दुरून नमन साजिरे!

>> दिलीप जोशी

परस्परांना अभिवादन करण्याच्या, आदर व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती जगभर पूर्वापार प्रचलित आहेत. आपल्याकडे महाराष्ट्रात, विशेषतः गावाकडे दोन माणसं एकमेकांना भेटली की, ‘राम राम’ करतात. काही जण नमस्कार म्हणतात, गुजरातेत ‘जय श्रीकृष्ण’ म्हटलं जातं, तर देशभरात ‘नमस्ते’ बोलून, प्रसंगी दोन्ही हात जोडून अभिवादन केलं जातं. ‘नमस्ते’ म्हणजे ‘नमः’ व ‘ते’ या दोन शब्दांचा संधी असलेला संस्कृत शब्द. नमः म्हणजे अर्थातच नमन किंवा नमस्कार आणि ‘ते’ म्हणजे आपणांस किंवा तुम्हाला. त्यात आदराची भावना आपोआपच येते. देवापुढे, महान व्यक्तींच्या प्रतिमांपुढे आपण हात जोडून आणि नतमस्तक होऊन अभिवादन करण्याची आपली प्रथा. आत्यंतिक आदर, भक्ती व्यक्त करताना वाकून नमस्कार किंवा पाया पडण्याचीही आपली पारंपरिक पद्धत.

जगामधल्या विविध संस्कृतींमध्ये अभिवादनाच्या अनेक पद्धती आहेत. ज्या चीनमधल्या वुहान शहरातून ‘कोरोना’चं थैमान सुरू झालं, त्या चीनमध्ये ‘नी हाओ’ असं हात उंचावून परंपरेने अभिवादन केलं जायचं. याचा अर्थ ‘हॅलो’सारखा होतो. जपानमध्ये कमरेत किंचित वाकून अभिवादन करण्याची पद्धत आपल्याकडे कराटे वगैरे मार्शल आर्टमधून परिचित झाली आहे. तिबेटमधील साधू तर जीभ बाहेर काढून अभिवादन करतात. एका देशातल्या अभिवादनाचा प्रकार दुसऱया ठिकाणी सर्वसंमत ठरेलच असं नाही, पण त्यांची ती पारंपरिक पद्धत आहे हे लक्षात घेता आश्चर्य वाटेल.

काही ठिकाणी फक्त मान लपवून अभिवादन केलं जातं. काही वेळा आदराने नतमस्तक झाल्यावर ज्येष्ठ व्यक्तीने आशीर्वादासारखा हात डोक्यावर धरण्याची प्रथा दिसते. आदराने दुसऱया व्यक्तीचा उपडा पंजा हाती घेऊन डोकं टेकवलं जातं. ब्रिटिश राजघराण्यात हात हाती घेत आदरार्थी नमन करण्यात येतं. मात्र इतर वेळी जनसामान्य हस्तांदोलनच करतात.
अमेरिकेत गेलात तर अनोळखी व्यक्तीही तुमची नजरानजर झाल्यावर ‘हाय’ करील. काही देशांत नाकाला नाक भिडवून (नोजबम्प) तर कुठे ‘फ्लाइंग किस’ देऊन, हृदयावर उजवा हात ठेवून, अशा अभिवादनाच्या अनेक पद्धती. मुघल काळात आपल्याकडे सलाम, कुर्निसात, मुजरा करणे अशाही अभिवादनाच्या पद्धती रुजल्या.

त्यानंतरच्या काळात म्हणजे गेल्या तीनशे वर्षांत जगात युरोपचा आणि त्यातही इंग्लंडचा प्रभाव वाढला. त्यांच्याबरोबर त्यांचे राजशिष्टाचार आणि रोजच्या जीवन पद्धतीही सर्वदूर पसरल्या. इंग्लिश लोकांनी जगाला ‘गुड मॉर्निंग’ आणि ‘गुड नाइट’ म्हणण्याची सवय लावली. ‘थँक्यू’ आणि ‘सॉरी’सारखे शब्द आपलेच असल्याइतके जिभेला वळण लावून गेले. एखादी गोष्ट लक्षात आली नाही तर शहरी भागातली माणसं ‘आय बेग युवर पार्डन’ किंवा नुसतं ‘पार्डन’ म्हणू लागली. व्हॉटस्ऍपसारख्या माध्यमातून तर फोनवर ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड नाइट’चा सडा पडू लागला. त्याही पलीकडे जाऊन ‘इमोजी’ची चित्रभाषा भावना व्यक्त करू लागली. अशा ‘दूरस्थ’ गोष्टींचा प्रश्न नव्हता, पण पाश्चात्त्य पद्धतीच्या ‘शेकहॅण्ड’ला गेल्या काही दिवसांत अचानक पायबंद बसला तो ‘कोरोना’च्या उद्रsकामुळे. आता युरोप, अमेरिकेत म्हणे ‘एल्बो बम्प’ म्हणजे कोपराने दुसऱयाच्या कोपराला स्पर्श करणे असा प्रकार सुरू झालाय म्हणे.

आपल्याकडेही अगदी जवळची मायेची, प्रेमाची व्यक्ती किंवा जीवश्चकंठश्च मित्रांमध्ये कडकडून मिठी मारण्याची पद्धत आहेच, परंतु ती अगदी व्यक्तीसापेक्ष असते. तो सार्वत्रिक शिष्टाचार नव्हे. आपला अभिवादनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दोन्ही कर जोडोन नमस्कार किंवा नमस्ते. हे दुरूनच केलेलं अभिवादन मनाला स्पर्शून जातं आणि तेवढं पुरेसं असतं.

इंग्रजी अमदानीपासून रुळलेली ‘शेकहॅण्ड’ची पद्धत वाईट होती असं नाही, परंतु जगात नित्यनव्या ‘व्हायरस’ची उत्पत्ती नवनवी आपत्ती निर्माण करीत असताना अपरिचितांसाठी ‘गडय़ा आपुला नमस्कार बरा’ असं आता अनेकांना म्हणजे अगदी पाश्चात्त्य देशांतल्या लोकांनाही वाटू लागलंय.

तशी हात जोडून नमस्काराची प्रथा हिंदुस्थानातून चीन, जपान, म्यानमार, इंडोनेशिया आणि अनेक पौर्वात्य देशांत शेकडो वर्षांपूर्वींच पोहोचली असल्याने जगाला हे अभिवादन नवीन नाही. जगभरचे अनेक नेते, अभिनेते, खेळाडू इथे येतात तेव्हा ‘नमस्ते’ करतात. पहिले चांद्रवीर मुंबईत आले तेव्हा तेसुद्धा ‘नमस्ते’ म्हणत जनतेला अभिवादन करण्याचं शिकून आले होते. एकेकाळी आमच्या शाळेत शिक्षक वर्गात आले की, आम्ही ‘नमस्ते गुरुजी’ किंवा ‘नमस्ते बाई’ असं म्हणायचो. कोणी पाहुणे शाळेत आले तर मास्तरांनी ‘एक साथ’ असा शब्द उच्चारला की, आम्ही उच्चारवाने सामूहिक ‘नम।़स्ते’चा गजर करीत असू. आता नव्या युगात जगभरच ‘नमस्ते’ची गरज निर्माण होताना दिसतेय. एखाद्याला निरोप देतानाही आपण नमस्ते म्हणतो, पण ‘कोरोना’सारख्या भीषण रोगाला हाकलून देणं महत्त्वाचं. त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच. नागरिक म्हणून आपणही आपली कर्तव्यं बजावूया. सध्या तरी दुरून नमन साजिरे करूया.

आपली प्रतिक्रिया द्या