
>> दिलीप जोशी n [email protected]
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पंढरीच्या विठ्ठलाला भक्त आणि भक्तांना त्यांचा विठूराया भेटला. कोविडचा कहर झाल्यापासून नाइलाज हाच इलाज होऊन सारेच व्यवहार थबकले. सुरुवातीला वाटलं होतं, महिनाभरात लॉक डाऊन उठेल, परंतु जगभरची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक कोरोनाग्रस्त होत गेली आणि सारी मानवजमात त्रस्त झाली. 2020 ची आषाढी, कार्तिकी आणि या वर्षीची आषाढीची पंढरपूरची वारीही होऊ शकली नाही. वारी म्हणजे वारकऱ्यांच्या जिव्हाळय़ाचा विषय, तसाच तो अवघ्या मराठी मनाचाही. ‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी, नाचती वैष्णव भाई रे’ असं तुकोबांनी म्हटलंय. मात्र गेल्या दीड-पावणेदोन वर्षांत पंढरीत विठ्ठलनामाचा सामूहिक गजर होण्यात कोरोनाने बाधा आणली.
गेली शेकडो वर्षं लाखो वारकऱ्यांच्या सहभागाने होणारी वारी नाही याची खंत मनामनांत होतीच. विठ्ठलनामाचा जयघोष करत वारकरी स्त्री-पुरुषांची लाखो पावलं पहिल्या पावसात पेरण्या आटोपल्या की, पंढरीच्या दिशेने निघायची. ज्ञानोबा, तुकोबा आदी संतांच्या पालखीचा सोहळा नयनरम्य असायचा. ‘पहावा विठ्ठल जीवेभावे’ म्हणत टाळ-मृदुंगाच्या तालावर पाऊल धरून गात-नाचत आनंदाने जनांचा प्रवाहो चंद्रभागेच्या प्रवाहाशी स्पर्धा करत वाळवंटी एकवटायचा. खरं तर जनसागरच अवतरायचा. विठूमाऊलीचं प्रत्यक्ष दर्शन तर भाग्याचंच, पण दुरून कळसाला नमस्कार करण्यातही धन्यता मानणारे भाविक भावोत्कट पद्धतीने विठ्ठलाचा नामजप करत राहायचे. या शेकडो वर्षांच्या परंपरेत पूर्वी कधी खंड पडला असेल तर ठाऊक नाही, पण गेल्या वर्षी मात्र अशी परिस्थिती उद्भवली खरी. कधी जातोय हा कोरोना आणि विठूरायाचं सावळंसुंदर, मनोहर रूप पुन्हा कधी दृष्टीत साठवता येतं या भावनेने व्याकूळ झालेल्या यात्रिकांना परवाच्या कार्तिकी एकादशीला दिलासा मिळाला.
कोरोना बराचसा ओसरून लसीकरणही मोठय़ा प्रमाणावर झाल्याने विठ्ठल मंदिराचे दरवाजे सारे नियम पाळून उघडतील असं जाहीर होताच अवघं मराठी मन आनंदलं. वारी म्हणजे नियमाने ठरावीक तिथींना विठ्ठल दर्शनाला समूहाने जाणे. त्या दोन तिथी अर्थातच आषाढी आणि कार्तिकी एकादशी. ‘रूप पाहता लोचनी, सुख जाले वो साजणी’ असं ते विठ्ठलरूप.
प्रचंड प्रमाणावर नाही तरी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या अनेकांना यावेळी विठ्ठलाच्या चरणी मस्तक टेकवण्याची संधी लाभली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांबरोबरच नांदेडच्या वारकरी दांपत्याला विठ्ठलपूजेचा मान मिळाला. पंढरपूर नगरीने या सर्वांचं स्वागत केलं. मंदिर आकर्षक रोषणाईने अंतर्बाहय़ सजलं आणि या तीर्थक्षेत्राचं वैभव पुन्हा एकदा पाहण्याची आस असलेल्यांना खूप बरं वाटलं.
कारण ‘वारी नाही’ ही जाणीवच अस्वस्थ करणारी होती. वारीला न जाणाऱ्यांनाही ती अस्वस्थता जाणवत होती, तर नियमित वारी करणाऱ्या भक्तांची काय स्थिती झाली असेल? कोरोना काळात तरुण अभिनेता संकर्षण कऱहाडे याने केलेली भावस्पर्शी कविता आठवते.
‘पंढरीच्या विठूराया, कसं काय बरंय का?
यंदा वारी नाही म्हणे? आं? खरंय का?’
वारी नाही याची खंत कवीच्या मनात आहेच, पण त्यांनं त्या जगजेठीला अनेक रूपांत असं पाहिलं…
‘…पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं’
ते कसं तर…
‘अरे, तू होतास की, त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला
चंदनाचा लेप नाही, पण ‘पीपीई किट’ घातलेला
तू बंदोबस्ताला होतास, खाकी वस्त्रं घालून
कचरासुद्धा उचललास की रे, खाली मान घालून
पंढरीच्या विठूराया किती धडपडलास रे
एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर, पण लढलास रे’
असे हृदयस्पर्शी शब्द सर्वांच्याच मनाला आपलीच भावना वाटायला लावणारे होते. शेवटी कवी म्हणतो की,
मुक्त वातावरणात वारी होईल तेव्हा देवा…
‘पण पुढल्या वर्षी भेटायला वारी करून येतो
तेव्हा मात्र गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको’
मग काय हवं, तर…
‘संसर्ग भक्तीचा अन् स्वच्छता चंद्रभागेच्या स्नानाची
या सगळय़ावर मग एकच ‘लस’,
ग्यानबा, तुकाराम नामाची!’
संकर्षणची ही इच्छा परवाच्या कार्तिकेला पूर्ण झाली. ‘विठ्ठल विठ्ठल गजरी, (पुन्हा) अवघी दुमदुमली पंढरी’




























































