आपला माणूस – चाकोरीबाहेरचा संगीतकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

आयएनटीच्या मातीचं स्वप्न, जांभूळ आख्यान, शारदीयेचे लोककळे, अरे रे संसार अशा चाकोरीबाहेरच्या नाटकांचे संगीत दिग्दर्शन अच्युत ठाकूर यांनी केले होते. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि लोकसंगीत अशा विविध संगीत प्रकारांवर ठाकूर यांची हुकमत होती. लोकसंगीताचे अनेक बाज त्यांनी मराठी चित्रपट आणि नाटकांमधून विकसित केले.

ज्येष्ठ गीतकार, संगीतकार, गायक अच्युत ठाकूर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक प्रभावी तारा निखळला. अच्युत ठाकूर आणि माझे संबंध सुमारे 30-35 वर्षांपासूनचे. इंडियन नॅशनल थिएटर लोकप्रयोज्य कला संशोधन केंद्राचे संचालक, ज्येष्ठ गीतकार, नाटककार अशोकजी परांजपे यांच्या मार्गदर्शनाचा लाभ अच्युत ठाकूर यांना आणि मला सारखाच झाला.
अजातशत्रू अच्युत ठाकूर यांचा आणि माझा संबंध पुढे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत आला. सन 2004 मध्ये मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीची स्थापना झाली. या विभागाची धुरा सांभाळताना वार्षिक परीक्षेला हमखास अच्युत ठाकूर यांना परीक्षक म्हणून निमंत्रित केले जायचे. हा सिलसिला 2019पर्यंत सुरू होता. परीक्षा घेताना लोकसंगीताचा बाज आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक सुरू असताना अच्युत ठाकूर दिलखुलास दाद देत आणि त्या विद्यार्थ्याला म्हणत, ‘‘तू आमच्या संगीत विभागात पुढे प्रवेश घे, शास्त्र्ााrय बैठक प्राप्त झाली तर तू आपल्या आवाजाद्वारे संगीत कलेचं सोनं करशील.’’

लोककला अकादमीचे विद्यमान विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे आणि अच्युत ठाकूर हे दोघेही वसईचेच. हाकेच्या अंतरावर त्या दोघांचे घर. त्यामुळे त्यांचा सतत संवाद असायचा. नियोजित ‘विठा’ नावाच्या चित्रपटासाठी अच्युत ठाकूर, राजदत्त आणि मी अगदी अलीकडेच वसईत भेटलो होतो आणि अच्युत ठाकूर यांनी सुरेख गौळण कंपोज केली होती, असे डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सांगितले. आमच्या अकादमीतील विजय चव्हाण आणि कृष्णा मुसळे यांनी अनेकवार अच्युत ठाकूर संगीतबद्ध करत असलेल्या चित्रपटात तालवाद्य वादनाचे काम केले. नंदेश उमप यांनी अच्युत ठाकूर यांची आठवण सांगताना सांगितले, ‘‘जांभूळ आख्यानचे संगीत देताना अच्युत काका नेहमी म्हणत, गोंधळाच्या गायकीचा पारंपरिक बाज ठेवून तू सादरीकरण कर. शास्त्र्ााrय संगीताची आलापी त्यात घेऊ नको. ‘कर्णाला पाहुनी द्रौपदीचं मन पाकुळलं’ हे जांभूळ आख्यानमधील गाणं आणि त्याची चाल म्हणजे अच्युत ठाकूर यांचं लँडमार्क गाणं. अच्युत काकांनी एका गाण्यासाठी बक्षीस म्हणून मला हजार रुपये दिले आणि त्यावर सही केली. त्या 500-500 रुपयांच्या दोन नोटा आजही माझ्या पॉकेटमध्ये आहेत. आता हीच त्यांची आठवण.’’
‘बरखा सातारकर’ या चित्रपटासाठी त्यांनी तब्ब्ल 11 लावण्या कंपोज केल्या, त्या अप्रतिम ठरल्या. ‘माझ्या इश्काचा रंग हा खुलला’ , ‘गरजवंत तुम्ही गरजवंत… मी गरजेपोटी सौदा केला, घ्या मानाचा मुजरा’ अशा एकापेक्षा एक उत्तम लावण्या त्यांनी कंपोज केल्या.

अतिशय सामान्य स्थितीतून रायगड जिह्यातील कोपर गावातून मुंबईत संगीत क्षेत्रात भाग्य उजळायला आलेल्या अच्युत ठाकूर यांनी मराठी नाटय़सृष्टी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या संगीत संयोजनाने स्वतंत्र ठसा उमटविला. मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात सुगम संगीत विभागाचे फॅकल्टी म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत असलेले अच्युत ठाकूर जगनमित्र होते. अच्युत ठाकूर हे गेल्या 40हून अधिक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत होते.

अच्युत ठाकूर यांच्या घरची पार्श्वभूमी संगीताची होती. त्यांनी सुरुवातीचे संगीताचे धडे पं. शिवरामबुवा वरळीकर यांच्याकडे घेतले. पुढे या क्षेत्रातील त्यांचे गुरू पं. प्रभाकर म्हात्रे, आचार्य डी.पी. अडसूळ, खाँसाहेब गुलाम खाजाँ, पं. यशवंतबुवा जोशी, विश्वनाथ मोरे हे होते. मुंबईत आल्यावर त्यांनी गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ केले. अच्युत ठाकूर यांनी 1983 साली प्रथमच ‘श्री रामायण’ हा मराठी चित्रपट संगीतबद्ध केला. त्यातली गाणी त्या वेळी गाजली होती. त्यानंतर ‘सौभाग्य वैंकण’, ‘पैज लग्नाची’, ‘घे भरारी’ अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ‘चिमणी पाखरं’ हा चित्रपट तर गाण्यांसाठी खूप गाजला. अनेक नाटकांनाही अच्युत ठाकूर यांनी संगीत दिले होते. ‘जांभूळ आख्यान’ हे त्यांनी संगीतबद्ध केलेले नाटक आज 30हून अधिक वर्षे चालू आहे. तर ‘पैज लग्नाची’ आणि ‘मर्मबंध’ या चित्रपटांना संगीतकार, गायक म्हणून त्यांना दोन-दोन राज्य पुरस्कार मिळाले.

त्यांना सहा राज्य पुरस्कार प्राप्त झाले. तसेच 1992 साली अ.भा. मराठी नाटय़ परिषदेचा उत्कृष्ट संगीतकार म्हणून, तर 1996 साली मुंबई महापालिकेचा उत्कृष्ट संगीत शिक्षक म्हणून महापौर पुरस्कार व रायगड जिल्हा परिषदेचा ‘रायगड भूषण’ पुरस्कारही त्यांना मिळाला होता. तसेच त्यांना अ.भा. चित्रपट महामंडळातर्फे ‘चित्रकर्मी’ पुरस्कारही मिळाला होता. अच्युत ठाकूर यांनी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग व हिंदुस्थान सरकारतर्फे आयर्लंड येथे साजऱया झालेल्या जागतिक महोत्सवात गायक म्हणून सहभाग घेतला होता, तर मॉरिशस येथे जागतिक सागर महोत्सवात प्रमुख गायक म्हणून भाग घेतला होता. त्यांनी आजवर महाराष्ट्रातील विविध भागांबरोबरच आसाम, नागालँड, उत्तर प्रदेश, दिल्ली, कश्मीर, प. बंगाल इत्यादी हिंदुस्थानातील अनेक राज्यांत सुगम व लोकसंगीताचे कार्यक्रम सादर केले. मराठी लोकगंगा, सूर तेच छेडिता या कार्यक्रमांबरोबरच युवक बिरादरी आणि इंडियन नॅशनल थिएटर या संस्थांमधूनही त्यांनी देशाच्या विविध भागांत कार्यक्रम केले. सोपस्कार सोडून मैत्रीच्या नात्याने म्हणावेसे वाटते, मित्रा अच्युत, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार तुला प्राप्त व्हावा यासाठी माझे बोलणेही सुरू होते. तू तुझे जीवनगाणे असे अर्ध्यावर सोडून निघून गेलास, मनाला चटका लावलास.

z [email protected]
(लेखक लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)