ठसा : बाळ दाते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जे.डी. पराडकर 

संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला लाभलेली एक अनमोल देणगी समजली जाते. मराठी रंगभूमीवरील जुन्या कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने आणि तेवढय़ाच ताकदीच्या अभिनयाने संगीत घराघरात पोहचवले. त्या काळात एकापेक्षा एक संगीतसंपन्न आणि प्रचलित सामाजिक विषयांना धरून लिहिलेल्या संगीत नाटकांचे लेखकही तेवढेच प्रतिभासंपन्न होते. या संगीत नाटकांत महत्त्वपूर्ण वाद्य होते ते म्हणजे पायपेटी. पडदा उघडण्याआधीच वायुवेगाने बोटं फिरत सूर उमटू लागले की, प्रेक्षक मंत्रमुग्ध होत. पायपेटी आणि गोविंदराव पटवर्धन हे नातं अनंत काळ अतूट राहील. कालांतरानं संगीत नाटकांच वेड कमी झालं आणि पायपेटी अडगळीत गेली.

पायपेटीला बाजाची पेटी असेही म्हटलं जातं. संगीत नाटकांव्यतिरिक्त भजन आणि सिंधुदुर्गातील दशावतारांमध्ये पायपेटीचा सर्रास उपयोग केला जायचा. संगीत नाटकांचा पडदा पडला आणि नव्यानं पायपेटी तयार होणं बंद झालं. जुन्या पायपेटय़ांची दुरुस्ती करणंही कठीण बनलं. पायपेटीचे रिडस् बनविण्याचं कामच बंद पडल्याने पायपेटीची निर्मिती थांबली आणि नव्या पिढीला तिची ओळख होणंही कठीण झालं. हिंदुस्थानात साधारणतः 1818 पासून हार्मोनियमचे रिडस् बनविले जात होते. ऑर्गनचा जन्म 1250 वर्षापूर्वीचा मानला गेला आहे. याच ऑर्गनने संगीत नाटकांच्या माध्यमातून मराठी रंगभूमी अजरामर केली. कृष्णधवल चित्रपटांच्या काळातही ऑर्गनचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

जुनं ते सोनं, अशी एक म्हण आहे. ती अनुभवाअंती तयार झाली असावी असं म्हणतात. सध्याच्या काळात पायपेटीचे रिडस् उपलब्ध होत नसल्यानं तिची निर्मितीच ठप्प झाली आहे. अशा स्थितीत कोकणाच्या रत्नागिरी जिह्यातील आडिवरेसारख्या दुर्गम गावात पेशाने शिक्षक असणार्‍या, परंतु संगीताची आवड असणार्‍या बाळ दाते या अवलियाने पायपेटी निर्मितीचा ध्यास घेतला आणि त्यासाठी रात्रंदिवस तपश्चर्या करून आवश्यक असणारे रिडबोर्ड थेट अमेरिकेतून मागवत पायपेटीनिर्मितीचं स्वप्न साकार केलं आहे. मराठी रंगभूमीसह संगीत क्षेत्राला या नव्या निर्मितीमुळे सुरांचा हा अनमोल ठेवा जपल्याचा आनंद तर मिळणार आहेच, शिवाय गोविंदराव पटवर्धन यांचा वारसा पुढे चालविणारी जादुई बोटं नव्याने मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

संगीत नाटक पाहायला गेले असताना बाळ दाते यांनी ऑर्गनचा आवाज ऐकला व ती मिळविण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी फिरून केला, मात्र त्यांना अपयश आले. कालांतराने त्यांना एका जुन्या ऑर्गनचे रिडबोर्ड मिळाले. त्यात सुधारणा करून त्यांनी पाहिली पायपेटी बनविली. मात्र मागणी वाढल्याने या निर्मितीसाठी काही तरी केलं पाहिजे. या ईर्षेत असताना त्यांना अमेरिकेत पायपेटीच्या रिडबोर्डचे तंत्रज्ञान सापडलं. अमेरिकेतील मित्राच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान थेट आडिवरेपर्यंत पोहचलं आणि पायपेटीची नव्यानं निर्मिती सुरू झाली. एका ऑर्गननिर्मितीचा खर्च एक लाखाचा असला तरी 50 ऑर्गनचं साहित्य दाते यांनी जमा केलं आहे. पायपेटीचे रिडबोर्ड बनविण्याचं संशोधनही त्यांनी सुरू केलंय. नव्याने बनविले जाणारे रिडबोर्ड संगणकाच्या सहाय्याने तयार होणार असल्याने ते अधिक तंत्रशुध्द बनतील, असा विश्वासही बाळ दाते यांना वाटत आहे. आपल्या ऑर्गनमुळे संगीत क्षेत्राला तर लाभ होईलच, शिवाय वाजविणारे नवनवीन कलाकार तयार होतील याचा आनंद अधिक असल्याचं बाळ दाते यांनी नमूद केलंय.