अंतराळ -निओवाईज धूमकेतू…पुन्हा न दिसणारा पाहुणा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुजाता बाबर

पृथ्वीतलावर सजीव सृष्टी निर्माण होण्यास धूमकेतू कारणीभूत आहेत हे विज्ञान मानते. आपल्या सूर्यमालेला अचानक भेट देणाऱया अनेक अवकाशस्थ वस्तू आहेत. यात धूमकेतूंविषयी विशेष आकर्षण आहे. 14 जुलै ते 4 ऑगस्ट 2020 या काळात या शतकातील निओवाईज धूमकेतू दिसणार आहे.

धूमकेतूंचे नाव कसे ठरते?

धूमकेतूंच्या नामकरणाच्या विशिष्ट पद्धती आहेत. आपल्यासारखे मनात आले ते नाव ठेवले असे होत नाही. कोणताही धूमकेतू शोधला आणि तो नवीन धूमकेतू आहे याची खात्री झाली की, त्याला नाव दिले जाते. इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियनतर्फे सेन्ट्रल ब्युरो ऑफ ऍस्ट्रॉनॉमिकल टेलिग्राम्स ही संस्था ही नावे त्यांच्या वेगवेगळ्या प्रकाशनांमधून जाहीर करते. धूमकेतूची कक्षा प्रथम ज्या वर्षी नोंदवली गेली आहे, ते वर्ष त्या नावामध्ये असते. धूमकेतू शोधणाऱया व्यक्ती किंवा संस्थेचे नाव असते. अनेकदा त्या वर्षीच्या कोणत्या काळात तो शोधला गेला आहे याचादेखील उल्लेख असतो. धूमकेतूला नाव देण्यात आलेले वेणू बापू हे एकमेव हिंदुस्थानी खगोलशास्त्रज्ञ आहेत.

निओवाईजचा शोध

हा धूमकेतू याच वर्षी 27 मार्च रोजी शोधण्यात आला. नासाच्या ‘निअर अर्थ ऑब्जेक्ट वाईल्ड फिल्ड इन्फ्रारेड सर्व्हे एक्सप्लोरर’ (निओवाईज) या अवकाश दुर्बिणीने या धूमकेतूचा शोध लावला. या धूमकेतूचा खगोलीय भाषेतील क्रमांक हा C/2020 F3 आहे. हा धूमकेतू पृथ्वीपासून सर्वात कमी अंतरावरून म्हणजेच 10 कोटी 30 लाख किलोमीटर प्रवास करतो आहे. त्याचा आकार पाच किलोमीटर इतका मोठा आहे. त्याच्या दोन्ही शेपटय़ा तेजस्वी आहेत.

जगभरामध्ये कोरोना विषाणू धुमाकूळ घालत असला तरी खगोलाला काही फरक पडत नाही. घरामध्ये राहून गेल्या चार-पाच महिन्यांत अनेकांनी आकाश दर्शनाचा, सूर्यग्रहणाचा आनंद घेतला आहे. पुन्हा असाच आनंद देण्यासाठी येत आहे एक पाहुणा, निओवाईज धूमकेतू!

हा धूमकेतू सूर्याभोवती 6800 वर्षांची दीर्घ वर्तुळाकार कक्षा पूर्ण करतो. अनेकांनी हा धूमकेतू पाहिला असून तो सध्या अत्यंत तेजस्वी दिसत आहे. 1997 साली आलेला हेल-बॉप नावाचा धूमकेतू असाच तेजस्वी दिसला होता आणि त्याला त्या शतकातील धूमकेतू असे म्हटले गेले होते. निओवाईज धूमकेतूदेखील त्याच्या तेजस्वीतेमुळे या शतकातील धूमकेतू ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धूमकेतू 14 जुलै ते 4 ऑगस्ट 2020 या काळात आपल्याला दिसणार आहे.

आपल्या सूर्यमालेला अचानक भेट देणाऱया अनेक अवकाशस्थ वस्तू आहेत. यात धूमकेतूंविषयी विशेष आकर्षण आहे. पृथ्वीतलावर सजीव सृष्टी निर्माण होण्यास धूमकेतू कारणीभूत आहेत हे विज्ञान मानते आणि त्यामुळे आज आपण आणि तमाम सजीव सृष्टी ही धूमकेतूंमुळे आहे हे लक्षात घेतले तर मात्र त्याविषयी गैरसमज दूर होतील.

धूमकेतूंचा इतिहास

प्राचीन काळापासून धूमकेतूंच्या नोंदी सापडतात. प्राचीन खगोलशास्त्रामध्ये चिनी ग्रंथांमध्ये धूमकेतूंची चित्रे सापडतात. ही चित्रे साधारण ख्रिस्तपूर्व 200 मधली आहेत. अरबांनी त्यांच्या आकारावरून आणि आकारमानावरून त्यांचे वर्गीकरण केले होते. याच प्रमाण पद्धतीने सहाव्या शतकातील वराहमिहीर यांनीदेखील वर्गीकरण केले होते. ग्रीकमध्ये सेनेका या शास्त्रज्ञाने धूमकेतूंच्या अनेक नोंदींचे संकलन केले होते. नंतर अनेक चित्रे, पेंटिंग्ज यांमधून धूमकेतूंची नोंद सापडते. बायेक्स ट्रपेस्ट्री या विणलेल्या चित्रामध्ये 1066 मध्ये आलेल्या धूमकेतूचे चित्र सापडते. हा कदाचित हॅलेचा धूमकेतू लोकांनी त्या वेळेस पहिला असावा.

हिंदुस्थानमध्ये धूमकेतूंच्या अतिप्राचीन नोंदी आहेत. अथर्व वेदामध्ये अशनी आणि धूमकेतूंपासून संरक्षण व्हावे अशा प्रार्थना सापडतात. महाभारत आणि रामायण अशा काव्यांमध्येदेखील यांच्या नोंदी आहेत. वराहमिहीर याने 1000 धूमकेतू आणि धूमकेतूंसारख्या अवकाशस्थ वस्तूंची त्यांच्या रंग आणि आकार यावरून नोंद केली आणि त्यांचे वर्गीकरणदेखील केले. त्यांच्या संकलनाचा ग्रंथ त्यांनी सहाव्या शतकामध्ये ‘बृहतसंहिता’ नावाने लिहिला होता. काही धूमकेतूंचे मार्गदेखील यात नोंदविलेले आहेत. यात कलाकेतू नावाच्या धूमकेतूने अभिजित ताऱयावरून अधिक्रमण केल्याची नोंददेखील आहे. जहांगीर राजालादेखील खगोल निरीक्षणाची आवड होती. त्याने त्याच्या ‘तुझुक-ए-जहांगीर’ या ग्रंथामध्ये धूमकेतूंच्या नोंदी केल्या आहेत. ही 1618 मधील नोंद आहे. तामीळ कवी सुब्रह्मण्य भारती यांनीदेखील 1910 च्या हॅले धूमकेतूची नोंद केली आहे. इ.स. पूर्वी 384 ते 322 या कालावधीत ऑरिस्टोटल याने धूमकेतूंची महत्त्वाची नोंद केली आहे. 16 व्या शतकात टायको ब्राहे यांनीदेखील नोंदी केल्या आहेत.

धूमकेतू आणि त्यांच्या कक्षा

बरेचसे धूमकेतू हे सूर्यमालेमधील लहान वस्तू आहेत. हे धूमकेतू लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरतात. धूमकेतू या कक्षांमध्ये अनेक वर्षे, हजारो वर्षे, लाखो वर्षे फिरत राहू शकतात. सूर्याच्या उपसूर्यस्थानी (सूर्याच्या सर्वात जवळचे स्थान) येण्यासाठी ते अनेक वर्षेदेखील घेऊ शकतात. काही कक्षा इतक्या मोठय़ा असतात की, धूमकेतू हे त्यामध्ये हरवून जातात. धूमकेतू इतर फिरणाऱया वस्तूंप्रमाणे केप्लरचे नियम पाळतात. सूर्याच्या जवळ आले की, त्यांचा वेग वाढतो.

साधारण 200 वर्षांपेक्षा लहान परिभ्रमण काळ असलेले धूमकेतू म्हणजे लहान कक्षेचे धूमकेतू. मोठय़ा कालावधीच्या धूमकेतूंची कक्षा ही विकेंद्री कक्षा असते किंवा एक्सेन्ट्रिक असते. यात 200 ते लक्षावधी किंवा अब्जावधी वर्षांच्या परिभ्रमण काळाच्या धूमकेतूंचा समावेश असतो. काही धूमकेतू हे एकदाच भेट देतात आणि दूरवर निघून जातात. हे अपास्ताकार कक्षेमधील धूमकेतू असतात. असे काही शेकडो धूमकेतू माहीत आहेत.

तुमचे नावदेखील धूमकेतूला दिले जाऊ शकते, अर्थातच तुम्ही असा धूमकेतू शोधला तर… पाटील धूमकेतू, लिमये धूमकेतू, सोनार धूमकेतू, शहा धूमकेतू, स्वामी धूमकेतू…… वा! असे झाले तर मजाच येईल. अर्थात हे सोपे नाही. यासाठी आकाशाचे सतत निरीक्षण करावे लागते.

उल्का वर्षाव आणि धूमकेतू

धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येतात तसे सूर्याच्या उष्णतेमुळे त्यांच्यामधले द्रव्य शेपटीच्या स्वरूपात केंद्रकाच्या मागे फिरत असते. धूमकेतूची कक्षा आणि पृथ्वीची भ्रमण कक्षा एकमेकांना छेदतात तेव्हा हे कण एखाद्या झोताप्रमाणे आपल्या वातावरणात शिरतात. इथे पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण होऊन ते पेट घेतात आणि अशा वेळेस मोठा उल्का वर्षाव दिसतो. धूमकेतू येऊन परत गेला तरी त्याचे द्रव्य किंवा डेब्रिस हे एखाद्या ट्रेलप्रमाणे त्या धूमकेतूच्या भ्रमण कक्षेत फिरत असते. त्यामुळे ठरावीक काळात आणि ठरावीक दिवशी आपल्याला उल्का वर्षाव दिसतात. टेम्पल-टटल धूमकेतूमुळे दरवर्षी होणारा प्रसिद्ध सिंहस्थ उल्का वर्षाव 17 नोव्हेंबर रोजी सर्वात अधिक असतो. आता हा वर्षाव आपल्याला 2031 मध्ये प्रचंड मोठा दिसेल.

निओवाईज धूमकेतू कधी व कसा पाहणार?

निओवाईज धूमकेतू संध्याकाळी सहा ते रात्री साडेनऊपर्यंत पाहता येईल. आकाश निरभ्र असेल तर तो हिंदुस्थानातून सगळीकडून दिसेल. सिंह आणि सप्तर्षी तारका समूहाच्या मध्यस्थानी म्हणजेच वायव्य दिशेला क्षितिजाच्या वर दिसेल. दुर्बीण किंवा द्विनेत्रीच्या साहाय्याने तो अधिक चांगला दिसू शकतो. या धूमकेतूची कक्षा साडेसहा हजार वर्षांची असल्याने तो पुन्हा इ. स. 8000 नंतरच पृथ्वीवरून दिसू शकेल. म्हणजे आपल्यासाठी ही एकमेव संधी आहे!

निओवाईज धूमकेतूदेखील हेल-बॉप धूमकेतूप्रमाणे तेजस्वी दिसेल का? हे प्रत्यक्ष दर्शनच ठरवेल. खगोलप्रेमी निओवाईज धूमकेतू दिसण्याची वाट पाहत आहेत. हवा खूपच ढगाळ आहे. बराच पाऊस पडत आहे. निसर्गाची कृपा होवो आणि निओवाईजचे दर्शन सर्वांना मिळो!