नऊवारीचे विविध रंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पूजा तावरे

आदिमायेच्या उत्सवासाठी सगळेच तयारीला लागले आहेत. आपल्या स्त्रियांचा शृंगार… पेहराव… ही यातील महत्त्वाची बाब. नऊवारी साडी आता पुन्हा ग्लॅमरस आणि लोकप्रिय झाली आहे. पाहूया नऊवारीचे विविध रंग…

साडी म्हटलं की, स्त्रियांचा सर्वांत जिव्हाळय़ाचा विषय आणि त्यातही फेस्टिव्ह सीजन असला की ते मिरवण्याची पर्वणीच असते. सण कुठलाही असो, साडी ही महिलांची नेहमीच पहिली आणि हवीहवीशी गोष्ट राहिली आहे. सध्याच्या फेस्टिव्ह सीजनसाठी हटके आणि युनिक नऊवारी साडीचा वापरण्याकडे मुलींचा व महिलांचा हट्ट असतो. सध्या पारंपरिक दागिन्यांबरोबर शोभून दिसणाऱ्या नऊवारी साडीचा ट्रेंड पॉप्युलर होताना दिसत आहे. महाराष्ट्रात ही नऊवारी साडी मोठय़ा प्रमाणात नेसली जाते. पूर्वीच्या काळात महिला नऊवारी साडी परिधान करायच्या. अखंड कापड हे नऊवारीचे वैशिष्ट्य. या नऊवारी साडीला काष्टा साडी म्हणून देखील बोलले जाते. पण ही साडी नेसण्याची पद्धत मात्र वेगळी होती. नऊवारी नेसण्याच्या विविध पद्धती पाहायला मिळतात. ज्यामध्ये कोल्हापुरी, ब्राह्मणी, कोळी, मराठा, पेशवाई आणि लावणी असे प्रकार पाहायला मिळतात.

स्त्रियांच्या पारंपरिक वेशभूषेत महत्त्वाची मानली जाते ती आकर्षक, गडद रंग, नाजूक रेशीम, जरीचा काठ असलेली नऊवारी साडी. त्यामुळे सण, समारंभात वेगवेगळय़ा धाटणीच्या नऊवाऱयांना सध्या भलतीच मागणी आहे. या साडय़ा कितीही जड असल्या तरीही उत्सवकाळात या ऑथेंटिक मराठी लूक देतात.

सध्या नऊवारी साडी शिवून घेण्याची पद्धत सुरू झाली आहे. आता तर स्टिच्ड नऊवारी असं ‘रेडिमेड वेअर’देखील बाजारात मिळायला लागलंय. पण आपण ‘बाजीराव मस्तानी’मध्ये दीपिका आणि प्रियांकाने नेसलेली साडी ही पेशवाई आणि लावणी पद्धतीच्या नऊवारीचं मिश्रण आहे. फेस्टिव्ह व लग्नाच्या सीझनमुळे नऊवारीची मागणी वाढली आहे. हल्ल स्टिच्ड नऊवारी साडी नेसण्यासाठी वयाचं बंधन राहिलेलं नाही. वयस्कर स्त्रियादेखील हल्ली शिवलेल्या नऊवारीला पसंती देतात. पुन्हा एकदा सणासुदीला, विवाह सोहळ्यांमध्ये नऊवारी मोठय़ा प्रमाणावर दिसू लागली आहे.

सध्या रेडी टू वेअर नऊवारी साड्यांची मागणी वाढली आहे. ही साडी काही मिनिटांत नेसता येते बेळगावी सिल्क, बंगळुरूचे सिल्क, येवला प्युअर सिल्क, येवला पैठणी, आर्टिफिशियल सिल्क, पॉलीस्टर, बेळगाव मिक्स, मदुराई पॅटर्न, कोल्हापुरी इरकल, सेमी पैठणी अशा वेगवेगळय़ा प्रकारातल्या नऊवारी साडय़ा निवडून रेडी टू वेअर नऊवारी शिवता येते. याबरोबरच अष्टमी, नवमीकरिता देवींकरितादेखील अत्यंत सुंदर अशा नऊवारी बाजारात दाखल झाल्या आहेत.

नऊवारीमय बॉलीवूड

सध्या नऊवारीतील वैविध्याची जाणीव अधिक होऊ लागली असून मराठमोळय़ा नऊवारीची विविध रूपे चित्रपट व फॅशन क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. ‘बाजीराव मस्तानी’तील दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्राचा नऊवारीतील ‘लूक’, अग्निपथमधील कतरिना, फेरारी की सवारीमधील विद्या बालन आणि अय्यामधली राणी मुखर्जी अशा असंख्य उदाहरणांवरून नऊवारीची क्रेझ पाहायला मिळते.

नथ, अंबाडा किंवा खोपा, गळय़ाची शोभा वाढविणारी ठुशी, गळय़ाला घट्ट बसणारी चिंचपेटी, काहिसा लांब मोत्यांचा लफ्फा, मोतीच्या कुडय़ा, कर्णफुल, बुगडय़ा, मोत्याचे वेल, पाटल्या, बिल्वर बांगड्यांचा प्रकार, दंडाची शोभा वाढवणारे बाकी, बाजूबंद-कमरपट्टा, मेखला, पैंजणबरोबर चौकडीच्या डिझाईन्सपासून बुट्टय़ांच्या खास नक्षी, सोनेरी पदर असा नऊवारीचा खानदानी साज छानच दिसेल… तेव्हा नऊवारी साडीच्या हटके लूकच्या सोबतीने उत्सवकाळ बनवा अधिक स्पेशल!!!

लेखिका फॅशन डिझायनर आहेत.