आभाळमाया – ‘समंजस’ उपग्रह

492

>> वैश्विक ([email protected])

परस्परांना टकरण्याची किंवा या ना त्या कारणाने हमरीतुमरीवर येण्याची खोड प्राणिमात्रास असते. माणूसही त्याला अपवाद नाही. सकारण किंवा अकारणही ‘अरे’ला ‘का रे’ करीत भांडण्याची खुमखुमी बरेच जण शमवून घेतात. तिकडे दूर अवकाशात पृथ्वीपासून कोटय़वधी, अब्जावधी किलोमीटरवर काय घडत असतं?  असंच काहीसं अनेक ग्रहांवर उल्का, अशनी कोसळत असतात. मध्येच कोणी धूमकेतू उपटतो आणि एखाद्या ग्रहाला आदळण्याची भीती दाखवतो. पृथ्वीवर अमुक ‘अशनी’ किंवा महापाषाण आदळणार असल्याच्या बातम्या तर वारंवार येत असतात. हा महाआघात कधी होणार याच्या तारखाही छातीठोकपणे जाहीर होतात. 1960 पासून अशा ‘कुमुहूर्ता’चं अनेकदा ऐलान झालं असलं तरी पृथ्वी (अजून तरी) अशा कोणत्याही अवकाशी उत्पातापासून सुरक्षित राहिलेली आहे.

नाही म्हणायला 1987 मध्ये ‘स्कायलॅब’ या मानवनिर्मित यानाचेच कोसळणे पृथ्वीला पाहावे लागले. आजही अनेक देशांनी अवकाशात सोडलेल्या कृत्रिम उपग्रहांची दाटी झाली आहे. त्यापैकी काहींची टक्करही (कोलीजन) झाली आहे. मात्र त्याचे तुकडे अवकाशातच भिरभिरत राहिल्याने आजवर त्यांचा उपसर्ग पृथ्वीवासीयांना पोहोचलेला नाही. मात्र भविष्यात तसा धोका नसेलच असं निश्चित सांगणं कठीण.

कृत्रिम उपग्रह फक्त पृथ्वीभोवतीच फिरतात. कारण आपल्या ग्रहमालेत एक केवळ पृथ्वीवरच आपल्यासारखा बुद्धिमान प्राणी राहतो. त्याने केलेल्या संशोधनाचं फलित अवकाश व्यापताना दिसतं. यापुढे त्यात खासगी संस्था, कंपन्यांची भर पडून अवकाशात कृत्रिम वाहनांचं ‘ट्रफिक जॅम’ झाल्याचंही ऐकायला येईल. असा काळ फार दूर नाही. आपल्या पृथ्वीला एकच सुंदर चंद्र आहे. मंगळाचे उपग्रह फोबो व डिमो अगदीच बेंगरूळ आहेत. गुरूला 79 तर शनीला 83 चंद्र आहेत. हे लिहीत असतानाही त्यांची संख्या वाढू शकते. तशी ती गेल्या अनेक वर्षांत वाढतच आहे. म्हणजे ते नैसर्गिक उपग्रह वा ग्रहांभोवती आहेतच, पण त्यांचा थांगपत्ता आपल्याला अभ्यासातून हळूहळू लागतोय.

आपल्या ग्रहमालेच्या टोकाला असलेल्या नेपच्यून ग्रहाला सुमारे 14 चंद्र आहेत. सूर्यापासून 2 अब्ज 80 कोटी किलोमीटरवर असलेल्या नेपच्यूनचं दर्शन नुसत्या डोळय़ांनी अशक्य. त्यासाठी शक्तिशाली दुर्बिणच हवी. या नेपच्यूनच्या नियाद आणि थेलेसा या दोन उपग्रहांच्या भ्रमणाविषयीची रंजक माहिती नासाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली. प्रत्येक ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह अर्थातच त्याभोवती परिक्रमा करतात. नियाद आणि थेलेसा यांचा त्याला अपवाद कसा असेल?

… पण गंमत अशी की, नेपच्यूनचे हे दोन उपग्रह त्याभोवती फिरतात. त्या दोघांमधलं अंतर फारच कमी म्हणजे अवघं 1150 किलोमीटर इतकं आहे. यात किंचित बदल झाला तर त्यांची टक्कर सहज होऊ शकते. मात्र हे दोन उपग्रह इतक्या ‘समंजसपणे’ या परस्परांची काळजी घेतात की, त्यांची टक्कर टळते. थेलेसा नेपच्यूनभोवती साडेसात तासांत तर नियाद सात तासांत एक फेरी पूर्ण करतो. आपल्या ज्येष्ठ ग्रहाभोवती फेरी मारणाऱया या दोन उपग्रहांपैकी नियादची कक्षा थेलेसाच्या कक्षेच्या तुलनेत थोडी कललेली तर आहेच, पण नियादची फेरी नागमोडी (झिगझॅग) चालीने होते. त्यामुळे तो थेलेसाची ‘गळाभेट’ टाळून नेपच्यूनला फेरी मारतो. निसर्गाने निर्हेतुक केलेली ही अचंबित गोष्ट शास्त्रज्ञांनाही बुचकळय़ात टाकतेय. पृथ्वीपेक्षा 17 पट वस्तुमान असलेल्या नेपच्यूनचा शोध 23 सप्टेंबर 1846 रोजी लागला. जॉहॅन गेल आणि अर्बेन की व्हेरिअर यांनी नेपच्यूनचं अवकाशी अस्तित्व शोधून काढलं. पृथ्वीच्या तुलनेत नेपच्यूनला सूर्याभोवती फेरी घ्यायला 168 वर्षे लागतात. अवकाशात अशा बऱयाच गमती जमती आहेत. आपल्या दृष्टीने त्या विस्मयकारी असल्या तरी विश्वाच्या निर्मितीत त्या नगण्यच. व्हॉयेजर-2 हे यान 1980 मध्ये त्याच्या जवळून गेलं. नंतर ‘हबल’ स्पेस टेलिस्कोपने त्याचे अनेक फोटो पाठवले.

आपली प्रतिक्रिया द्या