लेख : विचारांतून वृत्ती निर्माण करणारा तत्त्ववेत्ता

>> विशाल अहिरराव 

धार्मिक-अध्यात्मिक क्षेत्राला गतानुगतिकतेतून बाहेर काढून बुद्धी आणि तर्कावर घासून आंतरभक्तीसह कृतीभक्तीची जोड देणाऱ्या स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्री आठवले (दादा) यांची आज जन्मजयंती आहे. त्यांचा जन्मदिवस हा ‘मनुष्य गौरव दिन’ साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देणारा लेख.

महाराष्ट्र ही वीरांची, संतांची, महापुरुषांची भूमी. विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारी कार्य करणाऱ्या महानुभावांमध्ये ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल असे कृतीशील तत्त्ववेत्ते, स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांचा आज जन्मदिवस. 19 ऑक्टोबर 1920 रोजी पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म रोहे गावात झाला. त्यांचे वडील वैजनाथशास्त्री (तात्या) यांनी सांस्कृतिक मूल्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ‘सरस्वती पाठशाळा’ सुरू केली. पांडुरंगशास्त्री आणि त्यांच्या सहाध्यायींनी इथे तपोवन पद्धतीचे विशेष शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई आल्यावर त्यांनी ‘एशियाटिक लायब्ररी’ येथे 12 वर्ष दिवसाचे 12 ते 14 तास अभ्यास केला. यावेळी त्यांनी केवळ नवलकथांचा भाग वगळता तत्त्वज्ञान, विज्ञान, धर्म, मानसशास्त्र, इतिहास, साम्यवाद, साहित्य, धर्म, अध्यात्म अशा विविध विषयाचा सखोल आणि तौलनिक अभ्यास केला. योगसूत्रांतील ‘स तु दीर्घकालै नैरंतर्य…’ अशा पद्धतीने सुरू असलेला त्यांचा अभ्यास पाहून अनेक विद्वान लोक त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी येत असत. ग्रंथपालाला देखील एखादे पुस्तक सापडले नाही तर कुठे असेल याची माहिती घेण्यासाठी तो संबंधित व्यक्तीला दादांकडे पाठवून देत असे.

1942 च्या सुमारास श्रीमद्भगवद्गीता माधवबाग पाठशाळा येथे उपनिषदांवर प्रवचने करण्याची धुरा वडिलांनी दादांच्या खांद्यावर दिली. अभ्यासू व्यक्तीमत्त्व आणि स्वतंत्र विचारबुद्धी यांच्या आधारावर त्यांनी उपनिषद, वेद, गीता यांच्यावर भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या आधारे प्रवचन करण्यास सुरुवात केली. एकीकडे स्वातंत्र्यसंग्राम सुरू असताना दादांनी स्वत:ला मानव्य निर्माणासाठी झोकून दिले होते. चांगले विचार सांगणारे अनेकजण आहेत. मात्र शास्त्रीजी हे केवळ प्रवचनकार नव्हते तर नवनवीन प्रयोग करणारे कृतीशील तत्त्ववेत्ते होते. म्हणून त्यांनी भक्तीला कृतीची जोड दिली.

भेदभावाने बरबटलेला, रुढीग्रस्त मानव समाज त्यांना पहावला नाही. हीन-दीन बनलेल्या समाजाला तेजस्वी बनवायचे असेल तर त्याच्याजवळ मूळ वेदांचे विचार, गीतेचे विचार घेऊन जावे लागेल, असा विचार करून स्वत: विद्वान, प्रकांड पंडित असूनही ते देशाच्या विविध शहरांत, खेड्यापाड्यात जाऊन हे विचार देऊ लागले. देव केवळ आकाशात, मंदिरात नाही तर तो माणसात राहतो. तेव्हा आपल्या व्यावहारिक जीवनात त्याला ‘त्रिकालसंध्ये’द्वारे किमान तीन वेळा त्याला आठवून त्याचे सामीप्य समजावले. त्यामुळे व्यक्ती शिकलेला असो वा अशिक्षित, गरीब असो वा श्रीमंत, स्वत:ला भगवंताचा मुलगा मानून तेजस्वी जीवन जगू लागला. स्वाध्यायामुळे गावागावातील व्यक्तीला स्वत:ची हरवलेली ओळख मिळाली. ‘Reason based emotion and emotion based work’ (बुद्धीवर आधारित भाव आणि भावनेवर आधारित कृती) अशा या सूत्रावर सुरू असलेले स्वाध्याय परिवाराचे कार्य तरुणांना भावले.

1954 मध्ये त्यांना जपानमधील विश्वतत्त्वज्ञान परिषदेत बोलण्याचे निमंत्रण आले. वैदिक संस्कृतीचा अभ्यास आणि कर्मयोगी जीवन असलेल्या पांडुरंगशास्त्रींच्या तेथील भाषणाने सारेच प्रभावित झाले होते. अमेरिकेत येऊन त्यांनी आपले कार्य करावे अशी ऑफर देखील त्यांना देण्यात आली होती, त्याचा मोबदला म्हणून पैसे आणि मानसन्मान देखील देऊ, असेही कळवण्यात आले होते. मात्र दादांनी अत्यंत नम्रपणे नकार देत भारतातच हे कार्य करण्यासाठी स्वत:चे जीवन वाहून दिले.

1956 मध्ये ठाणे येथे तत्त्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली. विद्यार्थ्यांना तपोवन पद्धतीच्या शिक्षणासोबत इतिहास आणि तत्त्वज्ञानाचे पाठ दिले. सुशिक्षितांना वैदिक संस्कृतीची ओळख व्हावी, सखोल अभ्यासातून संस्कृतीला गतवैभव मिळवून द्यावे यासाठी विविध शिबिरे येथे भरवण्यात आली. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या अखंड ज्ञानयज्ञाचा परिणाम स्वरुप केवळ अभ्यास करून थांबणारा नाही, तर ‘कृतीशील’ तरुण या तत्त्वाज्ञान विद्यापीठातून बाहेर येऊ लागला. त्यांनी भक्तीफेरीच्या माध्यमातून खेडापाड्यात संस्कृतीचे विचार पोहोचण्यास सुरुवात केली.

साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी असेच ते जीवन जगले. पांढरा  झब्बा आणि धोतर हा त्यांचा वेश. त्यांनी स्वाध्यायींना गणवेश ठरवून दिला नाही. कुणी विचारल्यास ते उत्तर द्यायचे, न विचित्र वेशं कुर्यात… विशिष्ट कपडे नाही तर सद्वृत्ती किंवा वर्तन हीच स्वाध्यायींची ओळख असली पाहिजे. विचार केवळ बोलण्यात न राहता वृत्तीत आणण्यावर त्यांचा अधिक जोर होता.

याद्वारे हजारों गावांमध्ये गेली 70 वर्षे स्वाध्यायाचा विचार स्थिर झाला. समाजाभिमुख भक्तीद्वारे योगेश्वरकृषी, मत्स्यगंधा, वृक्षमंदिर, हिरामंदिर अशा विविध प्रयोगांतून लोकांची व्यसने सुटली, भांडणतंटे मिटले, गावे स्वच्छ-स्वावलंबी बनली, महिला सबला बनल्या, तरुण सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनले. गावगावातील राजकारण संपले. दादांनी ‘भ्रांतईश्वर’वाद दूर करून खऱ्या भक्तीच्या आधारावर हे बदल घडवले. भक्ती म्हणजे कर्मकांड नाही तर ती वृत्ती आहे असे ते म्हणायचे. गीतेच्या विचारांवर चालणारा लाखोंचा परिवार त्यांनी उभा केला. देशातच नाही तर आज 14 देशांमध्ये हे कार्य सुरू आहे.

ऋषीतुल्य कार्यासाठी त्यांना जगातील श्रेष्ठ असे मॅगसेसे, टेम्पल्टन असे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. तसेच देशातील पद्म-विभूषण पुरस्कारांसह अन्य अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. 2003 मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी पांडुरंगशास्त्रींचे देहावसान झाल्यानंतर स्वाध्याय कार्याची धुरा त्यांची सुपुत्री धनश्री तळवलकर (दीदी) या सांभाळत आहेत. आजपासून पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने स्वाध्याय परिवार त्रिकालसंध्येच्या माध्यमातून त्यांचे विचार घरोघरी घेऊन जाणार आहे. मनुष्यात गौरव उभ्या करणाऱ्या या महान तत्त्ववेत्त्याला भावपूर्ण नमस्कार.

आपली प्रतिक्रिया द्या