लेख – ठसा – पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> भगवान परळीकर

संपूर्ण आयुष्य संस्कृतचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी वाहून घेतलेले, सिद्धहस्त लेखक, संस्कृतचे गाढे अभ्यासक, संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार हे नुकतेच पैगंबरवासी झाले. बिराजदार हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील होते.  सोलापुरात दत्त चौकातील महापालिकेच्या रात्र शाळेत त्यांनी संस्कृत शिक्षणाची सुरुवात केली. त्यांचे शिक्षक शास्त्रीजी अग्निहोत्री होते. एक मुस्लिम तरुण संस्कृत शिकण्यासाठी प्रयत्न करतो हा खूप कौतुकाचा विषय होता. अग्निहोत्री शास्त्रीनी धर्म घरात व ज्ञान सर्वत्र ही भूमिका घेतली. स्व. प्रल्हाद आयाचित शास्त्रीही त्यांना शिकवण्यास होते. मराठा मंदिर मुंबई येथे त्यांनी संस्कृत शिक्षक म्हणून सेवा केली.

संस्कृत विभागातून सेवानिवृत्तीनंतर संपूर्ण देशभर फिरून पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी संस्कृत भाषेचा व सर्वधर्म समभाव एकात्मतेसाठी  प्रचार केला. ते स्वतःला संस्कृतचा सेवेकरी मानत असत. उर्दू लिपी वेगळी असली तरी मुळात ती हिंदीच आहे. उर्दू हिंदुस्थानी भाषा आहे. संस्कृत भाषा खूप अवघड आहे. असे भासवून सर्वसामान्य माणसाला दूर करण्याचे काम केले जाते. अशी खंत त्यांनी अनेक वेळा व्यक्त केली. मुळात संस्कृत सोपी व ज्ञानी भाषा आहे. तीच शिकण्यासाठी इच्छा व जिद्द असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. आदर्श शिक्षक म्हणून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला  होता. तसेच विविध संस्थांनी त्यांना महापंडित, पंडितेंद्र, संस्कृतरत्नम, परशुरामश्री, विद्यापारंगत, वाचस्पती अशा पदव्या बहाल केल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य, संस्कृत पाठय़ पुस्तक निर्माण बालभारतीचे ते अध्यक्ष होते. संस्कृत भाषेतील योगदानाबद्दल त्यांना हिंदुस्थानातील नामवंत संस्थांतर्फे एकूण 29 पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

मुस्लिम समाजाचे असतानाही मातृभाषा हिंदी असूनही त्यांनी संस्कृत भाषेची आयुष्यभर सेवा केली. अखेरच्या श्वासापर्यंत ते लिहितच होते. पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ कुराण शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरीत केला आहे. त्यांचा सदर ग्रंथ हा  सहाशे पानांचा असून तो पूर्णत्वास आला होता. शिवप्रज्ञा प्रकाशन, सोलापूर या प्रकाशन संस्थेने हे काम हाती घेतले होते. 15 ऑगस्ट 2021 रोजी हा ग्रंथ प्रकाशित करण्याचा त्यांचा संकल्प होता.  वेदादि-शोधबोध, मुस्लिम-संस्कृत-सेवकाः विश्वभाषा संपादकीय मौक्तिकानी, मुस्लिमानां संस्कृताभ्यासो अन्ये चापि लेखाः अशी त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  शालेय अभ्यासक्रमात इयत्ता सहावीपासून संस्कृत विषय अनिवार्य करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत होते. संस्कृत ही आपल्या देशाची भाषा असून, संस्कृतचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी बिराजदार यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.

संस्कृत पंडित, वेदाचे गाढे अभ्यासक आणि ‘कुराण’ला संस्कृत भाषेत साकारणारे पंडित गुलाम बिराजदार यांना सावरकर पुरस्काराने सन्मानित केले होते. वाराणसी येथील महापण्डित, पण्डितेंद्र, सोलापूरचा संस्कृतरत्नम, उज्जैनचा परशुरामश्री, नाशिकचे विद्यापारंगत आणि तिरुपतीचा वाचस्पती अशा उपाधींनी गौरवण्यात आलंय. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जवळपास अठरा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. प्रसिद्ध गझलकार बदीऊज्जमा बिराजदार यांचे ते पिता होत. स्वतःच्या नातवाच्या विवाहाची लग्नपत्रिका त्यांनी मराठी, हिंदी व संस्कृत भाषेत तयार केली होती. त्यांनी हिंदी व उर्दू भाषेतील एकूण सहा पुस्तकांचा संस्कृत भाषेत अनुवाद केला आहे. त्यांना राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती यांनी वाचस्पती या पदवीने सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने संस्कृतचे संवर्धन करण्यासाठी धडपड करणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.