
>> प्रा. शरयू जाखडी
सागरात जसा दीपस्तंभ धीरोदात्तपणे रात्रंदिवस लाटांचा मारा सहन करीत उभा राहून सागरात तरंगणाऱया जहाजांना योग्य दिशा दाखवीत असतो तसे निवृत्तीनाथांनी भावंडांचे आणि संतसमुदायाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे संतसमुदायाने त्यांना ‘आचार्य’ या सन्माननीय पदाने गौरविलेले आहे. अशा या आचार्य निवृत्तीनाथांची आज पुण्यतिथी. या महापुरुषाने ज्येष्ठ कृष्ण द्वादशीच्या दिवशी आपल्या गुरूंच्या सान्निध्यात त्र्यंबकेश्वरी गुरू गहिनीनाथांचे स्मरण करून संजीवन समाधी घेतली.
संत निवृत्तीनाथांचे व्यक्तिमत्त्व निःस्पृह, निरहंकारी आणि क्षमाशील होते. ते आचारधर्माचा पुरस्कार करणारे विरक्त व प्रज्ञाशील मनाचे ध्यानयोगी सिद्धपुरुष होते. त्यांच्या मनाचा कोश मूलतः पितृप्रेमाच्या प्रेमरज्जूंनी विणलेला होता. आकाशस्थ सूर्य आपल्या चैतन्य प्रकाशातून जगाला प्रेरणा आणि स्फूर्तीचा स्त्र्ााsत देतो, तसे निवृत्तीनाथ प्रेरक व स्फूर्तिदायी होते. कमलपत्रावरील दवबिंदूवत निवृत्तीनाथ आपल्या नावाप्रमाणे निवृत्त साक्षीभूत मनाने अलिप्त राहिले. आईवडिलांच्या पश्चात निवृत्तीनाथांनी धीरोदात्तपणे आपल्या भावंडांना वडिलांच्या मायेने हृदयाशी कवटाळले. त्यांना आधार व मायेची ऊब दिली. या ज्ञानमहर्षीने गुरू गहिनीनाथांकडून मिळालेले ज्ञान भावंडांना प्रदान केले. भाऊ-बहीण असा भेदभाव न करता निवृत्तीनाथांनी मुक्ताईलाही ज्ञानाचा व ब्रह्मचर्य पालनाचा अधिकार दिला. त्यामुळे संतमंडळीत तिला मानाचे स्थान प्राप्त झाले. ‘मुक्ताईचे चित्त निरंतर मुक्त’ असे म्हणणारी मुक्ताई गुरू निवृत्तीनाथांच्या मार्गदर्शनाखाली अद्वैतबोध व सगुणभक्ती यात पारांगत झाली. चौदाशे वर्षांच्या चांगदेवाचे गुरुपद तिने भूषविले आणि आपल्या शिष्यावर या आदिमायेने पुत्रवत प्रेम केले. त्याच प्रमाणे तिने आपल्या ज्ञानदादाला ‘ताटीच्या अभंगात’ खरे संतत्व काय असते हे सांगून कार्यप्रवृत्त केले. निवृत्तीनाथांनी सोपानदेवांना गुरुदीक्षा व ज्ञानाधिकार दिला. सोपानदेवांच्या अंगी प्रखर वैराग्य निर्माण झाले आणि त्यांनी वैराग्यविषयक आत्मप्रत्ययातून अभंग निर्मिती केली. विसोबा खेचरांचे ते गुरू होते. संन्याशाची मुले म्हणून या भावंडांची जी हेटाळणी झाली, त्यासंदर्भात सोपानदेव अंतर्मुख होऊन समाजाला विचारात की-
‘व्यास आणि वाल्मिकी । कोण कुळ त्यांचे।
तैसेचि आमुचे । सोपान म्हणे ।।’
मनात कुठलाही न्यूनगंड न बाळगता सोपानदेव मोठय़ा आत्मविश्वासाने समाजाला सामोरे गेले. या मागची प्रेरणा व आत्मविश्वास त्यांना निवृत्तीनाथांनी दिला होता. संत ज्ञानेश्वरांचेसुद्धा प्रेरणास्थान संत निवृत्तीनाथच होते. ज्ञानेश्वरांना भगवद्गीतेच्या वैश्विक तत्त्वज्ञानावर भाष्य करायला निवृत्तीनाथांनी सांगितले. तसेच ज्ञानेश्वरांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा आविष्कार घडवण्यासाठी चिद्विलासवादाचे अत्युच्च तत्त्वज्ञान ‘अमृतानुभवांतून’ मांडण्यासाठी निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्रवृत्त केले. चांगदेवाच्या कोऱया पत्राला वाचून त्याचे उत्तर तुला द्यायचे आहे. असे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना सुचवल्यावर ‘चांगदेव पासष्टी’ हे ज्ञानात्मक पातळीवरून ज्ञानदेवांनी ‘तत्त्वमसि’ या महावाक्याचे विवरण करणारे पासष्ट ओव्यांचे प्रकरण लिहिले आहे. त्या पत्रातून ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना आत्मस्वरूपाची ओळख करून दिली आहे.
संत निवृत्तीनाथ नाथसंप्रदायी होते. निवृत्तीनाथ दहा वर्षांचे असताना ब्रह्मगिरीच्या अंजनी पर्वतावरील गुहेत गहिनीनाथांनी त्यांना नाथसंप्रदायाची दीक्षा दिली. नाथसंप्रदायाची परंपरा मूळ आदिनाथ भगवान शंकरांपासून सुरू होते. शैव व दत्तसंप्रदायाशी या संप्रदायाचे अतूट नाते आहे. नवनाथांच्या अद्भुत कथा श्रेष्ठ ग्रंथ ‘नवनाथ भक्तिसारात’ येतात. श्रीमद्भागवत पुराणाच्या अकराव्या स्पंदात निमीराजाशी नवनारायणांचे संवाद झाले आहेत. नवनाथांच्या जन्माचे रहस्य त्यात उलगडले आहे. भगवान विष्णूने नाथांच्या समवेत कलियुगात कार्य करायचे ठरवल्यामुळे नाथपंथाशी वैष्णवपंथही जोडला गेला. ब्रह्मदेवाने या अवतारांना तेजरूपाने सहाय्य केले. गहिनीनाथ या द्रष्टय़ा योग्याने निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांचे जन्मरहस्य सांगितले आहे. ते म्हणजे ही भावंडे अनुक्रमे शिव, विष्णू, ब्रह्मदेव व आदिमाया यांचे अवतार आहेत आणि ईश्वरीकार्यासाठी ते भूतलावर अवतीर्ण झाले आहेत. नाथपंथाचे मच्छिंद्रनाथ हे प्रवर्तक आहेत. निष्कलंक चारित्र्य, तपःसाधना, अलौकिक प्रज्ञा आणि प्रतिभा हे महत्त्वाचे दैवीगुण नवनाथांच्या ठायी होते. या गुणांच्या साहय़ाने ते समाजातील मुख्य प्रवाहात सामील झाले. संघटन, प्रचारक शक्तीतून अनेक वाईट प्रथा परंपरांना बळी पडलेल्या समाजात जागृती करून त्यांना खरा आत्मोन्नतीचा मार्ग नाथसंप्रदायात दाखवला. गुरुनिष्ठा व तपःसामर्थ्य यातून नवनाथांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. त्या सिद्धीचा उपयोग त्यांनी मानवी कल्याणासाठी केला आणि हे करीत असताना संस्कृत देववाणीपेक्षा सर्वसामान्यांच्या लोकवाणीचा पुरस्कार केला. या सर्व तत्त्वज्ञान, ध्यानयोग व बालकृष्णांच्या भक्तीची उपासना यांची दीक्षा निवृत्तीनाथांना दिली. गुरूंकडून मिळालेला हा सर्व विश्व कल्याणाचा अमृतपुंभ निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांच्या हाती सोपवला. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाच्या आधारे नाथपंथी विचारांचा विकास केला. ‘ज्ञानेशो भगवान विष्णुः’ अशा ज्ञानदेवांनी भागवत धर्माच्या झेंडय़ाखाली सर्वसामान्यांच्या आत्मोद्धाराचा मार्ग दृष्टीपथात आणला. ज्ञानेश्वर म्हणतात, ‘हे सर्व कार्य माझ्या हातून घडले, तथापि त्याचा सूत्रधार हा माझा गुरू आहे.’ मी त्यांच्या हातचे एक कळसूत्री बाहुले आहे. माझी गुरुमाऊली कामधेनू आहे. तिच्या कृपाप्रसादाने माझी वाङ्मयसृष्टी बहराला आली.’ आपल्या कर्तृत्वाचे सारे श्रेय ज्ञानेश्वरांनी गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित केले आहे.
निवृत्तीनाथांचे योगपर अद्वैतभक्तिपर, कृष्णभक्तीपर काही अभंग आणि इतर साहित्य उपलब्ध आहे. त्यांचा एक आत्मपर अभंग त्यांचे मनोगत व्यक्त करणारा आहे.-
नाही जाति कुळवर्ण अधिकार । क्षत्री वैश्य शुद्र द्विज नव्हे ।
ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट । निजबोधे इष्ट स्वरूप माझे।।
या चार ओळींत जणू त्यांचे आत्मचरित्र आले आहे. त्यात लौकिक आणि अलौकिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतल्यावर सर्व भावंडांवर पितृवत प्रेम केलेल्या धीरोदात्त निवृत्तीनाथांच्या तोंडून पुढील हृदयद्रावक उद्गार निघाले-
तुझ्यामुळे हरि चालतो उगला । देहाआधी गेला प्राण माझा।
ज्येष्ठांचे आधी कनिष्ठांचे जाणे । केले नारायण उफराटे ।।
ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर एक वर्षाच्या आत सर्व भावंडे समाधीस्थ झाली. त्यांची शरीरे भिन्न होती. तरी ‘ज्योतिर्मय’ आत्मा एक होता. ही सर्व भावंडे प्रकाशातून आली, त्यांनी जगाला प्रकाश दिला आणि ती सारी परत प्रकाशातच विलीन झाली.





























































