
>> अशोक बेंडखळे
प्रत्यक्ष युद्ध पाहून त्याची वर्णनात्मक अनेक पुस्तके आहेत. परंतु मराठीत अपवादाने एकच आहे आणि ते म्हणजे विष्णुभट गोडसे (वरसईकर) या तरुण भिक्षुकाने लिहिलेले ‘माझा प्रवास’, जे 1907 साली प्रसिद्ध झाले.
एखाद्या युध्दभूमीवर तिथले युध्द प्रसंग प्रत्यक्ष पाहून त्यावर आधारित डायरी लिहिण्याची आपल्या मराठीत प्रथा नाही. इंग्रजी भाषेत अशी अनेक उदाहरणे सापडतात. तिथे वॉर रिपोर्टर प्रसिद्धच आहेत. 1857 च्या हिंदुस्थानातील बंडावर ब्रिटिशांनी खूप हकिगती लिहिल्या. मराठीतही एक अपवाद म्हणजे विष्णुभट गोडसे (वरसईकर) यांनी ‘माझा प्रवास’ नावाने लिहिलेले पुस्तक! त्यासाठी जिथे हे बंड घडले त्या ग्वाल्हेर, झांशी, काल्पी या भागात बंडखोरांबरोबर राहिले व हे अनुभव लिहिले. संपादक चिं. वि. वैद्य यांनी हे पुस्तक संपादित करून 1907 साली प्रसिद्ध केले (प्रकाशक ः चित्रशाळा प्रकाशन, पुणे )
विष्णू गोडसे हा पेणजवळच्या वरसई गावचा भिक्षुक तरुण. तो आणि त्याचा काका यांनी द्रव्यार्जनासाठी म्हणून उत्तर हिंदुस्थानात जायचे ठरवले. त्यांच्या प्रवासाला 30 मार्च 1857 रोजी पुण्याहून सुरुवात झाली. 1 जुलै रोजी महूच्या छावणीत बंड उठले त्या दिवशी तो तिथे होता. तिथून धार उज्जैन, करीत तो ग्वाल्हेरला पोहोचला प्रवासात दोन-तीन प्रसंग घडले. महूच्या छावणीजवळ बंडवाल्यांनी त्यांना घेराव केला. त्यांनी बायबाजी शिंदे यज्ञ करणार आहेत, त्यासाठी आम्ही वेदशास्त्रसंपन्न गरीब भिक्षुक जात आहोत असे परोपरीने सांगितले. त्यांच्या पोथ्या पाहून बंडवाल्यांनी त्यांना अभय देऊन आम्हाबरोबर चलावे असे फर्मान दिले.
एक प्रसंग नानासाहेब पेशव्यांचा. प्रयागला एक आगबोट गोरे लोकांनी भरून चालली होती. बंडखोरांच्या दुर्बिणीने ती हेरली व नानासाहेबांना सांगितले, हुकूम दिल्यास गोळा टाकतो. त्यावर नानासाहेबांनी नावेत जर बायका-मुले असतील तर मारू नये असे सांगितले आणि माणुसकीचा प्रत्यय दिला. तिसरा प्रसंग ऐकलेला. काडतुसामुळे शिपायांमध्ये बंड पसरले हे सर्वांना माहीत आहे. त्यासाठी इंग्रजांनी एक सभा कोलकात्यास भरवली. अनेक संस्थानिक आले होते. एक नबाब म्हणाला, “हिंदुस्थानात हिंदू व मुसलमान एकदिलाने राहतात. परस्परांचे धर्मास उपद्रव करीत नाहीत. उभयतांचे धर्मास हानी करणारा राजा जय पावत नाही.’’ त्याचा हा स्पष्टपणा महत्त्वाचा वाटतो.
या पुस्तकामध्ये भिक्षुक लेखकाने प्रवासाबरोबर प्रत्यक्ष लढाईचे दोन प्रसंग वर्णन केले आहेत. झांशी संस्थानावरील हल्ला त्याचे वर्णन असे केले आहे… “शहरावर तोफांचे गोळे सुरू झाल्यापासून जनतेला अति त्रास होऊ लागला. एखादा गोळा रस्त्यात पडला म्हणजे तो फुटून पाच-पंचवीस माणसे जखमी होत व दहा-पाच मरत.’’ लक्ष्मीबाईचा शूरपणाही काही वर्णनातून येतो. “राणी न डगमगता ठिकठिकाणी जास्त लोक ठेवून ती स्वत काळजी न करता किल्ल्यावर व शहराच्या टपावर खपत होती. गरीबांचे दुःख कमी करण्यास मागे पाहिले नाही. देवालयात अन्नछत्रे उभारली, सदावर्त चालू केली.’’ राणीविषयी वेगळी माहितीही दिली आहे. “राणी साहेबास अश्वपरीक्षा चांगली होती. त्या वेळी उत्तर हिंदुस्थानात नानासाहेब पेशवे व बाबासाहेब आपटे यांच्याबरोबर लक्ष्मीबाई झांशीवाली हिचे नाव गाजत होते. बाईसाहेब लोकांची काळजी फार वाहत. तसेच दरिद्री भिक्षुक कधीही विन्मुख गेला नाही. एका प्रसंगी चार हजार गरीबांना पोथी, बंडी व घोंगडे वाटल्याचा उल्लेख आहे. झांशीत तोफेचे गोळे वाडय़ावर पडत होते त्यावेळी एका खोलीत लेखकासह चौसष्ट माणसे फक्त चारच घटका होते, पण सर्वजण कासावीस झाले आणि मृत्युभयाहून दुसरे भय नाही याचा प्रत्यय मिळाला.
नंतर लेखक काल्पीला नगरात आला तेव्हा त्याने प्रत्यक्ष लढाईचा प्रसंग पाहिला. झांशीहून काल्पीला येताच इंग्रज फौजांनी काल्पी शहरावर हल्ला केला. इथे तीन दिवस लढाई चालली होती. इतिहासात आपण वाचतो तेच लेखक इथे सांगतो. पेशव्यांची फौज निरुपयोगी झाली होती. दिल्ली, लखनौ, झांशी आदी ठिकाणी इंग्रजांना जय झाल्यामुळे बंडवाले निराश झाले होते, फलटणी सोडून गेले व दुसरे उद्योग सुरू लागले. काशी शहराची दुर्दशा त्याने पाहिली. दांडग्या लोकांनी त्यात हात धुऊन घेतले आणि निराश झालेला लेखक ब्रह्मावर्ताकडे वळला. दरम्यान जवळचा पैसा लुटणे आदी अनुभव मिळत होते. एके ठिकाणी त्याचा काका बेशुद्ध झाला. त्यावेळी सामान्य गाडीवान देवासारखा धावून आला. ब्रह्मावर्ताहून कानपूर, लखनौ, अयोध्या असा प्रवास झाला. अयोध्येला रामदर्शन घेऊन त्याने काशी प्रयाग ही तीर्थे केली. पुढे इंदूर, नाशिक, त्रंबकेश्वर करीत गावी पोहोचला तो तीन वर्षांनी.
…तर असा हा प्रवास केवळ तीर्थयात्रा न राहता लढाईच्या काही प्रसंगामुळे वेधक ठरतो. आणि भिक्षुक लेखकाने हा रोमांचकारी अनुभव शब्दांत मांडला तो लक्षवेधी झाला त्याला लाभलेल्या 1857 बंडाच्या पार्श्वभूमीमुळे.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)


























































