लेख : शिक्षणमहर्षी प. म. राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> उमेश शेंडगे <<

शिशुवर्ग, प्राथमिक व माध्यमिक शाळा, रात्रशाळा, कनिष्ठ विद्यालय, महाविद्यालय असा प्रगतीचा चढता आलेख! केवळ शिक्षण प्रसाराच्या ध्यासाने प्रेरित झाल्यानंतरच हे घडू शकते. याचा मूर्तिमंत आदर्श शिक्षणमहर्षी परशुराम महादेव राऊत सर!

विद्या विकास एज्युकेशन संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प. म. राऊत यांना १९९१ मध्ये राष्ट्रीय शिक्षक कल्याण पुरस्कार व १९९४ मध्ये राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते देण्यात आला. राऊत सरांच्या पत्नी, संस्थेच्या विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या प. राऊत यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २००१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्राप्त झाला.

विद्या विकास एज्युकेशन सोसायटीच्या विक्रोळी येथील मुंबई विद्यापीठ संलग्न विकास कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘नॅक’ या मूल्यांकन परिषदेतर्फे मानाची ‘अ’ श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आय.एस.ओ. ९००१:२००८ हे मानांकनही प्राप्त झाले आहे. विक्रोळीतील कामगारवर्ग तसेच शैक्षणिक व सामाजिक गरजा ओळखून विद्या विकास एज्युकेशन सोसायटीने १९८६ मध्ये रात्र विकास महाविद्यालय सुरू केले. सुरुवातीला ८६ विद्यार्थी प्रवेशित वाणिज्य शाखेच्या एका तुकडीपासून या महाविद्यालयाच्या उन्नतीस सुरुवात झाली व पुढे वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षापर्यत १० तुकठ्या सुरू झाल्या. काळाची पावले ओळखून व विक्रोळी परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने १९९३ साली कला शाखेचेही वर्ग सुरू करण्यात आले.

विक्रोळीमधील नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार कला, वाणिज्य, विज्ञान अशा तीनही शाखा व त्यांच्या उपशाखा महाविद्यालयात अंतर्भूत असून बी.एम.एस., बी.कॉम. अकाऊंटिंग ऍण्ड फायनान्स व बी.एस.सी. संगणक या व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. उच्चशिक्षणाच्या दूरदृष्टीतून एमएससीआयटी, एम.एससी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री), एम. एससी. (बायोटेक), एम. कॉम. (अकाऊंटन्सी), एम.कॉम. बिझनेस मॅनजमेंट हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाशी संलग्न व्यवसायाभिमुख बी.व्होक. व एम.एल.टी. हे अभ्यासक्रम चालविले जात असून त्यांचे अभ्यासक्रम प्रमाणप्रत्र, पदविका व पदवी या तीन टप्प्यांमध्ये उपलब्ध आहेत. वाणिज्य शाखेत कंपनी सेक्रेटरी (सीएस) त्याचप्रमाणे उच्चतम पदवी विद्यावाचस्पती (पीएच. डी.)अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने महाविद्यालयात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यात सुसज्ज जिमखाना, तज्ञ प्रशिक्षक, भव्य संगणकीय ग्रंथालय यांचा समावेश असून वाहतूक नियंत्रण, स्वच्छ मुंबई अभियान अशा अनेकविध सामाजिक उपक्रमांत विकास समूहातील ६००० विद्यार्थ्यांनी आपले योगदान राष्ट्रीय कार्यास दिले आहे. आज विकास महाविद्यालय मोठ्या स्वाभिमानाने शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे ते राऊत सरांच्या प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाखालीच! राऊत सरांनी जीवनाची ८१ वर्षे ओलांडली आहेत. मात्र त्यांचे कार्य आजही तितक्याच जोमाने चालू आहे. त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा २९ जुलै २०१८ रोजी साजरा झाला. या कार्यक्रमात श्री शिवाजी ज्ञानपीठ (आंतरराष्ट्रीय) या संस्थेतर्फे सरांना त्यांच्या अलौकिक शैक्षणिक कार्यासाठी ‘पेशवा मोरोपंत पिंगळे जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला.