ठसा – नाना भिडे

>> दुर्गेश आखाडे

मराठी आंबा-फणसाबरोबरच करवंद, जांभूळ, आवळा यांच्या नैसर्गिक चवीची ज्यांनी जिभेला चटक लावली, त्या योजकच्या उत्पादनाचे संस्थापक नाना भिडे यांचे नुकतेच वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. कोकणात फळ प्रक्रिया उद्योग सुरू करून जगभर कोकणमेव्याला नावलौकिक मिळवून देण्याचे काम नाना भिडे यांनी केले. तरुणांसमोर फळ प्रक्रिया उद्योगाचा आदर्श नाना भिडेंनी उभा करून दिला आहे.

नाना भिडे यांचे पूर्ण नाव कृष्णा परशुराम भिडे. त्यांचा जन्म 3 जून 1931 साली रत्नागिरी तालुक्यांतील चिंचखरी वेसुर्लेवाडी येथे झाला. नाना दहा वर्षांचे असताना त्यांचे वडील परशुराम भिडे यांना देवाज्ञा झाली. लहानपणीच पितृछत्र हरपलेल्या नानांवर त्यांच्या आई भागीरथीबाईंनी संस्कार केले. काही वर्षांनी नाना आपल्या आईसोबत रत्नागिरीत स्थायिक झाले. रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये शिकले. याच शाळेत त्यांनी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. मॅट्रिकनंतर नानांनी भिडे उपाहारगृह हा वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय स्वीकारला. या व्यवसायाबरोबरच आंबा विक्री व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा व्यवसाय सुरू केला. पाच-सहा वर्षांत इलेक्ट्रानिक्स व्यवसायात आलेल्या चढ-उतारामुळे त्यांनी तो व्यवसाय बंद केला, पण त्यांच्यातील कल्पकता आणि उद्यमशीलता त्यांना शांत बसू देत नव्हती. आंबा-फणसाबरोबर कोकणातील जंगलात सापडणारी करवंद, आवळा, जांभळांसारखी फळे त्यांना उद्यमशीलतेकडे खुणावत होती. जंगलात सापडणाऱया फळांवर प्रक्रिया केली तर ग्रामीण भागात रहाणाऱया कोकणी माणसाच्या कनवटीला चार पैसे जमतील, हे त्यांनी ओळखले. कोकणातील अशा फळापासून खाद्यपदार्थ आणि शरबतं तयार करायला सुरुवात झाली. तिथेच योजक उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1978 साली योजक नावाने त्यांनी उत्पादने बाजारात आणायला सुरुवात केली. अतिशय दर्जेदार, गुणवत्ता असलेली चवदार पेय योजकने बाजारात आणली. नानांनी फळ प्रक्रिया उद्योगात अस्सल गुणवत्तेला महत्त्व दिले. त्यामुळेच योजकची उत्पादने ग्राहक अतिशय विश्वासाने खरेदी करू लागला. रत्नागिरीत येणारा चाकरमानी असो किंवा देश-विदेशातून येणारा पर्यंटक असो कोकणमेवा खरेदीसाठी तो योजकची निवड करत होता. ही नानांच्या मेहनतीची आणि यशाची पोचपावती होती. कोकणमेवा हा पर्यटकांना आकर्षित करण्याचा एक मार्ग होता. त्यात नाना भिडे यशस्वी झाल्याने कोकणच्या पर्यटनवृद्धीत योजकच्या उत्पादनांचा वाटा मोठा आहे. आज फळ प्रक्रिया उद्योगातून योजकची 78 उत्पादने बाजारात दिमाखात उपलब्ध आहेत. कोकणमेव्याला बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवून देण्यात योजकचे योगदान आहे. फळं नाशवंत माल आहे. पण त्यावर प्रक्रिया केली तर अधिक काळ टिकणारे उत्पादन आपण बनवू शकतो. त्यासाठी बाहेर जायची किंवा बाहेरून फार काही मागवायची गरज नाही. कोकणाच्या निसर्गानेच माणसाला भरभरून दिलंय. त्याचा उपयोग करता आला पाहिजे, ही शिकवण नानांनी तरुण उद्योजकांना दिली आहे.

1984 साली नानांनी आणखी एक व्यवसाय सुरू केला, तो म्हणजे भिडेसेवा. लग्न, मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मंडप, टेबल-खुर्च्या, जेवणासाठीची भांडी व अन्य साहित्य भाडय़ाने दिले जाते. योजक आणि भिडेसेवा उद्योगात स्थानिकांना रोजगार निर्माण झाला. 1992 साली त्यांनी झाडगाव एमआयडीसी येथे फॅक्टरी सुरू केल्यावर उत्पादने अधिक वेगाने होऊ लागली. कोकणात फळ प्रक्रिया उद्योग उभारा, अशी मागणी करणाऱयांसाठी नाना भिडेंनी योजकच्या रूपाने एक कार्यशाळाच उभी केली आहे. पावसचे स्वामी स्वरूपानंद हे नानांचे अध्यात्मिक गुरू होते. स्वामी स्वरूपानंदांनीच त्यांची स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळावर कायमस्वरूपी सदस्यपदी नेमणूक केली होती. नाना भिडे यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान होते. अनेक उपक्रमांना ते देणगी स्वरूपात मदत करत होते. चिंचखरी येथील दत्त मंदिर जीर्णोद्धारात त्यांचे योगदान आहे. नाना स्वभावाने शांत असले, तरी व्यव्हाराच चोख आणि शिस्तप्रिय होते. कधीही त्यांच्या वर्तणुकीत मालकाचा किंवा उद्योजकाचा डामडौल दिसला नाही, हीच त्यांची खरी लोकप्रियता होती.

आपली प्रतिक्रिया द्या