लेख – ऑलिम्पिक आणि आपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी  

ऑलिम्पिकइतका सातत्यपूर्ण क्रीडा महोत्सव मात्र जगात अन्यत्र होत नसावा. त्यामुळे आजच्या जागतिक, विविधरंगी क्रीडा स्पर्धांना ऑलिम्पिकचं नाव देणं उचित आहे. गेल्या 23 जूनला जागतिक ऑलिम्पिक दिवस साजरा झाला आणि त्याआधीच 18 जून रोजी हिंदुस्थानचे जगप्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन झालं. 91 वर्षांचं प्रदीर्घ जीवन लाभलेल्या मिल्खा सिंग यांची जीवनकथा एखाद्या चित्रपटकथेपेक्षाही थरारक होती. हे सत्य पडद्यावर आणणारा ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट आला आणि गाजला. त्यातली फरहानची मिल्खाची उत्तम भूमिका पाहताना वृद्ध मिल्खा सिंग यांना आपलं दुर्दैवी बालपण आठवून अश्रू अनावर झाले होते.

ऑलिम्पिक खेळांचा कार्यक्रम इसवीसनाच्या चौथ्या शतकापर्यंत अव्याहत सुरू होता. नंतर त्यात बदलत्या जागतिक परिस्थितीत खंड पडला; परंतु त्याचा विसर मात्र पडला नव्हता. अधूनमधून जगाला ऑलिम्पिक खेळांची आठवण यायची असं 776 मधल्या एका शिलालेखातून समजतं. ऑलिम्पिकच्या दर चार वर्षांनी होणाऱया क्रीडा महोत्सवाची परंपरा नंतरही तुटकपणे सुरू राहिली. त्याला आधुनिक खेळ, महोत्सवाचं स्वरूप आलं ते 1894 मध्ये फ्रान्सच्या बर्टन पिअरे यांनी ‘इंटरनॅशनल ऑलिम्पिक समिती’ स्थापन करण्यात पुढाकार घेतला तेव्हाच. त्याआधी 1843 मध्ये स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये 15 हजार प्रेक्षकांसमोर ऑलिम्पिक खेळ झाले होते. असे युरोपात अनेकदा अनेक ठिकाणी झाले. पण 1896 मध्ये त्याला जागतिक स्वरूप आलं आणि ते टिकून राहिलं. या वर्षीचं ऑलिम्पिक जपानच्या टोकियो शहरात भरतंय. त्यावर कोविडचं सावट आहेच, परंतु खेळाडू सज्ज आहेत आणि यावेळी हिंदुस्थानचा चमूही तिकडे जात आहे.

हिंदुस्थानच्या वतीने सन 1900 मध्ये पॅरिस येथे झालेल्या समर ऑलिम्पिकमध्ये ब्रिटिश राजवटीने पाठवलेल्या खेळाडूंत नॉर्मन लिकॅर्ट यांनी दोन रौप्य पदकं मिळवली होती. नंतर एकाच वेळी दोन पदकं सुशीलकुमारने मिळवली. 1920 पर्यंत हिंदुस्थानचा स्वतंत्र ऑलिम्पिक संघ नव्हता. तो अस्तित्वात आल्यावर आपले अनेक खेळाडू तेथील विविध स्पर्धांत भाग घेण्यासाठी जाऊ लागले. महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे 1952 मध्ये हेलसिंकी येथे भरलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक प्राप्त करून हिंदुस्थानला प्रथमच जागतिक कुस्तीच्या मैदानात विजय मिळवून दिला.

त्यानंतर व्यक्तिगत खेळाडूंमध्ये अनेक खेळाडूंनी विविध खेळांत जागतिक प्रावीण्य सिद्ध केलं. त्यातील काही नावं म्हणजे पी. टी. उषा (धावपटू), अभिन बिंद्रा (राफल शूटिंग), विजेंदर सिंग (बॉक्सिंग), लिअँडर पेस (टेनिस) अशी अनेक नावं सांगता येतील. सांघिक खेळात हिंदुस्थानने हॉकी या खेळात अनेक वर्षे अजिंक्यपद आणि अर्थातच सुवर्णपदक मिळवून देशाची शान राखली. 1928 ते 80 या काळात आपल्या हॉकी संघाने देदीप्यमान कामगिरी बजावली. तो ‘सुवर्ण’काळ पुन्हा येण्याची आशा बाळगूया. ध्यानचंद यांना तर हॉकीचा जादुगार म्हटलं जायचं. या वेळच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी  निवड झालेल्या एकूण 74 खेळाडूंची कामगिरी कशी होते ते पाहायचं.

मिल्खा सिंग यांना ऑलिम्पिकच्या पदकाने मात्र अगदी थोडक्यात हुलकावणी दिली असली तरी त्यांचं धावपटुत्व जगाने मान्य केलं होतं. कारण अनेक आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या धाव क्षमतेचा चमत्कार घडवून सुवर्ण पदके मिळवली होती. 1959 मध्ये त्यांना हिंदुस्थान सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. 1960 मध्ये नेहरूंच्या विनंतीवरून मिल्खा सिंग यांनी पाकिस्तानातील एका स्पर्धेत भाग घेऊन त्यांच्या प्रसिद्ध धावपटू अब्दुल खलिक याला पराभूत केलं. ज्या पाकिस्तानातून 1947 मध्ये मिल्खा सिंग यांना जीव वाचवण्यासाठी पळून यावं लागलं होतं, त्याच पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष आयुब खान यांना मिल्खा सिंग यांचा गौरव ‘फ्लाइंग शीख’ या शब्दात करावा लागला. अशा या इतिहास घडवणाऱया धावपटूच्या जाण्याने देश हळहळला. एकेका क्षेत्रातील काही नाममुद्रा कायम स्मरणात राहतात, तसेच पद्मश्री मिल्खा सिंगही राहतील. मात्र ऑलिम्पिक कुस्तीतलं पहिलं कांस्य पदक (ब्रॉन्झ मेडल) आणणाऱया खाशाबांना पद्म पुरस्कार न मिळाल्याची खंतही मराठी मनाला वाटत राहील.

[email protected]