
>> साधना गोरे
शाळकरी वयात गावांच्या नावांच्या भेंड्या खेळलेल्या अनेकांना आठवत असेल. या खेळात हमखास घेतली जाणारी गावांची नावं म्हणजे ‘पूर’, ‘नगर’, ‘गाव’ किंवा ‘बाद’ असे प्रत्यय असलेली असायची. उदा. सोलापूर, नागपूर, उस्मानाबाद किंवा कडेगाव इ. कारण एकतर ही नावं लक्षात ठेवायला सोपी असायची आणि दुसरं म्हणजे समोरच्या गटातल्यांना ही गावांचीच नावं आहेत याची खात्री असायची. काही शहरांच्या नावामागे ‘नगर’ शब्द असतो. उदा. अहमदनगर किंवा अहिल्यानगर. काही गावांच्या नावामागे ‘गाव’ हाच शब्द असतो. या ‘नगर’ आणि ‘गाव’ शब्दांचा अर्थ आपल्याला लगेच कळतो, पण महाराष्ट्रात आणि भारतातही ‘नेर’, ‘पूर’, ‘ऊर’, ‘बाद’ असे प्रत्यय असणारी गावं मोठय़ा प्रमाणात आहेत.
‘नेर’ प्रत्यय असणारी महाराष्ट्रातली गावं म्हणजे अंमळनेर, पारनेर, जामनेर, संगमनेर, पिंपळनेर, वडनेर इ. तर राजस्थानमध्ये बहानेर, बिकानेर, रानेर, संगनेर ही गावं आहेत. बंगालमध्ये मोहनेर नावाचं गाव आहे. ‘नेर’ या प्रत्ययाशी मिळतीजुळती गावं म्हणजे जुन्नर, सिन्नर. बंगालमध्येही दिनगर, दिनरा अशी गावं आढळतात. गुजरातमध्ये चंपानेर, वडनेर ही गावं आहेत. या नेर – नर – नगर प्रत्ययाचं मूळ सांगताना कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, ‘‘संस्कृतमधील नीवरम्, नीरम् या शब्दांपासून हा प्रत्यय आला असावा.’’ नीर म्हणजे पाणी. पूर्वी पाण्याच्या, नदीच्या जवळ वस्ती केली जायची. कारण शेतीसाठी, गुराढोरांसाठी आणि एकूणच जगण्यासाठी पाण्याचे नैसर्गिक स्रोत जवळ असणं आवश्यक होतं. ‘नेर’ प्रत्यय नीर म्हणजे पाण्याशी संबंधित आहे. कुलकर्णी म्हणतात, ‘‘नेर’ हा शब्द ‘नीवरम्’ किंवा ‘नगरम्’ या शब्दापासून आला असावा.
गावाच्या नावामागे मोठय़ा प्रमाणात लागणारा आणखी एक प्रत्यय म्हणजे ‘पूर’ आणि ‘ऊर’. ‘पूर’ प्रत्ययाची महाराष्ट्रातली गावं म्हणजे सोलापूर, नागपूर, कडेपूर इ. हा पूर प्रत्यय हिंदीमध्ये ‘पुर’ होतो. उदा. जयपुर, उदयपुर, कानपुर इ. या प्रत्ययाविषयी कृ. पां. कुलकर्णी म्हणतात, ‘‘पूर म्हणजे नगर.’’ संस्कृतमधील किंवा ‘पृ’ या मूळ शब्दापासून हा प्रत्यय आला आहे. त्याचा अर्थ तट किंवा भिंत असा आहे. तटबंदी घालून वसवलेल्या नगरांना म्हणजे शहरांना ‘पूर’ प्रत्यय लागला असावा. पूर म्हणजे शहर या अर्थाशी मिळतेजुळते शब्द प्राचीन युरोपी भाषांमध्येही आढळतात. उदा. लॅटिनमध्ये ‘पोलिस’ (Polis), ग्रीकमध्ये ‘पोली’ असे शब्द आहेत.
या ‘पूर’शी मिळताजुळता एक प्रत्यय म्हणजे ‘ऊर’. हा प्रत्ययही अनेक गावांच्या नावामागे दिसतो. उदा. लातूर, नाहूर, माहूर, राजूर, परतूर इ. कानडी आणि तामीळ या द्राविडी भाषांमध्ये ‘ऊर्’ शब्द आहे. त्याचा अर्थ होतो गाव. कानडी भाषेच्या प्रभावाने मराठीमध्ये गावांच्या नावामागे हा प्रत्यय आला असावा. बेलूर, येलूर अशी गावं कर्नाटकातही आहेत.
गावाच्या नावामागे मोठय़ा प्रमाणात वापरला आणखी एक प्रत्यय म्हणजे ‘बाद’. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण या देशांतील अनेक गावांच्या किंवा शहरांच्या नावामागे हा प्रत्यय दिसतो. उदा. अहमदाबाद, हैदराबाद, इस्लामाबाद, होशंगाबाद, दौलताबाद, अबोटाबाद, जलालाबाद इ. हा प्रत्यय फार्सा भाषेतून आला आहे. आबाद म्हणजे वसलेले, पेरलेले, सुखी असा होतो. गावाच्या नावामागे ‘बाद’ प्रत्यय लागतो तेव्हा त्याचा अर्थ नगर किंवा शहर असा होतो.
खास करून लहान गावांच्या नावामागे लागणारा, पण अधिक प्रमाणात वापरात असलेला प्रत्यय म्हणजे ‘वाडी’. लहान गावांच्या नावामागे ‘वाडी’ प्रत्यय लावला जातो. अशा लहान गावांत बऱयाचदा एकाच जातीच्या लोकांची घरं असतात किंवा इतर जातींतील लोक तिथं राहत असतील तर त्यांची संख्या अगदीच नगण्य असते. बऱयाचदा तर एकाच जातीतील आणि एकाच आडनावाच्यासुद्धा अशा वाडय़ा असतात. त्यामुळे अशा गावांची नावं तिथं राहत असलेल्या लोकांची जात किंवा आडनाव आणि पुढे ‘वाडी’ असा प्रत्यय लावून तयार झालेली दिसतात. उदा. धनगरवाडी, वंजारवाडी किंवा सलगरवाडी इ. कधी एखाद्या व्यक्तीच्या नावानेही अशा गावांची नावं असतात. उदा. कुशाबाची वाडी. कधी एखाद्या देवाच्या नावावरून गावाचं नाव असतं. उदा. नरसोबाची वाडी. कृ. पां. कुलकर्णी यांच्या मते, ‘वाड’ म्हणजे वसतिस्थान, राहण्याचे ठिकाण. त्यावरून ‘वाडी’ शब्द तयार झाला आहे. कानडी आणि तामीळ या भाषांमध्येही ‘वाडी’ शब्दाचा अर्थ लहान गाव असाच होतो. शिवाय ‘वाडी’ शब्दाचा एक अर्थ बाग, शेती असाही होतो.