विज्ञानरंजन – सणासुदीच्या वनस्पती…

<<< विनायक >>>

पूर्वीच्या ऋतुमानाप्रमाणे जून ते सप्टेंबर असे साधारण चार महिने महाराष्ट्रात पाऊस पडतो, म्हणजे विसेक वर्षांपूर्वीपर्यंत पडायचा. त्यामुळे ‘छत्री’ किती दिवस वापरावी लागेल याचे ‘गणित’ मुंबईसारख्या महानगरातले चाकरमानी मनाशी मांडत असत. काळ बदलला, वातावरण बदललं. माणसाच्या आणि पर्यायाने निसर्गाच्या वागण्यालाही काही धरबंध राहिला नाही. याची चुणूक 1998 मध्ये 17 नोव्हेंबरला झालेल्या धुवाधार अवकाळी पावसाने दिली होती. दिवाळी ऑक्टोबरात आली तर कधी कधी पावसाचा शिडकावा व्हायचा, पण नोव्हेंबर-डिसेंबरात छान थंडीची अपेक्षा असताना पावसाचा कहर हा त्या वेळी तरी अपवाद होता. आता ‘अपवादांचे’ नियम जसे मानवी व्यवहारात होताना दिसतायत तसेच निसर्गाचे तंत्रही बदललेले दिसतेय.

त्यामुळे वेधशाळांचे हवामानाचे अंदाज चुकण्याची वेळ येते. त्यासाठी आणखी बरीच सक्षम यंत्रणा लागेल. म्हणजे अमेरिकेसारखे आणखी दहा मिनिटांत पाऊस अमुक ठिकाणी होईल असे भाकीत करता येईल. थोडक्यात काय तर या वेळी सारेच सण लवकर आलेत. ते का व कसे ते नंतर एखाद्या लेखात वाचूया, पण सध्या गणपतीच्या दिवसात पूर्वापार ‘पत्री’ किंवा अनेक वनस्पतींची पाने पूजेत वापरण्याची प्रथा होती. ती निसर्गाशी निगडित होती. चांद्रमासाच्या वर्षात योग्य तो बदल करून आपले ‘सण’ ऋतुचक्राशी जुळवून घेण्याची पद्धतही जुनीच आहे. त्यानिमित्ताने या पानांचा सन्मान करत त्यांची ओळख करून घेता येते.

या वेळी पर्ण पूजेवरून आठवली ती केवळ पावसातच उगवणाऱ्या अनेक वपस्पतींची नावे. ‘नागरमोथा’सारखं गवत असो किंवा आघाड्याचे रोप असो अशा कितीतरी पावसाळी वनस्पती या काळात उगवलेल्या दिसत. तीन दिवसांचाच ‘रंग’ असणारा तेरडासुद्धा भरपूर दिसायचा. कोराटीची अबोलीसारखी फुलं मनमोहक वाटायची. गणेशवेलीचा उल्लेख तर मागच्या लेखात झालाच आहे. तुळस, त्यातही ‘कृष्ण तुळस’, दुर्वा आणि ‘शमी’ची पानं फार महत्त्वाची.

यानिमित्ताने आमच्या लहानपणी आम्हाला सभोवतालच्या निसर्गाची सहज ओळख झाली. त्यातल्या अनेक औषधी वनस्पतींच्या मुळ्या किंवा चूर्ण करण्यासाठी पानं (पत्री) आणायला मुलांना सांगितले जायचे. ‘आजीबाईच्या बटव्यात’ थोडी भर पडायची. घराघरात पोहोचलेला हा आयुर्वेद होता. ‘तुळस आघाड्याची पानं आणा’ असे आजीचे सांगणे असायचे. मग या पत्री हुडकताना वेगवेगळ्या प्रकारचे गंध असलेले गवतही दिसायचे. (केवड्याविषयी नंतर जाणून घेऊ.)

त्यातलंच एक नागरमोथा. तेही औषधी. किंबहुना कुठलीच वनस्पती ‘अनौषधी नसते (नास्ति मूलम् अनौषधम्) म्हणजे औषधी असते हे घराघरात परंपरेने आलेले आणि पिढ्यान्पिढ्या रुजलेले विज्ञानाधारित ज्ञान. अर्थात यामागे सर्वांचा या वनस्पतींचा सखोल अभ्यास वगैरे नसायचा, पण वापर मात्र व्हायचा.

अशा बऱ्याच ‘पत्री’पैकी या वेळी नागरमोथा गवत आणि आघाड्याविषयी थोडं जाणून घेऊ. नागरमोथा गवत आम्हाला जरी पावसाळ्यातच दिसायचे. (कदाचित एरवी दुर्लक्ष होत असेल) पण तसे ते बारमाही आहे. त्याचे वनस्पतीशास्त्रातले नाव सायपेरस रोडन्डस. त्याला ‘नटग्रास’ही म्हणतात. नागरमोथ्याच्या परिसरात गेले तरी एक मंद सुगंध दरवळतो. नागरमोथ्याची पाती आणि मुळंसुद्धा औषधोपयोगी.

नागरमोथा ट्रॉपिकल किंवा उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशात उगवतो. तो जगभर मिळतो. हिंदुस्थानात तो महाराष्ट्रापासून दक्षिणेकडे अधिक आढळतो. याचा उपयोग अत्तर बनवण्यापासून ते अनेक विकारांवर होतो. इसवी सन पूर्व काळापासून आयुर्वेदाला त्याची माहिती आहे. काळपट हिरव्या रंगाची पाती असलेल्या नागरमोथ्याची वाढ दमट, पावसाळी वातावरणात होते. त्यामुळे सध्याच्या मोसमात तो जास्त दिसतो.

आघाड्याची पानं काहीशी खरबरीत, चरचरीत असतात म्हणून त्याला इंग्रजीत चाफ (रफ) फ्लॉवरचे रोप म्हणत असावेत. त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव ‘ऑचिरॅन्थस अ‍ॅस्पेरा’ असे आहे. आघाड्याचा काढा सर्दी-खोकल्यावर औषध म्हणून वापरतात. त्याच्या पानाचे चूर्ण मधातून दिले जाते हा पारंपरिक उपयोग. याची माहिती आपल्याकडे देशभर होती म्हणूनच या वनस्पतीला विविध नावं आहेत. संस्कृतमध्ये अपामार्ग, हिंदीत लटजिरा, बंगालीत अपांग, तमीळमध्ये नायरू, तर मल्याळममध्ये कडालाडी आणि गुजरातीत अघेडो म्हटले जाते.

तसे तर हे रोप दोनेक वर्षे टिकते, परंतु आपल्याकडे तो मोठ्या प्रमाणात गौरी-गणपतीच्या काळातच आढळतो. त्याच्या औषधी उपयोगात दात घासण्यासाठी त्याच्या काड्यांचे दांतण म्हणून तसेच शरीरशुद्धीसाठी अनेक लहानसहान विकारांवर करण्याच्या स्वरूपात होतो.

कधी कधी या अशा वनस्पतींची माहिती नसल्याने त्यांचा वापर वेळच्या वेळी होत नाही आणि औषधी वापर तर तज्ञांच्या सल्ल्याशिवाय करूच नये. मात्र सभोवतालच्या सृष्टीमध्ये आपल्या जीवनाला उपयोगी असे भांडार निसर्गाने भरपूर भरून ठेवले आहे. याची आणि त्यामागच्या ज्ञान-विज्ञानाची जाणीव वाढवण्याची उत्सुकता हवी. कृषी संस्कृतीत याकडे लगेच लक्ष जायचे. नकळत चर्चा व्हायची, पण आताच्या गॅझेटबद्ध जीवनात ‘सभोवती’ थंडावा देणाऱ्या दुर्वा आणि किंवा हवामानात तग धरणारी काटेरी ‘शमी’ची पानं शोधायला वेळ हवा ना!