लेख – युवा शक्तीला विधायक वळण हवे

379

>> दिलीप देशपांडे

खरं तर युवा शक्तीत खूप सामर्थ्य नक्कीच आहे. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीलाही राष्ट्रीय युवा दिवस साजरा करतो. त्यांना युवा शक्तीवर खूप विश्वास होता. ‘युवा’ शब्दातच वायू म्हणजे गती आहे. त्यांना संस्कारक्षम, कणखर, राष्ट्राप्रति, समाजाप्रति प्रेम असणारा निर्व्यसनी युवक अपेक्षित होता. युवा दिन साजरा करताना शासनाने-राजकीय नेत्यांनी युवा शक्तीला, युवा संघटनांना विधायक वळण द्यायला हवे. तरच खऱया अर्थाने युवा दिन साजरा केल्याचे सार्थक होईल. आज देशाच्या सीमेवर जाऊन आपल्या देशाचे रक्षण करणारा देशभरातील युवकच आहे. त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे.

हिंदुस्थान हा जगातील सगळ्यात मोठा युवकांचा देश आहे. हिंदुस्थानात 65 टक्के युवकांची संख्या आहे, असे म्हटले जाते. युवा पिढीच्या क्षमतेवर, ताकदीवर हिंदुस्थानही जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. आजच्या परिस्थितीत काही ठरावीक युवा पिढीत नवीन शिकण्याची आवड आहे, जिद्दही आहे. देशाच्या विकासात त्यांचा सहभाग आहे.

जागतिक स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. युवकांशी निगडित काही विषयांवर चर्चा घडवून आणली जाते.

लिब्सन येथे 8 ते 12 ऑगस्ट 1998 मध्ये पार पडलेल्या युवकांशी निगडित मंत्र्यांच्या परिषदेत 12 आँगस्ट जागतिक युवा दिवस साजरा करण्याची शिफारस केली गेली आणि त्यावर 17 डिसेंबर 1999 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले, तेव्हापासून 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक युवा दिवस म्हणून साजरा होतो.

युवा दिवस साजरा करत असताना युवकांशी निगडित काही विषय/प्रश्नांची शासकीय आणि युवा पातळीवर चर्चा होणे आवश्यक वाटते.

  • युवक आणि विद्यार्थी संघटना
  • युवक आणि राजकीय संघटना
  • युवक आणि सोशल मीडिया
  • युवक आणि राजकारण
  • युवक आणि सामाजिक जाणिवा, जबाबदारी

महाविद्यालयीन स्तरीय युवकांच्या विद्यार्थी संघटना आहेत. एकेका महाविद्यालयात दोन/तीन/चार अशा संघटना बघायला मिळतात. या संघटना कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या अधिपत्याखाली कार्य करत असतात. त्यामुळेच राजकीय मतभेद त्यांच्यातही पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे, ऍडमिशनचा प्रश्न, महाविद्यालय, हॉस्टेलमध्ये ऍडमिशन, जादा फी आकारणीकडे लक्ष देऊन विद्यार्थी वर्गाला न्याय मिळवून देणे हे महत्त्वाचे काम विद्यार्थी संघटनांचे आहे, पण त्यांचा अधिक तर वेळ वादातच जातो. बऱयाच वेळा पोलिसांपर्यंतही वाद जातात. मुंबई, पुणे, दिल्ली आदी अनेक ठिकाणच्या घटनांवरून विद्यार्थी संघटना कशा राजकीय बनल्या आहेत हे दिसते.

राजकीय पक्षांच्या युवा संघटना, शाखा, आहेत. त्यांची वर्णी कुठल्या तरी मंडळावर, सहकारी बँकेवर, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर लागते. बाकी युवक हे फक्त आधारस्तंभ असतात. त्यांना वापरून घेतले जात असते. हे आधारस्तंभ अधांतरीच असतात.

आजचा युवक इंटरनेट, मोबाईल, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सऍप अशा सोशल मीडियाच्या जाळ्यात नको तितका अडकला आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. या शक्तीचा हवा तेवढा उपयोग करून न घेता दुरुपयोग जास्त केला जातो. त्यामुळे फार मोठय़ा प्रमाणात युवक त्यात अडकून आत्ममग्न झालाय. चुकीच्या दिशेने वापर होतोय. संवाद कमी होतोय. वाचन कमी झालंय.

नवीन तंत्रज्ञान मिळतंय, सगळं जग जवळ आलंय, पण माणसं हरवली आहेत. मीडियाचा योग्य वापर करण्याची समज नाही. म्हणून युवा शक्तीला विधायक वळण द्यायला हवे.

राजकीय पक्ष तरुणांचा वापर निवडणूक कामी मोठय़ा प्रमाणावर करून घेतात. ती एक अलिकडे पद्धतच झाली आहे. शिवाय युवाकांचा राजकारणात प्रवेशही त्यामुळेच सुकर होऊ शकतो त्यामुळे राजकीय पक्ष तरुणांचा वापर करत असले तरी त्यात खूप चुकीचे नाही मात्र असेही चित्र दिसते की एक मोठा तरुण वर्ग या राजकारणाच्या वेडापायी वाया जातो. कारण कुठल्या ना कुठल्या निवडणुका असतातच. रोजगार नसलेला लाखो, करोडोच्या संख्येने युवक यात गुरफटला आहे. ही गंभीर बाब आहे. त्यातच त्याच्या सामाजिक जाणिवा लोप पावत आहेत. समाजातल्या अत्याचार, भ्रष्टाचाराबद्दल त्याला काही घेणे देणे नाही, जाणिवा बोथट झाल्या आहेत. घरातल्या घरात खुनाचे प्रकार घडतायत. कुठून आली आहे ही अस्वस्थता? रोजगार नसल्याने फार मोठय़ा संख्येने युवक अस्वस्थ आहे. ज्या ठिकाणी संधी उपलब्ध असते, तिथे पोहोचत नाही किंवा टिकाव लागत नाही. वैचारिक क्षीणता यायला लागलीय.

एकीकडे शेतकरी युवक वर्ग आहे. सिस्टीममधल्या भ्रष्टाचाराने तो गांजला आहे. खते, बियाणे यातही भ्रष्टाचार, बोगस बियाणे अशा अनेक प्रश्नांनी तोही त्रासला आहे. अनेक युवा शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

खरं तर युवा शक्तीत खूप सामर्थ्य नक्कीच आहे. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीलाही राष्ट्रीय युवा दिवस साजरा करतो. त्यांना युवा शक्तीवर खूप विश्वास होता. ‘युवा’ शब्दातच वायू म्हणजे गती आहे. त्यांना संस्कारक्षम, कणखर, राष्ट्राप्रति, समाजाप्रति प्रेम असणारा निर्व्यसनी युवक अपेक्षित होता.

युवा दिन साजरा करताना या सर्व गोष्टींची चर्चा सर्व क्षेत्रांतील युवकांना, युवा संघटनांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन व्हायला हवी. युवकांची ‘मन की बात’ ओळखायला हवी.

शासनाने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा आहे. नवनवीन संधी प्राप्त करून द्यायला हव्यात. हाच त्यावर एकमेव उपाय आहे. नाहीतर राष्ट्राची ताकद म्हणून ज्या युवकांकडे आपण पाहतो ती युवा पिढी राजकारण, सोशल मीडियाच्या, निवडणुकीच्या फेऱयात बरबाद होण्याचा धोका आहे. आपला देश बेरोजगार, व्यसनाधीन युवकांचा देश व्हायला वेळ लागणार नाही. तशा काही युवक संघटना आणि युवा नेते चांगले कार्य करीत आहेत. ही चांगली गोष्ट आहे मात्र त्यात आणखी वाढ व्हायला हवी.

युवा दिन साजरा करताना शासनाने आणि राजकीय नेत्यांनी या गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्यायला हव्यात. युवा शक्तीला, युवा संघटनांना विधायक वळण द्यायला हवे. तरच खऱया अर्थाने युवा दिन साजरा केल्याचे सार्थक होईल.

आपली प्रतिक्रिया द्या