रसिकहो : बाप्पाच्या मनोरंजनासाठी…

344

>>क्षितिज झारापकर

गणपती उत्सव जवळ आला की, नाटय़व्यवसायाला एक वेगळी पालवी फुटते. सर्व रंगकर्मी सज्ज होतात. गणरायाच्या चरणी आपापली सेवा रुजू करून चार पैसे मिळवण्याचा हा काळ असतो. काही प्रस्थापित गणेशमंडळांमध्ये आपल्या नाटकाचा प्रयोग होणं हे अभिमानाचं मानलं जातं. मुंबईत दादर येथील हिंदू कॉलनी गणोशोत्सवात कैक मातब्बर कलाकारांच्या आणि नावाजलेल्या संस्थांच्या नवीन नाटकांचा शुभारंभ झाल्याचा इतिहास आहे. रमेश भाटकर आणि कुलदीप पवारसारखे जुने जाणकार रंगकर्मी खास पुण्याहून गणपतीच्या दौऱयांसाठी नाटकं करीत असत. गणेशोत्सवात नाटकाचा धंदा हा नेहमीच्या सुसज्ज नाटय़मंदिरात किंवा थेटरात होत नसतो. किंबहुना शिवाजी मंदिरसारखी नाटय़गृहं या अकरा दिवसांत थिएटर बंद ठेवून रिपेरिंग आणि रिनोव्हेशनची कामं उरकून घेतात. गणपती उत्सवातला हा धंदा गावातून होणाऱया सर्वजनिक गणेशोत्सवातून होत असतो. यंदा देखील गणेशोत्सवाच्या निमित्ताने नवीन नाटकं येत आहेत. यातील काही नाटकांचा आढावा आपण इथे गेल्या काही आठवडय़ांत घेतलेला आहे. आज एक नवीन नाटक आहे ‘ऐन चौकीत अर्ध्या रात्री’. व्यावसायिक नाटकं ही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या प्रॉडक्टसारखी असतात. कंपन्या उत्पादनाचं टार्गेट कस्टमर कोण आहे याचा अभ्यास करून उत्पादन बनवतात. तसंच व्यावसायिक नाटकं ही टार्गेट ऑडियन्स ठरवून उभी केली जातात. गणेशोत्सवात सादर होणारी नाटकं याला अपवाद नाहीत. उलट या नाटकांना जास्त मेहनत लागते. ही नाटकं जास्तकरून थिएटरमध्ये सादर न होता खुल्या मैदानात फार फार तर खुल्यावर सादर होतात. एका वेळी दोनअडीच हजारांपेक्षा जास्त प्रेक्षकवर्ग असतो. अशा वातावरणात नाटक खुलण्याकरिता प्रचंड मेहनत लागते. अर्चना थिएटर्सचं ‘ऐन चौकीत अर्ध्या रात्री’ या कसोटीवर शंभर टक्के उतरतं. लेखक आणि दिग्दर्शक संकेत तांडेल याने हे नाटक तयार करताना या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार केलेला आहे. एका पोलीस चौकीत मध्यरात्र जवळ येत असताना घडणारं हे कथानक आहे. जे नाटय़ ‘ऐन चौकीत अर्ध्या रात्री’मध्ये घडतं ते का घडतं हे सांगून नाटकाची गंमत इथे घालवण्यात काहीचं अर्थ नाही. पोलीस चौकीतला इन्स्पेक्टर, एक भुरटा चोर, तक्रार नोंदवायला आलेला एक साधा भोळा नवरा, त्याची कजाग भासणारी बायको, एक मुरलेला राजकीय कार्यकर्ता आणि त्याचा झोपाळू ड्रायव्हर या पात्रांतून रंगणारी कथा म्हणजे ‘ऐन चौकीत अर्ध्या रात्री’.

संकेत तांडेल याने नाटक अत्यंत तरल आणि हलकंफुलक़ं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संकेतचं या आधीचं नाटक पाच मोलकरणींवर बेतलेलं ‘हम पाच’ देखील याच पठडीतलं होतं. संकेतच्या नाटकात दिग्दर्शक आणि नटांचं कामसुद्धा तितकंच मोठं आणि महत्त्वाचं असतं. ‘ऐन चौकीत अर्ध्या रात्री’मध्ये दिग्दर्शक म्हणून संकेत तांडेल याने अचूक बांधणी साधली आहे. नाटक खुल्या मैदानावर सादर होणार आहे, याचं भान ठेवून गणेशने नाटकातील पात्रांना खूप हलतं ठेवलं आहे. याचा परिणाम असा की, मैदानातील शेवटच्या प्रेक्षकाला जेव्हा नटांच्या चेहऱयाचे भाव दिसणं शक्य नसतं तेव्हा अतिरंजित हालचालींनी तो प्रेक्षक दुरूनही नाटकाशी जोडलेला राहतो. ‘ऐन चौकीत अर्ध्या रात्री’मध्ये संकेत तांडेलने हे तंतोतंत पाळलेलं आहे. नाटकाची आखणीच त्यांनी अशी रचली आहे की थिएटरमधल्या प्रयोगांमध्येही या हालचाली वावग्या वाटणार नाहीत. हे करत असतानाच संकेतने ‘ऐन चौकीत अर्ध्या रात्री’ला जीवघेणा स्पीड दिलेला नाही हे विशेष. साधारणतः ओपनवर नाटक असताना नाटकाची गती वाढवून ते सतत हलतं ठेवण्याकडे कल असतो. पण ‘ऐन चौकीत अर्ध्या रात्री’मध्ये कथानकाच्या अपेक्षित गतीशी छेडछाड केलेली नाही. त्यामुळे कथानक आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतं.

अशा नाटकांमध्ये कलाकारांचा कस लागतो. प्रचंड ऊर्जेने त्यांना आपापल्या भूमिका सादर कराव्या लागतात. बहुतेकदा जुजबी ध्वनियंत्रणेच्या मर्यादेमुळे त्यांना खूप ओरडून आणि विशिष्ट ठिकाणी उभं राहूनच नाटक सादर करावं लागतं. ‘ऐन चौकीत अर्ध्या रात्री’मधले सगळे कलाकार खणखणीत वाणीने आणि कमालीच्या ऊर्जेने नाटक सादर करतात. भावेश टिटवळकर इन्स्पेक्टर गायकवाड म्हणून सुरुवातीपासूनच नाटकाची लय सांभाळत एक सृजनशील फौजदार उभा करतात. किरण तांबे गुन्हेगाराच्या लवचिक भूमिकेत धम्माल घडवतो. त्याला नाटकात फार कमी वेळ चार बाय चारच्या कोठडीतून बाहेर काढलंय तरीही तो योग्य परिणाम साधून जातो. वैभव पिसाट लोकल नेत्याचं तुफान अर्कचित्र सादर करतात. त्यांचा ड्रायव्हर झालेला मनोज कदम गाळलेल्या जागा भरण्याचं कठीण काम अचाट सहजतेने साध्य करतो. दीपा माळकर सौ. टेम्बे ही भूमिका जगते. मुळात हे पात्र जसं समोर येतं तसं ते अजिबात नाहीये आणि ही गोष्ट दीपाने उत्तरार्धात नेमकेपणाने समोर आणली आहे. ‘ऐन चौकीत अर्ध्या रात्री’ची मोट बांधून स्वतःच्या खांद्यावर वाहण्याची जबाबदारी गणेश रेवडेकर यांनी मि. टेम्बे या भूमिकेतून समर्थपणे उचलली आहे. या भूमिकेच्या वेगवेगळय़ा छटा त्याने आपल्या अनुभवाच्या जोरावर सहजतेने पेलल्या आहेत.

एका नेमक्या हेतूने नाटक क्राफ्ट करून ते रंगभूमीवर आणणं ही प्रक्रिया तशी जटिलच असते. त्यात ‘ऐन चौकीत अर्ध्या रात्री’ हे एका विशिष्ट प्रेक्षक समूहासाठी तयार केलं गेलंय. सगळ्याच बाबतीत आणि सर्व पातळ्यांवर हे नाटक समाधानकारक उतरतं. सगळ्या टीमचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिक आहे. नाटक रसिकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतं आणि कोणत्याही नाटकासंदर्भात ही गोष्ट सर्वात महत्त्वाची असते. ‘ऐन चौकीत अर्ध्या रात्री’ हे एक निखळ करमणूक करणारं उत्तम विनोदी नाटक आहे.

नाटक          ऐन चौकीत अर्ध्या रात्री

निर्मिती        अर्चना थिएटर्स

निर्मितीप्रमुख शेखर दाते

नेपथ्य, प्रकाश वैभव पिसाट

पार्श्वसंगीत     सुशील/संकेत

रंगभूषा         उदय तांगडी

वेशभूषा        दीपा माळकर

लेखकदिग्दर्शक संकेत तांडेल

कलाकार  दीपा माळकर, भावेश  टिटवळकर, मनोज कदम, किरण तांबे, गणेश रेवडेकर

दर्जा

आपली प्रतिक्रिया द्या