास वर्तमानपत्र अभ्यासपूर्ण वाचण्याची तसदी घ्यावी. यावरून तरी काही लक्षात आले तर आले. अन्यथा आहे तसेच चालू राहून अनेकांना याचा नाहक फटका बसत राहणार.

स्पर्धा परीक्षा, नोकरी-व्यवसाय यांच्यासाठी संघर्ष करावाच लागतो, पण येथे ‘पदवी’चे नावच चुकीचे आहे असे कळल्यावर संघर्षाच्या सूचीमध्ये नाहकपणे अजून एका सूत्राची भर पडून संघर्षाची सीमा रुंदावणार आहे. जागतिक स्तरावरील विद्यापीठे अव्वल क्रमवारी कशी पटकावतात याचा अभ्यास मुंबई विद्यापीठाकडून होत असेल का? चुकांचा कळस करणारे विद्यापीठ कधीतरी जागतिक स्तरावर अव्वल स्थानी येईल का? हे स्थान मिळवायचे असल्यास अभ्यासपूर्ण गृहपाठाची आवश्यकता आहे.

देशामध्ये मुंबई हे सर्वात वेगवान (व्यावसायिक क्षेत्राच्या दृष्टीने) शहर आहे असे कोलकाता, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद अशा विविध शहरांत नोकरी-व्यवसाय, शिक्षण, पर्यटन आदी कारणांच्या निमित्ताने जाणे झालेल्या व्यक्ती म्हणत असतात. मात्र या वेगाचे महत्त्व मुंबई विद्यापीठाला उमजलेले नाही हे म्हणजे पाण्यात राहूनही अंग कोरडे राहण्यासारखे आहे. मुंबई ते कोकण असा विस्तीर्ण पसारा असणाऱ्या विद्यापीठाने जग कुठे पोहोचले आहे आणि आपण कुठल्या डबक्यात अडकून पडलो आहोत याचे चिंतन करून त्याला कृतीची जोड द्यावी आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप होणार नाही अशा प्रकारे कारभार सुधारावा!

आपली प्रतिक्रिया द्या