लेख – निसर्ग हाच मानवाचा गुरू !

>> स्नेहा अजित चव्हाण,  [email protected]  

आपली प्रत्येक गरज निसर्गातूनच पूर्ण होत असते. आपण कृत्रिम वस्तूंबाबत बोलत असतो तरी त्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल निसर्गातच मिळतो. अन्नवस्त्रनिवारा या प्राथमिक गरजाही तोच पूर्ण करतो. जीवन जगण्यासाठी काहीतरी प्रेरणा असावी. ती असल्याशिवाय प्रगती होत नाही. निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. त्याचे देणे अपार असले तरी तो प्रसंगी कठोर होऊन धडेही देतो. सभोवताली पहाल तर निसर्गाकडून शिकण्यासारखे खूप आहे. किंबहुना निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असते.

अनादी आणि अनंत काळापासून निसर्ग आहे. मानवाची उत्पत्तीदेखील त्यानंतर झाली. तेव्हा निसर्ग आज आणि नंतरही असेल. आपली प्रत्येक गरज निसर्गातूनच पूर्ण होत असते. आपण कृत्रिम वस्तूंबाबत बोलत असतो तरी त्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल निसर्गातच मिळतो. अन्न – वस्त्र – निवारा या प्राथमिक गरजाही तोच पूर्ण करतो. जीवन जगण्यासाठी काहीतरी प्रेरणा असावी. ती असल्याशिवाय प्रगती होत नाही. निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. सभोवताली पहाल तर निसर्गाकडून शिकण्यासारखे खूप आहे. किंबहुना निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असते.  निसर्गापासून आपल्याला काय शिकता येईल? निसर्ग प्रत्येक क्षणी आपल्याला धडे देत असतो. ते कसे ते पाहूया.

फूलः हवेच्या झुळकांवर डोलणारी नाजूक गोंडस फुले पाहून कोणालाही छान वाटते. परमेश्वराच्या सौंदर्यदृष्टीचे प्रतीक म्हणून फुलांकडे पाहिले जाते. फुले म्हणजे परमेश्वराचे जणू हास्य. ती केवळ आपल्याला समाधानच देत नाहीत, तर त्यांच्याप्रमाणे जीवन आनंदात जगण्याची प्रेरणाही देतात. फुलांप्रमाणे आपले जीवनही टवटवीत असावे. फुलांप्रमाणेच आपल्या आयुष्यातसुद्धा रंग, गंध आणि आकर्षण असावे, असे ती सांगतात.

पाणीः सतत पुढे जाणे हा पाण्याचा स्वभाव किंवा गुणधर्म आहे. ते असे पुढे जात असल्याने निर्मळ राहते. एका जागी अडलेल्या पाण्याचे डबके तयार होऊन त्याला दुर्गंधी येते. आपल्या आयुष्याची वाटचाल अशीच सतत पुढे जाणारी हवी. ती तशी राहिली तर आपले जीवनही निर्मळ होईल. निसर्गात वाहणारे झरे, ओढे आणि नद्या आपल्याला हेच तर सांगत असतात.

समुद्रः समुद्राच्या तळाचा ठाव लागणे कठीण असते. त्याचप्रमाणे मानवाचे हृदयही समुद्राप्रमाणे गंभीर असायला हवे. सगळ्या नद्या त्याच्यात सामावत असूनही समुद्र शांत आणि गंभीर असतो. मानवाचा स्वभाव असाच हवा. उथळ स्वभावामुळे  जीवनाला अर्थ राहत नाही आणि खवळलेला समुद्र करत असलेल्या विध्वंसाप्रमाणे आपली स्थिती होते.

सूर्यः पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीच्या प्राणशक्तीचा स्रोत म्हणजे सूर्य. तो तप्त असतो आणि प्रकाशही देतो. त्याच्या आगमनामुळे अंधार नाहीसा होतो. दररोजच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी प्रकाश घेऊन सूर्य उगवत असतो. जीवनात संकटरूपी अंधार आला तरी न घाबरता त्याच्याबरोबर मुकाबला केल्यावर संकटे दूर होऊन यश मिळत असल्याचा संदेश सूर्य देतो.

चंद्रः आकाशातील हजारो ताऱ्यांमध्ये चंद्र एकटा चमकत असतो.  त्याचप्रमाणे माणूस आपल्या आयुष्यात चमकू शकतो. ‘चंद्र त्याचा कलंक स्वतःजवळ ठेवून आपले सौंदर्य सर्वांना देतो’, असे महाकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे ते यासाठीच. चंद्राला आध्यात्मिक ज्योतीचे प्रतीकही मानले जाते.

आकाशः अनंत असलेल्या आकाशाला कोणत्याही सीमा नाहीत.  आकाशाप्रमाणे मानवाचे हृदयही विशाल असल्यास त्यात संकुचित विचारांना स्थान राहणार नाही आणि ती व्यक्ती विकसित होत जाते.

ढगः पावसाळी ढग पाण्याने भरलेले असले तरी ते स्वतःला रिकामे करत असल्याने आपली तहान भागते आणि शेते बहरतात; पण सध्याच्या काळात माणूस दिवसरात्र काहीतरी मिळवण्यासाठी धावतो आहे. आपल्या जीवनात सद्विचार आणि सद्गुणांची शेती बहरण्यासाठी आपल्यालाही ढगांप्रमाणे चांगल्या विचारांचे सिंचन मनात केले पाहिजे. चांगले काही स्वीकारण्यासाठी आपण सदैव तयार राहिल्यास जीवन समाधानी होते.

पृथ्वीः आपल्या सर्वांची आई म्हणजे पृथ्वी. मुलांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून कोणतीही आई ज्याप्रमाणे कष्ट करते, संकटे झेलते, त्याचप्रमाणे पृथ्वी करत असते. खाणी आणि उद्योगांसाठी सगळीकडे होत असलेली खोदकामे, जंगलतोड तसेच पर्यावरणाचा ऱहास हे सगळे पृथ्वी सहन करते आहे.  तिच्याप्रमाणे आपणही सहनशील झाले पाहिजे.

वृक्षः तळपत्या उन्हापासून वृक्ष आपल्याला सावली देऊन वाचवितात. ते आपल्याला विविध प्रकारची फळेही देतात. फळांनी लगडलेला वृक्ष नम्रपणे वाकलेला असतो, तर फळे नसलेला वृक्ष ताठ उभा असतो. विनम्रता हा गुण वृक्षाकडून घेता येतो. जेवढे सद्गुण असतात तेवढा माणूस नम्र होत असल्याचे वृक्ष दाखवून देतात.

दिवाः दिवा अथवा  दीप भारतीय संस्कृतीचे एक प्रतीक आहे. अंधारावर मात करणारा  दिवा आपल्याला वाईट स्थितीवर मात करण्याची प्रेरणा देतो.  दिव्यांची ज्योत आपल्याला हेच सांगते. नीरवता आणि शांततेची ती प्रतीक आहे. ज्योतीच्या सान्निध्यामध्ये परमेश्वराचे ध्यान करण्याची प्रेरणा मिळते.

(लेखिका शिक्षक समुपदेशक आहेत)