
>> स्वरा सावंत
आज घरोघरी आई दुर्गा विराजमान होईल. मातीच्या रूपात… रुजवणाच्या रूपात… विधिवत घटस्थापना होईल. पाहुया या सुबक… सुंदर मातीच्या घटांचे, दिव्यांचे महत्त्व…
आदिमाया आदिशक्तीचा जागर आजपासून महाराष्ट्रासह अन्य प्रांतात सुरू होईल. खरं तर हा जागर भूमातेचा… म्हणूनच की काय, प्रांत कोणताही असला तरीही या उत्सवाला परंपरा आहे ती रुजवणाची. म्हणून जाणून घेऊया घट आणि रुजवणाचं महत्त्व.
आजपासून ते थेट विजयादशमीपर्यंत देव स्थिर होणार आहेत. सार्वजनिक मंडळे सोडली तर घरोघरी देवीच्या आदिशक्तीच्या रूपात घटांची स्थापना केली जाते. आजच्या घडीला कामानिमित्त अनेक कुटुंबं आपलं मूळ गाव सोडून शहरात स्थायिक झालीत. या मूळ गावी असणाऱ्या कुलदेवता, तिथली जमीन अर्थात भूमाता यांची पूजाअर्चा करण्याचा उत्सव. यामुळेच या उत्सवाची थेट नाळ ही मातीशी जोडली गेली आहे. या उत्सवात घटाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात दुर्गादेवीचा हा उत्सव साजरा करताना नऊ दिवसांच्या नऊ शिंपण करून तयार होणाऱ्या रुजवानाला विशेष महत्त्व आहे. गहू, ज्वारी, भात, नाचणी, वाटाणा, हरभरे, कोथिंबीर, चवळी यांसह 12 धान्ये एका विशिष्ट भांड्यात, घडात, टोपलीत किंवा मातीच्या उथळ घागरीत पेरली जातात. यावर पहिल्या दिवशी साध्या पाण्याचे, दुसऱ्या दिवशी हळदीच्या पाण्याचे, तिसऱ्या दिवशी बेलाच्या पाण्याचे तर चौथ्या दिवशी गोमुत्राचे शिंपण केले जाते. असे नउ दिवस शिंपण केल्यानंतर दसऱ्याच्या पूजेला हे रुजवण तयार होते. काही ठिकाणी या रुजवणाच्या माळाही घातल्या जातात.
महाराष्ट्राला लाभलेली शिवकालीन परंपरा
सिंधुदुर्गातल्या ओवळिये गावी उंचच उंच असलेल्या सिद्धगडावर दुर्गादेवीच्या नवरात्रातला घट छत्रपती शिवरायांनी बसवला. येथील साडेसतरा गावांना एका माळेत गुंफण्यासाठी ही परंपरा महाराष्ट्रात आणली. हा एक उत्सवच नाही, तर ही समाज बांधणी शिवरायांनी अश्विन शुद्ध प्रतिपदेला केली. हा घट स्थापन झाल्यानंतर याची जबाबदारी नाथपंथीय गोसावी समाजाकडे सोपवून शिवराय पुढील कार्यासाठी मार्गस्थ झाले. साडेसतरा गावांतून पतीर फिरवून मिळणाऱ्या उत्पन्नातून गडावरील घटाची स्थापना ते विसर्जनाची तजवीज करण्यात आली. पुढे या पद्धतीला ‘मोहिनी’ म्हणून ओळखण्यात येऊ लागले. ही खेडी म्हणजे आचऱ्यापासून मालंड, असरोंडी, किर्लोस, शिरवंडे, मसुरे, पोईप, मसदे, हिवाळे, ओवळिये, ओसरगाव, अध्रे बोर्डवे, हेदूळ, खोटले, वायंगवडे, डिकवल, गोळवण आहेत. आजही ही शिवकालीन परंपरा येथे अविरत सुरू आहे.
आख्यायिका…
पूर्वी एका महिषासुर नामक राक्षसाने पृथ्वीवर फारच थैमान घातले होते. देवदेवता, ऋषीमुनी, साधू संतसज्जन यांना अगदी सळो की पळो करून सोडले होते. तेव्हा इंद्रदेवता यांसह पूर्ण देवमंडळ यांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे धाव घेतली आणि आपली व्यथा, महिषासुराची कुकर्मे त्यांना सांगितली. यावेळी देवतांना आलेल्या क्रोधातून शक्ती देवता प्रगट झाली. हीच आदिशक्ती. पुढील नऊ दिवस या महिषासुराशी लढली आणि अखेर दशमीला तिचा विजय झाला. हाच दिवस आपण विजयोत्सव म्हणून साजरा करतो.
मातीच्या घटाला बाजारात मोल
सध्या टोपल्या, पसरट परातींमध्ये रुजवण घालण्याचा फंडा अनेकांनी शोधला असला तरी मातीच्या घटांना, घागरींना अजूनही विशेष मागणी आहे. जाळीदार, कोरलेल्या विशिष्ट डिझाईन्सच्या लाल आणि काळ्या मातींपासून बनवलेले घट 100 रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बेसिक लाल काळ्या मातीच्या घटांवर मोती, कुंदन, लेस, शंख यांचे कोंदण करून हे घट सजवण्यात येतात. या एका घटाला तयार करण्यासाठी आठवड्याहून अधिक वेळ लागतो. नवरात्रात हे घट विकले जात असले तरी याचे काम वर्षभर चालते. हे घट 150 रुपयांपासून 10 हजारांपर्यंत वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. गुजरातमधून येणाऱ्या या डिझायनर घटाला मुंबई, ठाण्यातून प्रचंड मागणी असल्याचे विक्रेते केशव गडा यांनी सांगितले. हा व्यवसाय चैत्र आणि अश्विन नवरात्रात विभागल्याने चांगला फायदा होतो असेही ते म्हणाले.
गुजरात्यांचा ‘गरबो’
महाराष्ट्रातला घट, रुजवण, घागर हा गुजरातमध्ये जाऊन ‘गरबो’ होतो. गुजरात राज्यात तसेच समाजात गरबोची स्थापना होते. डिझायनर हंडी, त्यात मुगाची पेरण आणि अखंड तेवणारा दिवा असा या गरबोला कपड्यांचा, दागिन्यांचा साज चढवून हा समाज त्यांच्या कुलदेवतेची पूजा करतो. या गरबोसमोर फेर धरून केलेल्या नृत्यालाच ‘गरबा’ म्हणून आपण ओळखतो. नऊ दिवस आशापुरा देवीचा हा उत्सव साजरा केल्यानंतर त्यात आलेल्या रुजवणाला वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाते, अशी माहिती विक्रोळी येथील स्थानिक मीनाक्षी दाराड यांनी कच्छी राजपूत समाजाच्या वतीने दिली.





























































